सावंतवाडी तालुक्‍यात विहिरींनी गाठला तळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

एक नजर

  • सावंतवाडी तालुक्‍यात पाणीटंचाईची झळ नसली तरी विहिरींनी गाठला तळ. 
  • पुढील दीड महिना पाणी पुरेल का? याची ग्रामस्थांना चिंता. 
  • दरवर्षीच्या तुलनेत यंदा तीव्र उष्णतेच्या झळा.
  • पाऊसही सरासरीपेक्षा या वर्षी काहीसा कमीच
  • आत्तापासून पाणी जपून वापरण्याची गरज. 

सावंतवाडी - तालुक्‍यात पाणीटंचाईची झळ नसली तरी विहिरींनी तळ गाठला आहे. बऱ्याच गावात हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुढील दीड महिना पाणी पुरेल का? याची ग्रामस्थांना चिंता जाणवत आहे. 

दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी उष्णतेच्या झळा मोठ्या प्रमाणात बसत आहेत. पाऊसही सरासरीपेक्षा या वर्षी काहीसा कमीच कोसळला. या सर्वाचा परिणाम सध्या जाणवत असून विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळेच आत्तापासून पाणी जपून वापरणे ग्रामस्थांच्या नशिबी आले आहे. 

तालुक्‍यातील न्हावेली, निरवडे, सोनुर्ली, वेत्ये, निगुडे, मळगाव तर सह्याद्री पट्ट्यातील काही भागात ही परिस्थिती आहे. सोनुर्ली पाक्‍याचीवाडी येथे तर विहिरींनी अक्षरक्षः तळ गाठल्याने ग्रामस्थांना आत्तापासून पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

सध्यस्थितीत ग्रामपंचायतींच्या दोन नळ योजनेच्या विहिरी आहेत; मात्र त्यांनीही तळ गाठल्याने आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गावात पाण्याचा अन्य कुठलाही स्त्रोत नसल्याने केवळ विहिरीच्या पाण्यावरच अंवलबून राहावे लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या मे मध्ये या ठिकाणी पाणीटंचाईची शक्‍यता नाकारता येत नाही. शिवाय पाऊस वेळेवर न पडल्यास तीव्र टंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीतीही व्यक्‍त होत आहे. 

पंचायत समितीच्या माध्यमातून दरवर्षी टंचाई आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार कामांचे नियोजनही होते; मात्र मुळात पाण्याची पातळीच खोल गेल्याने पाणीटंचाई आराखडे राबवूनही काहीच फायदा होताना दिसत नाही. 

या व्यतिरिक्‍त बऱ्याच गावात एप्रिल, मे या अंतिम टप्प्यात सुरू करण्यात येणारी बांधकामे व सार्वजनिक विहिरीवर खासगी पंपाने करण्यात येणारा पाणी उपसा ही दोन्ही कारणे पाणीटंचाईला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतस्तरावर या संदर्भात विचार विनिमय होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी याबाबत तयारी दर्शविल्यास पाणीटंचाई आटोक्‍यात आणण्यात मदत होईल. शिवाय खासगी पंप लावण्याऱ्यावर कायदेशीर मार्गाने बंदी आणल्यासही पाणीटंचाई रोखली जाऊ शकते. 

शिरंशिगे-वीरवाडी येथे पाणीटंचाईची तक्रार पंचायत समितीत आली आहे. येथे उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तालुक्‍यात अन्य ठिकाणच्या तक्रारी नाहीत, तरीही काळजी घेतली जाईल. 
- गजानन भोसले,
गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावंतवाडी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water scarcity in Sawantwadi Taluka