मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा...

watermelon damaged konkan sindhudurg
watermelon damaged konkan sindhudurg

वैभववाडी (सिंधुदुर्ग) -  मल्चिंग, ठिंबक सिंचन, उत्तम खतव्यवस्थापन आणि गरजेनुसार सुक्ष्म अन्न द्रव्य आणि किटकनाशकांचा वापर या अशा सुक्ष्म नियोजनामुळे जिल्ह्यातील गडमठ येथील दीपक कासोटे यांची आठ एकर कलिंगड वेलांना कमालीची फळधारणा झाली. पहिल्या टप्प्यात लागवड केलेल्या एक एकरमधुन त्यांनी सरासरी 28 टन उत्पादन घेतले. त्याला दरही 10 रुपये मिळाला. त्यामुळे सात एकरमधुन त्याचपद्धतीने उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती; परंतु "कोरोना'ने होत्याचे नव्हते केले. त्यांचा संघर्ष पाहिला तर `मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा`, या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी तत्काळ अठवतात. 

आतापर्यंत बागेतील 40 टन माल वाया गेला आहे; परंतु ते हिंमत हरलेले नाहीत. जितका माल विकता येईल तितका थेट विक्रीतुन करीत आहेत. एकीकडे माल खराब होत आहे तर दुसरीकडे उर्वरित एकरातील वेलांवर फवारणी, त्यांना खते द्यायची त्यांनी बंद केलेली नाहीत. 
जिल्ह्यातील गडमठ येथे भाडेतत्वावर पंधरा ते वीस एकर जमीन घेवुन कोल्हापूर जिल्ह्यातील दीपक कासोटे आणि त्यांचे कुटुंबिय विविध प्रकारची शेती करीत आहे. बीएस्सी ऍग्रीकल्चरची पदवी घेतल्यानंतर कुटुंबासोबत शेतीतच करियर करायचे ठरविले. सुरूवातीला त्यांनी दहा एकरात केळी केली.

हे पीक त्यांनी अनेक वर्षे घेतले; परंतु केळीच्या दरातील चढउतारामुळे त्यांनी पाच-सहा वर्षांपासून काही एकरात ऊस शेती तर काही एकरांत कलिंगड, अशी पिके घेत आहेत. यावर्षी त्यांनी आठ एकर जमिनीत कलिंगड लागवडीचा निर्णय घेतला. आठही एकरात त्यांनी मल्चिंग, ठिंबक सिंचनचा वापर त्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार त्यांनी टप्प्या-टप्प्याने कलिंगड लागवड केली. आठ दिवसांच्या फरकाने एक-एक एकरातील माल तयार होईल, अशी पद्धतीने त्यांनी स्वतःच रोपे तयार करून लागवड केली. शेणखत, रासायनिक खते, सुक्ष्म अन्नद्रव्य, गरजेनुसार कीटकनाशकांच्या फवारण्या त्यांनी केल्या. त्यामुळे कलिंगड वेलांना कमालीची फळधारणा झाली.

जिल्ह्यात सरासरी एकरी 20 ते 22 टन उत्पादनक्षमता आहे; परंतु श्री. कासोटे यांनी पहिल्या एक एकरमधुन तब्बल 28 टन उत्पादन घेतले. त्याचा सर्व माल व्यापारी घेवुन गेला. त्यानंतर 19-20 मार्चला पुन्हा व्यापारी मालाची उचल करणार होता; परंतु त्याच कालावधीत गोवा सरकारने संचारबंदी लागू केली. त्यापाठोपाठ दोन दिवसांनी देशात लॉकडाऊन केले. परिणामी तयार झालेला तब्बल 40 टनापेक्षा अधिक माल शेतातच सडण्याची प्रकिया सुरू झाली.

सुरूवातीला संपुर्ण फळावर वेलांचे पांघरून घालुन फळ अधिक काळ टिकण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले; परंतु त्यानंतर मात्र फळे जमिनीवरच कुजु लागली. जितका माल स्थानिक पातळीवर विक्री करणे शक्‍य होता तितका विक्री करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. दीड एकरामधील मालांची विक्री झाली तर दीड एकरमधील माल पूर्णपणे वाया गेला. दोन एकर जमिनीतील फळे चार-पाच दिवसांत तयार होतील तर तीन एकरातील फळे आठ ते दहा दिवसांनी परिपक्व होतील.

एकीकडे अतिशय कष्टाने तयार केलेल्या बागेतील दहा-बारा किलोची शेकडो फळे सडुन जात आहेत. तरीही श्री. कासोटे हिंमत हरलेले नाहीत; परंतु उर्वरित क्षेत्रातील वेलांना खते देणे, फवारणी करणे त्यांनी सोडलेले नाही. जे काही व्हायचे ते होऊ दे; पण पिक अर्ध्यावर सोडायचे नाही अशी त्यांची भूमिका आहे. अंदाजे दीडशे टन माल उत्पादित होणार आहे. त्याची विक्री करणे हे मोठे संकट त्यांच्यासमोर आहे; परंतु ते अजिबात डगमगलेले नाहीत. 

आठ एकरातून सरासरी दोनशे टन कलिंगड उत्पादन अपेक्षित होते. एक एकरात 28 टन माल मिळाला. त्याला दरही 10 रूपये प्रतिकिलो मिळाला. पुढची उचल 19 तारखेला होणार होती; परंतु लॉक डाऊन झाले. ज्या स्टॉलवर व्यापारी माल देत होता ते स्टॉल बंद झाले. आतापर्यंत चाळीस टन माल वाया गेला. आता 120 ते 140 टन माल परिपक्व होणार आहे. त्याचे करायचे काय असा प्रश्‍न आहे. 
- दीपक कासोटे, शेतकरी, गडमठ, वैभववाडी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com