
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड-19 विषयक नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना
ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात सर्व नगरपालिका, पंचायत व ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले. मास्क न वापरणाऱ्यांना 200 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोनाची स्थिती आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, नगरप्रशासन अधिकारी वैभव साबळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड-19 विषयक नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे, अशा सूचना देऊन मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ""लग्नसमारंभासारख्या कार्यक्रमामध्ये 50 एवढ्याच मर्यादित लोकांची उपस्थिती राहील, असे आयोजकांनी पाहावे. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांनीच उपस्थित राहावे. कोरोना तपासणीचे प्रमाण वाढवा. कोविड केअर सेंटर्स कार्यान्वित करण्यासाठी तसेच गृह अलगीकरणाविषयी काटेकोर अंमलबजावणी करावी.''
हेही वाचा- कोकणात राडा : दोन कुटुंबांत हाणामारी; सात जण जखमी
सध्या महाविद्यालये सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही कोरोना तपासणी करा. जत्रांबाबत मंदिरांचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांच्याही तपासण्या करा. लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होईल, असे नियोजन करा, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जत्रेच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून लोकांनी गाफिल न राहता कोरोनाचे नियम पाळावेत. कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियम कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने नियमांची कडक अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- कोकणात पावसाची एंट्री ; बागायतदार चिंतेत
असा होईल दंड
विनामास्क सार्वजनिक ठिकाणी फिरल्यास ः 200 रुपये
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ः 1000 रुपये
ही घ्या दक्षता
सतर्कता बाळगा, वारंवार हात धुवा
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे
सामाजिक अंतराचे पालन करा
मास्कसह सॅनिटायझरचा वापर करावा
गर्दी करून कार्यक्रम साजरे करण्यात येऊ नयेत
राजस्थान, दिल्ली, गोवा, गुजरात, केरळमधून येणाऱ्यांची माहिती प्रशासनास द्या
अशांची कोरोना चाचणी करा, अहवाल येईपर्यंत त्यांना गृह अलगीकरणात ठेवा
संपादन- अर्चना बनगे