त्यामुळे आल्या सिंधुदुर्गातील या प्रसिध्द दोन नद्या चर्चेत....

एकनाथ पवार
Wednesday, 29 July 2020

नद्यांच्या काठी मोठ्या प्रमाणात पाणमांजराचा वावर सुरू आहे

 

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : दुर्मिळ पाणमांजराचा (उद) शुक आणि शांती नदी परिसरात मुक्त संचार सुरू आहे. त्यांचे बागडणे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

वैभववाडीत शुक आणि शांती नद्या शहराच्या दोन्ही बाजूंनी वाहतात. एरवी दुथडी भरून वाहणाऱ्या दोन्ही नद्या यावेळी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहेत. नद्यांच्या काठी मोठ्या प्रमाणात पाणमांजराचा वावर सुरू आहे. शांतीनदीत असलेल्या सार्वजनिक विहीर परिसरापासून ५०० मीटरमध्ये दहा ते पंधरा पाणमांजरे दिसून येत आहेत. कधी पाण्यात तर कधी नदीकिनारी धावणे, एकमेकांना चाटणे, एकमेकांचा चावा घेणे, पाठलाग करणे, एकमेकांच्या अंगावर लोळणे असे प्रकार पाणमांजराचे सुरू आहेत.

हेही वाचा- सावंतवाडीत कशाची भीती? प्रशासनही झालेय सतर्क..वाचा सविस्तर -

वेगवेगळ्या प्रकारचे आवाजही काढतात. कोवळ्या उन्हात तर मांजरे मुक्त वावरताना दिसत आहेत. शुकनदीच्या पारकोंड परिसरात देखील आठ ते दहा पाणमांजरांचा वावर आहे. पाण्यातून मध्येच डोके वर काढून मांजरे मासे पकडण्याच्या तयारीत असलेली दिसून येत आहेत. मांजराची कातडी काळपट गुळगुळीत आहे. पाठीवर तुरळक केस आहेत. साधारणपणे दोन ते सात किलोपर्यत वजनांची पाणमांजरे असून त्यांची लांबी दोन ते तीन फुटांपर्यंत आहे. 

पाणमांजरांचा वैभववाडीत मुक्तपणे संचार  

हेही वाचा-गृहराज्यमंत्र्यांकडून सिंधुदुर्ग पोलिस दलाची प्रशंसा, म्हणाले... -

शुक, शांती नदीकाठांवर सुखद वावर​

गळ्याखाली पांढरे पट्टे आहेत. आखुड मान आणि रूंद तोंड आहे.
अन्नसाखळीतील महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या या पाणमांजराचा मासे, खेकडे, बेडूक आहार बनला आहे. माशांना पाठलाग करून पकडण्याइतकी चपळाई त्यांच्यात आहे. ती नदीकाठच्या झुडुपांमध्ये अधिक वेळ घालवितात. पूर्वी जिल्ह्यात पाणमाजरांची संख्या अधिक होती. गावोगावच्या नद्यांमध्ये त्यांचा मुक्त संचार असायचा; पण गेल्या काही वर्षात यांची संख्या अचानक कमी झाली. आता पुन्हा त्यांचे अस्तित्व ठळक दिसू लागल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगली बाब मानली जात आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water cat found in Shuk and Shanti rivers in Vaibhavwadi sindhudurg