देखभाली अभावी तलाव गाळात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

अलिबाग - पाण्यावर पसरलेले दाट शेवाळ... मधेच उगवलेली झाडे-झुडपे... तरंगणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्या... हे चित्र आहे अलिबाग शहर व परिसरातील तलावांचे. नगरपालिकेने हिराकोट व रामनाथ तलाव परिसरात सुशोभीकरण केले; मात्र पाण्यात साचलेल्या कचरा-घाणीमुळे हे काम पाण्यातच गेले आहे. एकेकाळी अलिबागला पाणीपुरवठा करणाऱ्या गोकुळेश्वर तलावात सांडपाणी सोडले जात आहे; तर कुलाबा किल्ल्यातील तलावाच्या स्वच्छतेकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत आहे. या सर्व तलावांची स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे. 

अलिबाग - पाण्यावर पसरलेले दाट शेवाळ... मधेच उगवलेली झाडे-झुडपे... तरंगणाऱ्या प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्या... हे चित्र आहे अलिबाग शहर व परिसरातील तलावांचे. नगरपालिकेने हिराकोट व रामनाथ तलाव परिसरात सुशोभीकरण केले; मात्र पाण्यात साचलेल्या कचरा-घाणीमुळे हे काम पाण्यातच गेले आहे. एकेकाळी अलिबागला पाणीपुरवठा करणाऱ्या गोकुळेश्वर तलावात सांडपाणी सोडले जात आहे; तर कुलाबा किल्ल्यातील तलावाच्या स्वच्छतेकडे पुरातत्त्व विभाग दुर्लक्ष करीत आहे. या सर्व तलावांची स्वच्छता करणे गरजेचे झाले आहे. 

गोकुळेश्वर तलावात सांडपाणी 
अलिबाग शहराला पूर्वी शहरालगतच्या गोकुळेश्वर तलावातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. एमआयडीसीने शहरात पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर या तलावातील पाणी वापरणे नगरपालिकेने बंद केले. सध्या हा तलाव वेश्वी ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. त्यातही मोठ्या प्रमाणात कचरा व झाडे-झुडपे आहेत. या तलावात सांडपाणी सोडण्यात येत आहे; मात्र संबंधित हॉटेलचे व्यवस्थापन सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात असल्याचा दावा करीत आहे. 

रामनाथ तलावाचे ‘हे राम’
नगरपालिका हद्दीत रामनाथ परिसरात एक तलाव आहे. त्यात मोठ्या प्रमाणात कचरा साचून दुर्गंधी येत आहे. या तलावातील पाण्यात नागरिक निर्माल्य टाकतात. याव्यतिरिक्त प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या व मद्याच्या बाटल्यांचा खचही दिसून येतो. तलावाला झाडा-झुडपांनी वेढले आहे. लगतच नगरपालिकेने मुलांना खेळण्यासाठी उद्यान उभारले आहे. दिवसा मुले खेळतात, तर रात्री या जागेचा ताबा मद्यपी घेत आहेत. मद्याच्या बाटल्या; तसेच खाद्यपदार्थांच्या पिशव्या तलावातील पाण्यात टाकण्यात येत आहेत. 

कुलाबा किल्ल्यातील तलाव, विहिरींकडे दुर्लक्ष 
अलिबाग समुद्रकिनारी कुलाबा किल्ला आहे. या किल्ल्यात आजही पाच ते सहा गुरव कुटुंबे राहतात. ते आपल्या दैनंदिन वापरासाठी किल्ल्यातील जलाशयातील पाणी वापरतात. किल्ल्यातील विहीर; तसेच तलावात शेवाळचे साम्राज्य पसरले आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांचा कचरा आढळून येतो. त्यामुळे या कुटुंबांना पिण्यासाठी शहरातून पाणी घेऊन जावे लागते. किल्ल्यातील जलसाठे पुरातत्त्व विभागाने स्वच्छ करण्याची गरज आहे. 

‘सुशोभित’ हिराकोट घाणीच्या विळख्यात   
अलिबाग शहरात ऐतिहासिक हिराकोट तलाव आहे. हा तलाव सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी बांधला. नगरपालिकेने या तलावाचे सुशोभीकरण केले आहे. परिसरात मोफत वायफाय सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे दिवसभर येथे तरुणांची लगबग सुरू असते. प्रेमी युगुलांसाठी हे हक्काचे ठिकाण बनले आहे. सायंकाळी परिसरातील नागरिक येथे फिरण्यास, चालण्यासाठी येतात. लोकांची गरज बनलेल्या या तलावाच्या पाण्यावर प्रचंड घाण पसरली आहे. अस्वच्छतेमुळे सुशोभीकरणाच्या हेतूलाच नख लागले आहे. तलावातील पाण्यावर शेवाळ साचले आहे. प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणात आहे. हा तलाव स्वच्छ करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. परिसरात पोलिस अधीक्षक कार्यालय आहे. कार्यालय आवारात वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिस कर्मचारी व कामानिमित्त आलेल्या नागरिकांच्या वाहनांचा विळखाही तलावाला पडतो. 

अलिबाग शहर तसेच परिसरातील सर्व तलावांतील कचरा व गाळ काढणे गरजेचे आहे. या तलावांमध्ये बोटिंग; तसेच मत्स्यपालनासारखे उपक्रम राबवता येतील. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेला उत्पन्नही मिळेल. परिसरातील नागरिकांनाही पाण्याचा उपयोग करून घेता येईल. 
- विलास म्हात्रे, सचिव, मातृभूमी संस्था.

Web Title: Wanting to maintain the pond shop