ब्युटी पार्लरवरून राजकीय पुढारी पती-पत्नीमध्ये चांगलीच जुंपली ; भर बाजारपेठेत मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

शहरातील गोखलेनाका येथे सोमवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रत्नागिरी : शहरात भर बाजारपेठेत राजकीय पुढारी असलेल्या पती-पत्नीमध्ये चांगलीच जुंपली. घरगुती वादातून पत्नीला ब्युटी पार्लरमधून ओढून तिला पतीने आणि दोन महिलांनी भर रस्त्यात मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार या पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत, तर पती हे सेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत. 

हेही वाचा - मत्स्योत्पादनावर चक्रीवादळाचा परिणाम ; साडेसात हजार टन घटले -

शहरातील गोखलेनाका येथे सोमवारी दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. माजी पंचायत समिती सभापती स्वप्नाली सुकांत सावंत (वय ३२, ता. सडामिऱ्या) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सुकांत गजानन सावंत (रा. मिऱ्या बंदर, रत्नागिरी), निधा (पूजा) स्वेतांग वायंगणकर आणि भक्ती शिंदे या तिघांनी त्यांना भर रस्त्यात मारहाण केली. गोखलेनाका येथील एका ब्युटी पार्लरवरून स्वप्नाली सावंत आणि त्यांचा पती सुकांत सावंत यांच्यात कौटुंबिक वाद काही दिवसांपासून सुरू आहे.

काल दुपारी स्वप्नाली सावंत पार्लरमध्ये असताना सुकांत सावंत, निधा वायंगणकर यांनी त्यांना पार्लरमधून ओढून बाहेर काढले. त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. त्यानंतर निधा आणि भक्ती शिंदे या दोघींनी मिळून त्यांचे केस धरत हातांनी पाठीवर मारहाण केली. तसेच गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. 
पती सुकांत सावंतनेही त्यांना हातांनी मारहाण करत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र घेत, त्यांचे सामान फेकून दिले.

हेही वाचा - तोतया तहसीलदाराने लग्नाचे, नोकरीचे दिले वचन आणि तिला फसवले १२ लाखाला -

गाडीची व रूमची चावी घेऊन तिन्ही संशयित निघून गेले, असे स्वप्नाली सावंत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सुकांत सावंत, निधा वायंगणकर आणि भक्ती शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife and husband disputed in market on domential topic both are in political background in ratnagiri