लांजा तालुक्यातील आंजणारीत रसायनाने ‘पाणीबाणी’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

रत्नागिरी - आंजणारीतील (ता. लांजा) अपघातामुळे तालुक्‍यात पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. हजारो लिटर रसायन काजळी नदीपात्रात मिसळले. हे पाणी ८ ग्रामपंचायती, पालिका, एमआयडीसी, खासगी लोक पिण्यासाठी वापरतात.

रत्नागिरी - आंजणारीतील (ता. लांजा) अपघातामुळे तालुक्‍यात पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. हजारो लिटर रसायन काजळी नदीपात्रात मिसळले. हे पाणी ८ ग्रामपंचायती, पालिका, एमआयडीसी, खासगी लोक पिण्यासाठी वापरतात. एमआयडीसीने तत्काळ पाणीपुरवठा बंद केला.  जिल्हा प्रशासनाने आज यासंदर्भात बैठक घेऊन हा निर्णय घेतला.

तहसीलदारांच्या आदेशावरून एमआयडीसीने पाणीपुरवठा बंद केला. जोवर हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळत नाही. तोवर हा पाणीपुरवठा केला जाणार नाही. काजळी नदीचे पाणी हरचेरी भागात अडवून तेथून ते पुरवले जाते.

रसायन नदीपात्रात मिसळल्याने हे पाणी दूषित झाले आहे. पाण्याचे नमुने पुणे, मिरज आणि कोल्हापूरला तपासण्यासाठी पाठविले जाणार आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर पाणीपुरवठ्याबाबतचा पुढील निर्णय होणार आहे. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतील मशिन बंद पडल्याने नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवावे लागणार आहेत.  

‘त्या’ कंटेनकरमध्ये १८ हजार लिटर रसायन होते. त्यापैकी ८५ टक्के पाण्यात मिसळले. मात्र पाण्यात जाईपर्यंत त्याची तीव्रता कमी झाली असावी. पाण्याची गरज लक्षात घेऊन तत्काळ स्वतंत्र गाडीने नमुने पुण्याला पाठविले आहेत. लवकरात लवकर अहवाल मिळण्यासाठी प्रयत्न आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. 

पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही  
एमआयडीसीने अचानक पाणीपुरवठा बंद केल्याने लोकांची गैरसोय झाली आहे. पाणीपुरवठा का बंद केला, याची कल्पनाही ग्राहकांना नाही. किती दिवस पुरवठा बंद आहे, याची कल्पना नाही आणि त्याला पर्याय व्यवस्था काय हेही अजून स्पष्ट झालेले नाही. 

काजळी नदीच्या पाण्याचे नमुने घेतले आहेत, मात्र आमचे खाते वेगळे पडते. आमचा अहवाल ग्राह्य धरला जाईल की नाही, माहीत नाही, मात्र आमच्या पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. 
- इंदिरा गायकवाड,
प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ 
 

अशी आहे स्थिती

  •  पाणी पिण्यास अयोग्य
  •  ८ ग्रामपंचायती, उद्योग, रत्नागिरी शहराला फटका
  •  दिवसाला होतो ९ एमएलडी पाणीपुरवठा
Web Title: water pollution in Anjnari in Lanja Taluka