सगळं तर सुरु झालं मग वाचनालच कधी ?

मकरंद पटवर्धन
Wednesday, 2 September 2020

वाचनालये बंद झाल्यामुळे वाचनालयातील सभासदांना वितरित केलेली पुस्तके सभासदांकडे 5 महिन्यांपेक्षा जास्त काळ पडून आहेत.

रत्नागिरी : कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर प्रथम वाचनालये बंद झाली. परंतु आज बहुतेक सर्व सेवा पूर्वपदावर आल्या आहेत, मात्र वाचनालयांना लागलेली कुलपं तशीच आहेत. सुमारे साडेपाच महिने बंद असल्याने वाचकही अस्वस्थ आहेत. आता तरी राज्य शासनाने सूचना आणि नियमावली जाहीर करून वाचनालये चालू करावीत, अशी मागणी 192 वर्षे जुन्या रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केली.

हेही वाचा - अठरा तास ड्यूटीरुन यंदा खाकीला मिळाली थोडीशी उसंत...

वाचनालयांत अनेक वाचकांचे सातत्याने फोन येत असून वाचनालय कधी सुरू करणार असे विचारत आहेत. 5 महिने वाचनालयांचे उत्पन्न पूर्ण बंद आहे. परंतु पगार, लाईट बिल, पाणी बिल, मेंटेनन्स आदी खर्च सुरू आहेत. वाचनालयाची ग्रंथ संपदा सुरक्षित ठेवण्याची कसरत करावी लागत आहे. वाचनालये बंद झाल्यामुळे वाचनालयातील सभासदांना वितरित केलेली पुस्तके सभासदांकडे 5 महिन्यांपेक्षा जास्त काळ पडून आहेत. ही पुस्तके परत प्राप्त करण्याचे आव्हान वाचनालयांसमोर आहे. 

काही सभासद प्रामुख्याने विद्यार्थी, अन्य राज्यात स्थलांतरित झालेले सभासद यांच्याकडील पुस्तके प्राप्त करण्यासाठी खूप अडचणी येणार आहेत, असे अ‍ॅड. पटवर्धन यांनी सांगितले. ग्रंथालये ही समाज मानसिकता सुदृढ ठेवतात. त्या संबंधित शहराची वैभव ठरणारी ग्रंथालये शासनाने दुर्लक्षित करू नये. वाचकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये, असा इशाराही अ‍ॅड. पटवर्धन यांनी दिला आहे. वाचनालये नियमित सुरू करण्यासाठी आवश्यक आदेश शासनाने तात्काळ घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा - खरा पुरूष असशील तर राजीनामा दे आणि बाजुला हो ; निलेश राणेंनी कोणाला दिले आव्हान..

सुरक्षेच्या उपाययोजना 

वाचनालयात गर्दी होणार नाही. शिस्तीत पुस्तक वितरण होईल. जमा होणारी पुस्तके 24 तास स्वतंत्र ठेवली जातील. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स राखले जाईल. कोणताही गर्दीचा, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रम केला जाणार नाही. गरजेनुरूप ज्येष्ठांना घरपोच पुस्तके दिली जातील. या सुरक्षेच्या उपाययोजना करून वाचनालये सुरू करता येतील.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: when library open the question from ad dilip patwardhan in ratnagiri