सचिवांवर सदस्यांकडून दिशाभुलीचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 डिसेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी - सभापतींच्या दालनात येऊन सभा सचिवच आम्हाला तासन्‌तास चर्चेत गुंतवून दिशाभूल करणारी माहिती देतात. जिल्ह्यातील संस्थांना डावलून परजिल्ह्यातील संस्थांना प्रशिक्षणाचा ठेका निश्‍चित करताना सदस्यांना अंधारात ठेवले जाते, असा आरोप करत सदस्यांनी आजच्या सभेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

सिंधुदुर्गनगरी - सभापतींच्या दालनात येऊन सभा सचिवच आम्हाला तासन्‌तास चर्चेत गुंतवून दिशाभूल करणारी माहिती देतात. जिल्ह्यातील संस्थांना डावलून परजिल्ह्यातील संस्थांना प्रशिक्षणाचा ठेका निश्‍चित करताना सदस्यांना अंधारात ठेवले जाते, असा आरोप करत सदस्यांनी आजच्या सभेत उपमुख्यकार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केली. 

जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विकास समितीची सभा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभापती रत्नप्रभा वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या वेळी समितीचे सचिव तथा महिला बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, सदस्य निकीता परब, निकीता तानवडे, कल्पीता मुंज, रुक्‍मिणी कांदळगावकर, वंदना किनळेकर, तालुका प्रकल्प अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. 
महिला बाल विकास समिती सदस्य, सभापतीच्या दालनात बसून निर्णय घेतात व सभेत केवळ सोपस्कार पूर्ण केले जातात. त्यासाठी सभाही उशिराने होतात. या झालेल्या टिकेचा समाचार घेताना समिती सदस्यांनी सचिव सोमनाथ रसाळ यांच्यावरच पलटवार केला. तर समिती सचिव श्री. रसाळ हेच सभापतींच्या दालनात येऊन सदस्यांना तासन्‌तास चर्चेत गुंतवून ठेवत असल्याने सभा उशिराने होत असल्याचा तसेच दालनातील चर्चेवेळी चुकीची माहिती देत असल्याचा आरोप सदस्या वंदना किनळेकर यांनी केला. तसेच महिला बाल कल्याणचा प्रशिक्षण कार्यक्रमाबाबतची टेंडर प्रक्रिया राबविताना जिल्ह्यातील संस्थांचा विचार न करता त्यांना डावलून परजिल्ह्यातील संस्थांना प्रशिक्षणाचा ठेका परस्पर दिल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील संस्थांना व बचतगटांना याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही. समिती सदस्यांनाही याबाबत पूर्णपणे अंधारात ठेवले आहे. असा आरोप या वेळी किनळेकर यांनी केला. तर सभापती रत्नप्रभा वळंजू यांनीही आपण प्रशिक्षणाचा ठेका देताना स्थानिक संस्थांना प्राधान्य देण्याचे आदेश दिले होते, असे स्पष्ट केले. त्यामुळे रसाळ यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

जिल्ह्यातील अंगणवाड्यांतील मुलांच्या आरोग्य तपासणीचे काम 70 टक्के पूर्ण होणे आवश्‍यक असताना आतापर्यंत 50 टक्के काम पूर्ण झाल्याचे आजच्या सभेत घेतलेल्या आढाव्यातून स्पष्ट झाले. याबाबत आरोग्य विभागाच्या संथगती कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर एक महिन्यात उर्वरित 50 टक्के आरोग्य तपासणीचे काम घाईगडबडीत उरकून घेतले जाणार असल्याची खंत व्यक्त केली तर आरोग्य विभागाने प्रतिमहिना 33 टक्के प्रमाणे आरोग्य तपासणीचे काम पूर्ण करण्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश सभापती वळंजू यांनी सभेत दिले. 

सेविका वळंजू यांचा सत्कार 
उत्कृष्ट अंगणवाडी सेविकेचा राष्ट्रीय स्तरावर पुरस्काराचा पहिला बहुमान मिळविणाऱ्या अंगणवाडी सेविका शैलजा वळंजू यांचा या वेळी सभापतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

सभापतींच्या दालनातील चर्चेचे गुपित उघड 
महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या प्रशिक्षण योजनांच्या दरपत्रक निविदेवरून आजच्या सभेत जोरदार चर्चा झाली. तर समिती सचिवच आम्हाला तासन्‌तास सभापतींच्या दालनातील चर्चेत गुंतवून ठेवत असल्याने सभेला यायला उशीर झाल्याची कबुली देत मागील सभेपूर्वी सभापतीच्या दालनात दरपत्रकावरून गरमागरम चर्चा झाल्याचे सदस्या वंदना किनळेकर यांनी स्पष्ट केले. यामुळे आजच्या सभेत सभापतींच्या दालनातील चर्चेचे गुपित उघड झाले.

Web Title: Women and Child Welfare association