हर्णे जवळील खेम धरणालाही मोठया प्रमाणात गळती

हर्णे जवळील खेम धरणालाही मोठया प्रमाणात गळती

दाभोळ - चिपळूण तालुक्‍यातील तिवरे धरण काल मध्यरात्री फुटले. पण या घटनेमुळे कोकणात गळती असणाऱ्या धरणांच्या परिसरात भीती व्यक्त केली जात आहे. दापोली तालुक्‍यातील हर्णे जवळील खेम धरणालाही मोठया प्रमाणात गळती लागली असून या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्‍नही आता ऐरणीवर आला आहे. 

हर्णे व परिसरातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 1974 मध्ये खेमधरण बांधण्यात आले. याचे बांधकाम दगडी आहे. या धरणाच्या भिंतीला तडे गेले असून त्यातून मोठया प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. दरवर्षी पावसाळा आला की राजकीय पक्षांकडून या ठिकाणी पावसाळी पर्यटन केले जाते व या धरणाची दुरुस्ती केली जाईल व पुनर्बांधणी केली जाईल असा आश्‍वासनांचा पाऊस पाडला जातो.

गेल्यावर्षीही मंत्री रवींद्र वायकर, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या धरणाच्या ठिकाणी पहाणी करून या धरणाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला जाईल असे आश्‍वासन दिले होते. या खेम धरणाच्या गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळावा, यासाठी 10 जुलै 2018 रोजी नागपूर येथे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेत खेम धरणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत धरणाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले नाही तर भविष्यात धरणाखालच्या गावांना धोका उत्पन्न होऊ शकतो व आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गिरीश महाजन यांना होती. 

हे धरण जिल्हा परिषद रत्नागिरीच्या आधिपत्याखाली असून ते जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करून या धरणाच्या दुरुस्तीसाठी 3.5 कोटी रुपयांचा निधी देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. खेम धरणाची एकूण क्षमता 13.50 एम.सी.एफ.टी. इतकी असून रत्नागिरी जिल्हा परिषदेला या धरणाची दुरुस्ती करणे आर्थिक दृष्ट्या शक्‍य नाही. त्यामुळे कोकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे व जलसंपदा विभाग यांच्यामार्फत या धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून तातडीने या धरणाची दुरुस्ती करून घ्यावी असे या बैठकीत ठरले होते. 

या बैठकीनंतर हर्णे परिसरात आनंद व्यक्‍त करण्यात आला होता. अभिनंदनाचे फलकही हर्णे परिसरात लावण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी एक दमडीदेखील शासनाकडून मिळाली नसल्याचे दिसून येत असून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी हे धरण भरले असून त्यातून पाण्याची गळती सुरू झाली आहे. . 

जलसंधारण मंत्रालयाने खेम धरणाच्या दुरुस्तीसाठी 3.5 कोटीचा निधी जिल्हा नियोजन व विकास समिती रत्नागिरी यांनी द्‌यावा असे म्हटले होते. मात्र डीपीडीसीकडे एवढ्‌या निधीच तरतूद नसल्याने खेम धरणाची दुरुस्ती होऊ शकली नाही. यावेळीही हर्णेवासियांवर या धरणाची टांगती तलवार असून तीवरे धरणाप्रमाणे शासन खेम धरणही फुटण्याची वाट पहात आहे. 
- आमदार संजय कदम,
दापोली विधानसभा 

हर्णे परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या खेम धरणाला मोठया प्रमाणात गळती लागली असून या धरणाला मोठा धोका आहे. दरवर्षी मंत्री, अधिकारी या धरणाला भेट देउन हे धरण दुरुस्त केले जाईल असे आश्‍वासन देतात, आश्‍वासनापलीकडे अजूनपर्यंत काहीही झालेले नाही. सरकार तिवरेच्या धरणासारखी खेम धरणही फुटण्याची वाट पहात नाही ना 
- अंकुश बंगाल
, माजी सरपंच हर्णे ग्रामपंचायत 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com