साहेब ते संरक्षक भिंतीच काम कधी होणार ? दोन महिने झालं आम्ही नातेवाईकांकडेच राहतोय

राधेश लिंगायत
Saturday, 24 October 2020

हर्णे फत्तेगड किल्ल्यावरील एका घराच्या मागील संरक्षक भिंत आणि किल्ल्याचा तट कोसळल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे.

हर्णे (रत्नागिरी)  : निसर्ग वादळाच संकट सरलं पण नव्हतं तर दीड महिन्यांनी हर्णे फत्तेगड किल्ल्यावरील एका घराच्या मागील संरक्षक भिंत आणि किल्ल्याचा तट कोसळल्यामुळे घराला धोका निर्माण झाला आहे. त्या घरातील कुटुंब नातेवाईकांकडे राहण्यास गेली असल्याचं येथील ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा - प्रविण दरेकर पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर -

याबाबत तहसीलदार ग्रामपंचायत प्रशासनाला सांगून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, फत्तेगड येथील घर नं ७१४ हे पांडुरंग लाया पेडेकर यांचे घर आहे. यांच्या घराच्या मागील बाजूची फत्तेगड किल्ल्याची भिंत आणि या भिंतीला लागूनच सिमेंटचा बांधलेला बंधारा ऑगस्ट २०२० या महिन्यात कोसळला आहे. त्यामुळे घराच्या जोत्यापासून इमारतीला धक्का बसला आहे. 

सदरची तटरक्षक भिंत लवकरात लवकर उभी नाही राहिली तर घर कोसळू शकते. तहसीलदार व ग्रामपंचायतीला निवेदन दिल्यानंतर तलाठी व ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी येऊन फक्त पहाणी केली. त्यापुढे अद्याप काहीच कार्यवाही दिसून आलेली नाही. या घरातील पेडेकर यांनी आपले सर्व सामान नातेवाईकांकडे हलवले आहे आणि स्वतः तिकडेच राहत आहेत. या घराच्या बाजूला लागूनच अजून एक घर आहे बाजूची भिंत जर कोसळली तर त्या घरालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याठिकाणी कोणीही जाऊन अपघात होऊ नये म्हणून येथील ग्रामस्थांनी बंदोबस्तासाठी जाळे लावून ठेवले आहे. 

हेही वाचा -  ऑक्‍टोबरपर्यंत गांधीगिरी नंतर मात्र ॲक्‍शन -

दोन दिवसांपूर्वी मॉकड्रीलच्या वेळी तालुक्याचे पोलीस निरीक्षक - राजेंद्र पाटील ज्यावेळी ग्रामस्थांना बाहेर काढण्याचे काम करत होते त्यावेळेस त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यावेळी त्यांनीही सदर घटनेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे आपण चर्चा करून या संरक्षक भिंतीविषयी तातडीची कार्यवाही करायला सांगू असे पाटील यांनी सांगितले.

"सदरची घटना ही माझ्या हजेरीमध्ये झालेली नसून मी त्याची पाहणी व चौकशी करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून घेते."

-  वैशाली पाटील, दापोली तहसीलदार

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wall of fattegad in konkan area destroyed before 2 months but not recovered from administration in ratnagiri