esakal | शस्त्र वापरणाऱ्यांच्या संख्येत होतेय वाढ;
sakal

बोलून बातमी शोधा

शस्त्र वापरणाऱ्यांच्या संख्येत होतेय वाढ

शस्त्र वापरणाऱ्यांच्या संख्येत होतेय वाढ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात शस्त्र वापरणाऱ्याची संख्या वाढताना दिसत आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार ९३८ शस्त्र (Weapon) परवाने देण्यात आले आहेत. यात तब्बल ३ हजार ३० परवाने हे शेती संरक्षण तर ९०८ हे स्वसंरक्षण परवाने आहेत. स्वसंरक्षणमध्ये जास्त करून राजकीय व्यक्ती व विविध व्यावसायिकांचा समावेश आहे.(weapons-using-people-increase-in-sindhudurg-crime-marathi-news)

प्रामुख्याने शेतीची संरक्षण आणि स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाने दिले जातात. जिल्ह्यात सध्या ३९३८ शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. यात तब्बल ३०३० परवाने हे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या संरक्षणासाठी घेतले आहेत. तर ९०८ जणांनी स्वसंरक्षण करण्यासाठी शस्त्र परवाना घेतला आहे. स्वसंरक्षण परवाने हे जास्त करून शहरी भागातील असून यात राजकीय व्यक्ती आणि मोठे व्यावसायिक यांचा समावेश आहे. परवाने दिलेली

सर्व शस्त्रे लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात स्थानिक पोलीस ठाण्यांकडे जमा केली जातात. जिल्ह्यात अजून शेती संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना शस्त्र परवान्यांची गरज आहे. त्यासाठी प्रस्तावही नागरिकांनी प्रशासनाकडे केले आहेत; मात्र कोरोना कालावधी असल्याने परवाना देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली नाही. त्यामुळे हे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.

गैरवापर नाही

जिल्ह्यात सध्या ३९३८ शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. परवाने घेणाऱ्यांमध्ये बहुतांश जण हे शेतकरी, व्यावसायिक आणि राजकारणी आहेत. परवानाधारक शस्त्रांनी आतापर्यंत गुन्हे झाल्याचे कधीच समोर आलेले नाही. असे असले तरी देखील परवाने देताना जिल्हा पातळीवर नियम आणखी कडक करण्याची गरज आहे.

असा करता येतो प्रस्ताव

शस्त्र परवाना काढण्यासाठी अत्यंत क्लिष्ट प्रक्रियेला सामोरे जावे लागते. त्यासाठी शस्त्र हाताळण्याच्या प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देण्यात येते. शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याकडे जागा आहे का? हे देखील अर्जात दाखल करावे लागते. त्यासोबतच ज्याच्या नावाने शस्त्र परवाना घ्यायचा आहे त्याची शारीरिक तंदुरुस्ती देखील सिद्ध करावी लागते. पोलिस अधीक्षक कार्यालयाचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासोबतच ओळखपत्र, फोटो पुरावा, जन्म तारखेचा पुरावा ही कागदपत्रे सादर करावी लागतात.

जिल्ह्यात शस्त्र परवाने शस्त्रे सांभाळणे जिकिरीचे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ३९३८ जणांकडे शस्त्र परवाना आहे; मात्र हे परवाना असलेले शस्त्र सांभाळणे कठीण असते. जुन्या शस्त्रांमध्ये लॉक करण्याची सोय नसते. त्यामुळे या शस्त्रांमधून अनावधानाने गोळी सुटू शकते. त्या सोबतच रिव्हॉल्व्हर आणि मॅग्झीन असलेले पिस्तुलची काळजी घ्यावी लागते. मॅग्झीन असलेले पिस्तुलांमध्ये गोळी कधीही लॉक होऊ शकते; मात्र आता नव्याने आलेल्या पिस्तूलला लॉकिंगची सोय असते. त्यात लॉक उघडल्यावर आणि ट्रिगर दाबल्यावरच गोळी सुटते.

हेही वाचा- व्हिएतनामवर सांगलीची मात; साडेपाचशे एकरांमध्ये ड्रॅगनची क्रांती

शेती संरक्षण परवाना

शस्त्र परवाना देण्यासाठी शासनाने निकष ठरवून दिले आहेत. शेती व स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला जात असला तरी निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना हा परवाना दिला जातो. निकष पूर्ण करणाऱ्या व त्यांनी केलेल्या प्रस्तावानुसार गरज असलेल्या व्यक्तिनांच हा परवाना दिला जातो.

- के. मंजूलक्ष्मी, जिल्हाधिकारी

निकष कडक

अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्यामुळे गुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने शस्त्र परवाने देताना काटेकोरपणे पडताळणी करून दिले जात आहेत. शस्त्र परवाना देताना आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. गेल्या चार वर्षात शस्त्र परवाने देण्याची संख्या देखील कमी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केवळ गरजेपुरते राजकीय किंवा व्यावसायिकांनाच परवाने दिले जात आहेत.

loading image