
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगाव रेडझोनमधून येणाऱ्यांना विरोध होत आहे. क्वारंटाईनसाठी केलेली व्यवस्था अपुरी पडत आहे; पण याही परिस्थितीवर मालोंड बेलाचीवाडी ग्रामस्थांनी मात करत चाकरमान्यांच्या स्वागताला "रेड कार्पेट' अंथरले आहे. त्यांनी गावालगतच्या माळरान शेतजमिनीवर या चाकरमान्यांना राहण्यासाठी मूलभूत सुविधांसह राहुट्या उभारल्या आहेत.
मुंबईकर चाकरमान्यांचा ओघ वाढत असल्याने शाळांमधील क्वारंटाईन व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. मात्र, कोणत्याही चाकरमान्याची गैरसोय होऊ नये, यासाठी मालोंड बेलाचीवाडी ग्रामस्थांनी गावालगतच्या माळरान आणि शेतजमिनीमध्ये राहुट्या उभारून व्यवस्था केली आहे. राहुट्यांमध्ये बाथरूमसह शौचालयाचीही व्यवस्था करून मालोंड बेलाचीवाडी ग्रामस्थांनी चाकरमान्यांच्या स्वागतासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे.
कोरोना महामारीमध्ये सख्खा भाऊसुद्धा मुंबईकर भावाला घरात घेण्यास तयार नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, मुंबईकर चाकरमानी आपलेच आहेत. त्यांनाही गावात आधार द्यायलाच हवा, यासाठी मालोंड बेलाचीवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत चाकरमान्यांच्या निवास व्यवस्थेसाठी गावालगतच्या माळरान, शेतजमिनीमध्ये अंग मेहनतीने राहुट्या उभारल्या आहेत. यामध्ये शौचालय आणि बाथरुमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भावामुळे बिथरलेल्या चाकरमान्यांना नवा विश्वासही मिळाला आहे, तसेच "गाव आपलोच आसा' ही भावना देखील दृढ झाली आहे.
मालोंड गावात फक्त दोन प्राथमिक शाळा आहेत. तर बंद घरांचीही संख्या मोजकीच आहे. या तुलनेत येणारे चाकरमानी मोठ्या संख्येने आहेत. या चाकरमान्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेचे काय करायचे, असा प्रश्न ग्रामस्थांपुढे पडला होता. यावर मार्ग काढत वस्तीपासून दूर शेतजमिनीत नाना परब यांनी ग्रामसेवक भगवान जाधव, यांच्या सहकार्याने ग्रामस्थ मंगेश आचरेकर, विजय परब, विश्वनाथ परब, गोविंद परब यांच्यासह एकूण पंधरा ग्रामस्थांच्या अंगमेहनतीने शेतजमिनीत राहुट्या उभारल्या. पाण्याच्या व्यवस्थेसाठी पाच हजार लिटरची टाकीही जोडली. शौचालयासाठी दोन भांडी खरेदी करून खड्डा खणून संडास बाथरुम पण उभारले. त्यांच्या या सुविधेमुळे कोरोनाने हवालदिल झालेल्या मुंबईकरांना चांगलाच आधार मिळाला आहे.
हे पण वाचा - जीव पडला भांड्यात ; गोवा सरकारने त्याला काल पॉझीटीव्ह घोषीत केले अन् आज तो झाला निगेटीव्ह....
मालोंडमध्ये क्वारंटाइनसाठी दोनच शाळा उपलब्ध होत्या; मात्र त्या दोन्ही फुल्ल झाल्या. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी शेत जमिनीत राहुट्या उभारून चाकरमान्यांची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राहुट्या उभारल्या आहेत. तेथे बाथरूमसह शौचालयाची व्यवस्थाही केली आहे. सध्या या राहुट्यामध्ये 12 जणांची व्यवस्था आहे. मालोंड गावच्या ग्रामस्थांचा हा उपक्रम अन्य गावांना प्रेरणादायी असाच आहे.
- राजेंद्र पराडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.