#WaterScarcity पहाटेपर्यंत पाण्यासाठी गावकरी विहिरीत

राजेश कळंबटे
सोमवार, 13 मे 2019

पाणी तत्काळ मिळवून देण्याचे आदेश मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाला देत आहेत; मात्र रत्नागिरीत केळ्येसारखी गावे टॅंकरपासून वंचित ठेवली जातात. गेले दोन महिने पड्यारवाडीतील सत्तर कुटुंबे पाणी पाणी करत आहेत.

रत्नागिरी - उन्हातान्हात दिवसभर काम करून दमूनभागून 
घरी आल्यावर विश्रांतीपेक्षा चलबिचल सुरू होते ती घरातील रिकाम्या हंडा-कळशी भरण्यासाठी. त्राण नसतानाही किर्र काळोखात पाण्यासाठी आटापिटा सुरू होतो. विहिरीतील कोरड्या कातळात बोटभर झऱ्यातून साठलेले पाणी मोबाईलच्या बॅटरी प्रकाशात भरण्याची चढाओढ पहाटेपर्यंत सुरू राहते. पाण्यासाठीचा हा रात्रीस खेळ मराठवाड्यात नव्हे, तर तीन हजार मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या कोकणच्या कुशीतील केळ्ये-पड्यारवाडीत सुरू आहे.

पाणी तत्काळ मिळवून देण्याचे आदेश मुख्यमंत्री जिल्हा प्रशासनाला देत आहेत; मात्र रत्नागिरीत केळ्येसारखी गावे टॅंकरपासून वंचित ठेवली जातात. गेले दोन महिने पड्यारवाडीतील सत्तर कुटुंबे पाणी पाणी करत आहेत. सायंकाळी जेवणं झाली की घरातील पुरुष मंडळींसह महिला, चिमुरडी रिकामी भांडी घेऊन वाडीपासून फर्लांगभर सार्वजनिक विहिरीवर जातात. पायवाटेवर पथदिवे नाहीत. त्यामुळे मोबाईलच्या बॅटरीची साथ. रिकामी भांडी भरण्यासाठी कोरड्या विहिरीत उतरण्याचे धाडस करावेच लागते. पायऱ्यांचा आधार घेत गावकरी विहिरीत उतरतात. तळाच्या एका कोपऱ्यात छोट्याशा झऱ्यात साचलेले पाणी वाडग्याने हंडा कळशीत भरतात. दोन, तीन भांडी भरल्यानंतर पुन्हा थांबायचे. सगळी भांडी भरायची असतात. मग त्यासाठी पहाट विहिरीतच उजाडते. गेली अनेक वर्षे पाण्यासाठीची ही कसरत सुरू आहे.

विरोधाभास म्हणजे शहरापासून एका बाजूला असलेल्या केळ्ये गावाजवळ सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर शिळ धरण आहे. ते गावाला निरुपयोगी. दरवर्षी एप्रिल महिना आला की पाण्यासाठीची जीवघेणी लढाई सुरू होते. ती यावर्षी मार्च महिन्यातच सुरू झाली. विहिरीने एक महिना आधी तळ गाठला. गावात खासगी विहिरी ही या लोकांची अडचण. कारण त्यामुळे प्रशासनाने गेली दोन वर्षे टॅंकर नाकारला.

पाण्यासाठीचा हा गोंधळ अनेक वर्षे सुरू आहे. उन्हाळा आला की वाडीतील महिलावर्गाला ही कसरत करावीच लागते. कधी दिवसा तर कधी रात्री विहिरीतून पाणी भरावे लागते.
- सुजाता खवळे,
ग्रामस्थ

विंधनविहिरीसाठी आमदारांनी निधी देऊ केला; मात्र जागा नाही ही बाब आडवी आली. अंतर्गत वादामुळे पाण्याचा प्रश्‍न जैसे थे राहिला. दुसरा उपाय म्हणून दुसरी विहीर खोदली, तिला पाणीच लागले नाही.
-सिद्धी वाडकर,
सदस्य, ग्रामपंचायत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water scarcity in Kale Padyarwadi in Ratnagiri district