
खेडमध्ये जलस्रोत आटले; २,४८८ ग्रामस्थ तहानलेले!
खेड : तालुक्यात पाणीटंचाई रौद्र रूपच धारण करू लागली आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या १६ वर स्थिरावली असली तरी तहानलेल्या वाड्यांची संख्या मात्र ३२ वर पोहचली आहे. या गाववाड्यांतील २४८८ ग्रामस्थांना पाण्यासाठी आक्रोश करावा लागत आहे. या टंचाईग्रस्त गाववाड्यांची सारी भिस्त १ शासकीय व ३ खासगी टॅंकरवरच अवलंबूनच आहे.
आतापर्यंत पाण्यासाठी टॅंकरच्या २०५ फेऱ्या धावल्या आहेत. गतवर्षीच्या २० हून अधिक गावांच्या तुलनेत यावर्षीची पाणीटंचाई कमी असली तरी गेल्या काही दिवसांपासून उष्म्याने उच्चांक गाठल्याने उपलब्ध पाण्याचे जलस्रोत आटत चालले आहेत. याचमुळे गेल्या काही दिवसांत तहानलेल्या वाड्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मोहाने, ऐनवली-बंगालवाडी, मोहल्ला, पोसरेबुद्रुक-सडेवाडी, खोपी-रामजीवाडी, केळणे-मागलेवाडी, भोसलेवाडी, नांदीवली -देऊळवाडी, बौद्धवाडी, अस्तान-धनगरवाडी, खवटी-खालचीवाडी, वरचीवाडी, धनगरवाडी, घेरारसाळगड-निमणी, धनगरवाडी, कुळवंडी-शिंदेवाडी, तिसंगी -धनगरवाडी, तुळशी खुर्द, तुळशीबुद्रुक, कुबजई-धनगरवाडी या वाड्यांमध्ये पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याशिवाय आंबवली-भिंगारवाडी, मांडवे, वाडीबेलदार, शिरगाव-बागवाडी, कोंदवाडी, पिंपळवाडी, गवळीवाडी, कशेडी-बोरटोक, बंगला, शिंदेवाडी, थापेवाडी, सुसेरी-सावंतवाडी, मधलीवाडी, कदमवाडी, जाधववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी आदी वाड्यांना पाणीटंचाईची भीषण झळ बसत आहे.
संख्या वाढतच चालली
१६ गावे, ३२ वाड्यांतील २४८८ ग्रामस्थ पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत. या गाववाड्यांना पंचायत समितीकडून एक दिवसाआड पाणीपुरवठा करून तहानलेल्या ग्रामस्थांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रशासनाकडे यापूर्वी अवघा एकच शासकीय टॅंकर उपलब्ध होता; मात्र सद्यःस्थितीत ३ खासगी टॅंकर प्रशासनाकडे उपलब्ध आहेत. एकीकडे टंचाईग्रस्त गाववाड्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मात्र अपुऱ्या टॅंकरमुळे तहानलेल्या गाववाड्यांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाक होत आहे.
Web Title: Water Sources Khed Are Blocked Villagers Thirsty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..