"मच्छीमार गाव पर्यटन'कडे सरकारचे दुर्लक्ष का? ; महेंद्र पराडकर यांचा सवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

आपल्याकडे नैसर्गिक वैभव आणि सांस्कृतिक ठेवा फार मोठा असताना गोवा आणि केरळची पर्यटन मॉडेल्स्‌ आपणास का राबवावी लागतात. पर्यटनात आपण आपली स्वतंत्र ओळख कधी निर्माण करणार हा आमचा सवाल आहे.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - पारंपरिक मच्छीमारांच्या प्रश्‍नांकडे तर शासन दुर्लक्ष करीतच आहे. आता पर्यटनातही गोव्याच्या धर्तीवर बीच शक्‍सचे पर्यटन आणून "मच्छीमार गाव पर्यटन' सारख्या संकल्पना विकसित करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मच्छीमार गाव संकल्पनेकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? असा सवाल पारंपरिक मच्छीमार कार्यकर्ते महेंद्र पराडकर यांनी केला आहे. 

श्री. पराडकर म्हणाले, ""सिंधुदुर्ग हा संपूर्ण भारतातील एकमेव पर्यटन जिल्हा आहे. परंतु या पर्यटन जिल्ह्याचा लोकाभिमुख पर्यटन विकास आराखडा शासनाला अद्याप तयार करता आलेला नाही. जिल्ह्याचा टुरिझम मास्टर प्लान तयार असेल तर तो स्वतःच्या हिंमतीवर पर्यटन वाढविणारे स्थानिक मच्छीमार व अन्य रहिवासी यांना डोळ्यासमोर बनवला गेला आहे का? हा प्रश्न आहे. प्रत्येक वेळी केरळच्या धर्तीवर तर कधी गोव्याच्या धर्तीवर पर्यटन विकास करणार अशा घोषणा केल्या जातात.

आपल्याकडे नैसर्गिक वैभव आणि सांस्कृतिक ठेवा फार मोठा असताना गोवा आणि केरळची पर्यटन मॉडेल्स्‌ आपणास का राबवावी लागतात. पर्यटनात आपण आपली स्वतंत्र ओळख कधी निर्माण करणार हा आमचा सवाल आहे. वास्तविक कोकणच्या मातीशी व संस्कृतीवर आधारित पर्यटनाला आज वाव देण्याची फार मोठी गरज आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर फिशरमेन्स व्हिलेज अर्थात मच्छीमार गाव संकल्पना पर्यटनात राबविण्यासाठी प्रयत्न केले होते.

सागरी अतिक्रमणग्रस्त मच्छीमार गावांना धूपप्रतिबंधक बंधारे घालून त्या भागाचे सुशोभीकरण करणे. गावांमध्ये मासेमारी व्यवसायाशी निगडित माहिती केंद्र उभारणे. पर्यटनासाठी मच्छीमार बांधवांना सीआरझेडमध्ये सवलत देणे. पर्यटकांना पारंपरिक रापण ओढण्याचा आनंद देणे. मच्छीमारांची खाद्यसंस्कृती आणि पारंपरिक दशावतार कलेला प्रोत्साहन देणे अशा विविध उपक्रमांचा समावेश करून मच्छीमार गाव संकल्पना पर्यटनात यशस्वी करता येऊ शकते. परंतु त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी शासनाची दिसत नाही. गोवा आणि केरळचा शॉर्टकर्ट अवलंबिण्यातच शासनाला धन्यता वाटतेय. पर्यटनाच्या दृष्टीने मच्छीमार गाव संकल्पना विकसित करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जातेय.'' 

मच्छीमारांनी सागरी पर्यटन विकसित केले 
श्री. पराडकर म्हणाले, ""मासेमारीबरोबरच जोड व्यवसाय म्हणून मच्छीमारांनी पर्यटन उद्योगात सहभाग दर्शविला आहे. किंबहुना जिल्ह्यातील सागरी पर्यटन स्वबळावर विकसित करण्यात मच्छीमारांचेच योगदान जास्त आहे. शासनाकडून कुठलीही मदत न घेता बहुतांश मच्छीमारांनी आपला व्यवसाय उभा केला आहे. त्यांच्यामुळेच गेल्या पंधरा वर्षात मालवणातील पर्यटकांचा आकडा 50 लाखांच्या पुढे गेला आहे. परंतु सरकारने एवढ्या मोठ्या पर्यटन व्यवसायाला आवश्‍यक सोयी - सुविधा देण्याच्या दृष्टीने आजवर कोणते प्रयत्न केले हा संशोधनाचा विषय आहे. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे अनेक प्रश्न व मागण्या गेली पंधरा वर्षे प्रलंबित आहेत.'' 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Government Neglecting Fisherman Village Tourism Mahendra Paradkar Question