तुमचं जनावर चोरीला गेले आहे ? आता ते परत मिळु शकतं ; कसे ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

लसीकरण केलेल्या पशुधनास नोंदणीमुळे एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होणार आहे.

रत्नागिरी : जनावरांचे पायलाग रोगापासून संरक्षण करण्यासाठी पशुधनांचे लसीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही नोंदणी जनावर दगावल्यास, पुरात वाहून गेल्यास किंवा ते चोरीला गेल्यास या टॅग क्रमांकावर पशुधन मालक निश्‍चिती करण्यास मदत होणार आहे. त्यासाठी पशुधन मालकांनी पुढे यावे, असे आवाहन पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. विवेक पनवेलकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. अभिजित कसालकर यांनी केले आहे.

हेही वाचा - खातेदारांनो तुमची प्रतिक्षा आता संपली ; एका महिन्यात मिळणार मोबदला 

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार १ सप्टेंबर ते १५ ऑक्‍टोबर या कालावधीत पायलाग लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेत लसीकरण केलेल्या पशुधनास बारा अंकी नंबर नोंदविण्यात येणार आहे. त्याची नोंद इनाफ प्रणालीवर केली जाणार आहे. लसीकरण केलेल्या पशुधनास नोंदणीमुळे एक स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होणार आहे. जनावरांचे पायलाग रोगापासून होणाऱ्या संरक्षणाव्यतिरिक्त आपले पशुधन चोरीस गेल्यास, त्या पशुधनाच्या मुळ मालकाची ओळख पटविण्यास मदतही होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत जनावर दगावल्यास किंवा पुरात वाहुन गेल्यास टॅग क्रमांकावर पशुधनाचा मालक निश्‍चिती करण्यास मदत होईल.

लसीकरण कार्यक्रमावर संनियंत्रण ठेवण्यासाठी तालुकास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन केली आहे. तालुका संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या उपस्थितीत सोमवारी (६) आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उत्तम सावंत उपस्थित होते. ग्रामपातळीवर लसीकरणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास पशुपालकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देवून आपले पशुधनास पायलाग लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा -  बघा... काय निसर्गाची लहर...! तब्बल महिण्याआधीच मोहर 

खासगीरीत्या मोहिमेत सहभागी होता येणार

लसीकरण शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत होणार आहे. खात्यातील सेवानिवृत अधिकारी, कर्मचारी तसेच पशुसंवर्धन विषयक सुशिक्षीत बेरोजगार असल्यास त्यांचाही समावेश केला जाईल. लसीकरण १०० टक्‍के पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. खाजगीरीत्या लसीकरण मोहीमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखाना, पशुचिकित्सालय झाडगाव किंवा पशुधनविकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन 
केले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when cattle, cow stray or dead then the new Livestock vaccination program in konkan