स्वाभिमानकडून रडीचा डाव

स्वाभिमानकडून रडीचा डाव

कणकवली - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने घाणेरडं राजकारण सुरू केले आहे. शिवसेना आणि भाजप पक्षांत भांडणे लावण्याची कूटनीती खेळली जाते आहे, तर दुसरीकडे फेक न्यूज तयार करून आमच्या बदनामीचा प्रयत्न होतो आहे. याखेरीज स्वतःच गाड्यांची जाळपोळ करून वातावरण बिघडवत आहेत; मात्र जनता सुज्ञ आहे.

स्वाभिमानच्या मंडळींनी रडीचा डाव असाच सुरू ठेवला तर नीलेश राणेंना अडीच लाख मतांनी पराभव पत्करावा लागेल, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.

येथील विजय भवनमध्ये श्री. राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. श्री. राऊत म्हणाले, ‘‘एका खासगी चॅनेलचा लोगो लावून आणि मी कधीही न बोललेलं वाक्‍य कोट करून तसेच फोटोशॉपमध्ये माझा फोटो एडिट करून सोशल मीडियावर फिरवला जात आहे. हे सर्व कारस्थान स्वाभिमानच्या मंडळींनी केले आहे. त्याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत. त्या सर्वांविरोधात मी सिंधुदुर्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अशी बदनामी करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत, अशीही मागणी आहे. त्याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांची उद्या (ता. १४) भेट घेणार आहोत.’’

जठार, आठवले आमच्या सोबत
नाणारच्या मुद्द्यावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे; पण पुढील काळात ते निश्‍चितपणे आमच्यासोबत असतील. खासदार रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष आमच्या सोबत आहे. त्यांच्या येथील जिल्हाध्यक्षांनी याबाबत वेगळे पत्रक काढले असले तरी त्यांचीही समजूत रिपब्लिकनची वरिष्ठ मंडळी काढतील, असे श्री. राऊत म्हणाले.

ते म्हणाले, ‘‘प्रत्येक निवडणुकीला स्वाभिमानचे संजू परब यांची जुनी गाडी जाळली जाते. हे गाड्या जाळणारे, पेट्रोल ओतणारे, काड्या लावणारे आणि हा प्रकार दुरून पाहणारे सर्वजण स्वाभिमानचे कार्यकर्ते आहेत. निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानकडून असे वातावरण बिघडविण्याचे प्रकार केले जात आहेत. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. याची एकत्रित चौकशी व्हावी, अशी मागणीही पोलिस अधीक्षकांकडे करणार आहे.’’

नाणार प्रकल्प रद्द झाल्याने मतदारसंघात समाधान आहे. ज्या चौदा गावांत हा प्रकल्प होणार होता तेथे ९० टक्‍के मतदान आम्हाला होईल, असा विश्‍वास श्री. राऊत यांनी व्यक्‍त केला.

सेना-भाजपमधील विसंवाद दूर होईल
कणकवलीत भाजपचा मेळावा झाला. यात कार्यकर्त्यांनी त्यांच्या मनातील खदखद राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांच्यापुढे मांडली. आता भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची समजूत त्यांची वरिष्ठ मंडळी निश्‍चितपणे काढतील आणि पुढील काळात शिवसेना-भाजपची मंडळी एकदिलाने प्रचार करताना दिसतील, असे श्री. राऊत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com