महिलेच्या खून प्रकरणी एकाला जन्मठेप

महिलेच्या खून प्रकरणी एकाला जन्मठेप

सिंधुदुर्गनगरी - वेळगीवे (ता. देवगड) येथील सुमित्रा वामन दळवी यांच्या खूनप्रकरणी आरोपी मुकेश राजू साटम (वय २५) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी दोषी ठरवत आज जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे वकील सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहिले. 

सुमित्रा वामन दळवी (वय ७५, रा. मुटाट पाळेकरवाडी देवगड) या प्रल्हाद सदानंद लाड (रा. वेळगिवे गावठण, देवगड) यांच्या आत्या असून, त्या आपल्या माहेरी शेतीचे काम करण्यासाठी आल्या होत्या.

दरम्यान, फिर्यादी लाड यांचा नातेवाईक मुकेश राजू साटम (वय २५, रा. नादगावठण, देवगड) हाही राहण्यासाठी वेळगिवे येथे आला होता. २७ जून २०१७ ला फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण शेतात कामासाठी गेली होती. यावेळी घरात सुमित्रा या व मुकेश हे दोघेच होते. सायंकाळी ४ ते ५:३० च्या सुमारास मुकेश यांनी सुमित्रा यांच्यावर कोयत्याने हल्ला करून त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत केली होती. तसेच सुमित्रा यांच्या अंगावर असलेले आणि घरात असलेले १ लाख १६ हजार रुपये एवढ्या किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता. 

शेतातून घरी आल्यावर सुमित्रा यांच्यावर हल्ला झाल्याचे निदर्शनास आले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, तर अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबुळी येथे पाठविले होते; मात्र २८ जूनला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रल्हाद लाड यांनी मुकेश याच्या विरोधात २८ जून २०१७ ला विजयदुर्ग पोलिसांत तक्रार दिली होती.

त्यानुसार मुकेश याच्यावर गुन्हा दाखल केला होता, तर २ जुलै २०१७ ला मुंबईतून मुकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्याकडे चोरीला गेलेली सोन्याची नथ सापडली होती. दरम्यान, जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत साक्ष व वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांनी आरोपी मुकेशला जन्मठेप व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. 

२२ साक्षीदार तपासले
जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने एकूण २२ साक्षीदार तपासले, तर फिर्यादी प्रल्हाद लाड यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच मुकेश याला गुन्हा करून पळताना शेजाऱ्यांनी पाहिले होते, तर तपासनिक अधिकारी म्हणून विजयदुर्ग पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com