चंदगड तालुक्यातील धामणे धरणाच्या गळतीकडे शासनाचे दुर्लक्ष

प्रभाकर धुरी
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

दोडामार्ग - धामणे धरणाला ठिकठिकाणी लागलेली गळती दोडामार्ग तालुक्‍यासह उत्तर गोव्यालाही धोकादायक ठरणारी आहे; मात्र ही गळती कालपरवाची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. गळतीमुळे धरणाला धोका असला, तरी शासन मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. हजारो लोकांचा जीव धोक्‍यात असताना शासन उंटावरून शेळ्या हाकत आहे. भविष्यात सर्वसामान्यांचे बळी जाण्याआधी जलसंपदा विभागाने धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची आणि गळती रोखण्याची गरज आहे. 

दोडामार्ग - धामणे धरणाला ठिकठिकाणी लागलेली गळती दोडामार्ग तालुक्‍यासह उत्तर गोव्यालाही धोकादायक ठरणारी आहे; मात्र ही गळती कालपरवाची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. गळतीमुळे धरणाला धोका असला, तरी शासन मात्र त्याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे. हजारो लोकांचा जीव धोक्‍यात असताना शासन उंटावरून शेळ्या हाकत आहे. भविष्यात सर्वसामान्यांचे बळी जाण्याआधी जलसंपदा विभागाने धरणाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याची आणि गळती रोखण्याची गरज आहे. 

धामणे हे कर्नाटक सीमेवरचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्‍यातील धरण. त्यातील पाण्याचा मात्र थेट संबंध येतो तो दोडामार्ग आणि उत्तर गोव्याशी. तिलारी घाटाच्या पायथ्याशी वीजघर येथे वीजनिर्मिती प्रकल्प आहे. त्यासाठी धामणे धरण बांधण्यात आले. धामणेतून पाणी कोदाळी धरणात व तेथून वीजनिर्मितीनंतर पाणी खरारी नदीतून तेरवण मेढेतील उन्नेयी बंधाऱ्यात सोडले जाते. तेथे पुन्हा वीजनिर्मिती करून पाणी कालव्यातून घोटगेवाडी, घोटगे, परमे, कुडासे , सासोली मार्गे गोव्यात शेती बागायतीसाठी दिले जाते. एरवी ते तिलारी नदीत सोडण्यात येते.

धामणे धरणात १९८४ पासून पाणी साठवण्यात येते. तिलारीचे धरण मातीचे तर धामणे दगडी आहे. धामणेची साठवण क्षमता चार टीएमसी आणि महत्तम पातळी ७५.२० मीटर एवढी आहे. साधारणपणे धरण क्षेत्रात  सरासरी ३००० मिमी पाऊस पडतो. या वर्षी मात्र पावसाने कहर केला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एका दिवसात ४६० मिमी एवढा पाऊस पडला, साधारणपणे ३००० मिमीवर पाऊस पोचेपर्यंत धरण तुडुंब भरायचे. या वर्षी ढगफुटी झाल्याने ४८४८ मिमी इतका विक्रमी पाऊस केवळ दोन महिन्यात पडला. त्यामुळे सहा आणि सात ऑगस्टला धरणाचे दोन्ही दरवाजे उघडले .तिसरा दरवाजा नादुरुस्त होता. तरीही पाणी अतिवेगाने उन्नेयी आणि स्वप्नवेल पॉईंटमार्गे केंद्रेतून तिलारीत पोचले. घोटगेवाडीपासून मणेरीपर्यंतच्या गावात पाणी घुसून हाहाकार माजला. कोनाळ, कोनाळकट्टा, वायंगणतड, साटेली, आवाडे, वेळपई मधल्या लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. नदी काठावरच्या गावांची पूररेषा बदलली. शेती बागायती पुराच्या तडाख्यात क्षणार्धात नाहीशा झाल्या. अनेकांनी मृत्यूचे दर्शन घेतले.

धामणे, कोदाळी, उन्नेयी आणि तिलारी धरणातील पाण्याने कमाल पातळी गाठल्याने दोडामार्ग आणि उत्तर गोव्यात या वर्षी हाहाकार माजला. भविष्यात धामणे धरण फुटले तर असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कारण धामणे धरणाला ठिकठिकाणी गळती लागली आहे. तिन्ही दरवाजांच्या दोन्ही बाजूच्या दगडी भिंतीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. पाणी भिंत फोडून धो धो कोसळते आहे. ३५ शी गाठलेले धरण गळतीमुळे कोसळण्याची भीती आहे. २०१३-१४ च्या दरम्यान गळती रोखण्यासाठी ग्रावटिंग करण्यात आले, तरीही गळती वाढतेच आहे. पाण्याची पातळी घटली की गळती कमी होते. त्यामुळे जलसंपदा विभाग आणि शासन सुशेगाद राहते. अर्थात ती वादळापूर्वीची शांतता आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

पावसाचा धोक्‍याचा इशारा 
धामणे धरण क्षेत्रात दिवसाला साधारणपणे ५० ते १६० मिमी तर पूर्ण हंगामात किमान १५१७ तर कमाल  ४०७६ मिमी इतका पाऊस पडतो; मात्र या वर्षी २८ ऑगस्टपर्यंत ४८४८ एवढा पाऊस पडला. पूर्ण पावसाळ्यात जेथे कमाल ४००० मिमी पाऊस पडतो. तेथे पावसाळा संपण्याआधी पावसाने ५००० चा टप्पा ओलांडणे ऐतिहासिक विक्रम, तसाच भविष्यातील धोक्‍याचा इशाराही आहे.

कोल्हापूर, बेळगावला धोका नाही 
धरणाच्या वरच्या बाजूला असलेल्या तुड्ये, हाजगोळी, शिनोळी, सरोळी, ढेकोळी या कोल्हापूरमधील आणि राकसकोप, उचगाव, येळेबई या बेळगावमधील गावांना धरणातील पाण्यामुळे धोका नाही. धरणाच्या खालच्या बाजूला कर्नाटक किंवा कोल्हापूरमधील गावांनाही धोका पोचणार नाही. धरणाच्या खाली असलेल्या अडक्‍याचा वझर म्हणजेच तिलारी फॉलच्या आणि धरणाच्या पाण्यामुळे दोडामार्ग आणि उत्तर गोव्यातील गावांना मात्र धोका आहे.

धामणे धरणाला अनेक वर्षांपासून गळती आहे. मधल्या काळात गळती रोखण्याची कामेही करण्यात आली. २०१४ पासून मात्र गळती रोखण्याचे काम निधीअभावी होऊ शकलेले नाही. धरण सुरक्षितता समितीच्या पाहणीनंतर त्या कामासाठी सुमारे सात कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले आहे. तसेच ड्रिप योजनेअंतर्गत गळती प्रतिबंधक उपाययोजना आणि अन्य कामे घेण्यात येणार आहेत. असे असले तरी धरणाला मात्र अजिबात धोका नाही.
-  रा. र. धाकतोडे,
कार्यकारी अभियंता, तिलारी पाटबंधारे प्रकल्प

धामणे कुठे आहे?
धामणे धरण कोल्हापूर जिल्ह्यात असले तरी धामणे नावाचे गाव कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यात धरणाच्या बाजूला आहे. महाराष्ट्राने धामणेतील जागा धरणासाठी संपादित केली. त्यामुळे धरणाचे नाव धामणे पडल्याचे समजले. धरणाकडे जाणारा रस्ता कर्नाटकच्या वनजमिनीतून जातो, तर धरणाचा सगळा कारभार चंदगडऐवजी तिलारी आणि चराठे येथून चालतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water leakage from Dhamne Dam