संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी धनगरवाडीत पाणी टंचाई

संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी धनगरवाडीत पाणी टंचाई

देवरूख - भरउन्हात शेतीची कामे करताना घरसंसार सांभाळायचा आणि आता त्यात घोटभर पाण्यासाठी रात्रभर जागायची वेळ संगमेश्‍वर तालुक्‍यातील साखरपा विभागातील मुर्शी धनगरवाडी आणि दख्खन-धनगरवाडीतील ३१० कुटुंबांवर आली आहे. विहिरीत पाणीच नसल्याने डबक्‍यात साठणारे पाणी घ्यायचे आणि दिवस काढायचा असे येथील ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत.  

साखरपाजवळच्या दख्खन धनगरवाडीची लोकवस्ती आहे २५०. या भागात पाण्यासाठी विहीर आहे; मात्र तिने केव्हाच तळ गाठला आहे. रात्रभर डबक्‍यात साठेल तेवढे पाणी मिळवायचे आणि दिनचर्या उरकायची अशी कसरत येथील महिला करीत आहेत. दख्खन धनगरवाडीसाठी नवीन विहीर खोदून झाली आहे; पण वाडीपासून ती दोन किलोमीटर दूर आहे. या विहिरीवर नळपाणी योजनाही मंजूर आहे; मात्र आचारसंहितेमुळे काम थांबले आहे. दख्खन धनगरवाडीसाठी ग्रामपंचायतीने नऊ एप्रिल रोजीच टॅंकरची मागणी केली; मात्र अद्याप टॅंकर सुरू झाला नाही.

त्यामुळे ग्रामस्थांचे हाल सुरूच आहेत. शेजारीच असलेल्या मुर्शी-धनगरवाडीतही तशीच स्थिती तेथील ६० कुटुंब अनुभवत आहेत. पाण्यासाठी अतोनात हाल, रात्रपाळी करून कातळातून झिरपणारा एक एक थेंब साठवून तहान भागवण्याची वेळ आली आहे. 

मुर्शी-धनगरवाडीची समस्या सोडविण्यासाठी मुर्शी भेंडीचा माळ येथे चौदाव्या वित्त आयोगातून बोअरवेल खोदण्यात आली आहे; मात्र हे ठिकाणही मुख्य वस्तीपासून दूर असल्याने महिलांचे हाल होत आहेत. हातपंपाने मिळेल तेवढे पाणी घेत पायपीट करावी आहे. मुर्शी गावात टंचाई जाणवू नये, यासाठी काजळी नदीवर आठ कच्चे बंधारे बांधले, मात्र नदी कोरडी पडल्याने बंधाऱ्यांतही थेंबभर पाणी शिल्लक नाही. 

चार दिवसांनी पाणीपुरवठा
मुर्शी दख्खन गाव, आठ वाड्यांना नळपाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाणीपातळी यावर्षी लवकर खालावली. त्यामुळे मुर्शीतील दळवीवाडी, बौद्धवाडी, घुमेवाडी,  खैरवाडी, हेळ्याचीवाडी, सहाणेचीवाडी, गाडेवाडी, सुवरेवाडी या वाड्यांना चार दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com