#WorldCancerDay कॅन्सरसोबत युद्धासाठी हवा रक्षक

#WorldCancerDay कॅन्सरसोबत युद्धासाठी हवा रक्षक

जागतिक कॅन्सर दिवस सोमवारी (ता.४) आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही वर्षात कॅन्सर रूग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आहे. याची नेमकी कारणे स्पष्ट नसल्यामुळे कॅन्सर टाळण्यासाठी नेमके काय करायचे, याबाबत प्रश्‍न असतो. शिवाय जिल्ह्यात कॅन्सर निदानाची प्रभावी व्यवस्था नाही. एकूणच या आजाराबाबत प्रचंड भितीचे वातावरण आहे. जागतिक कॅन्सर दिवसाच्या निमित्ताने ‘सकाळ’ने याच स्थितीवर सर्वांगाने चर्चा करण्यासाठी ‘कॉफी विथ सकाळ’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. यात प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. धीरज सावंत, भोसले फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक डॉ. प्रविणकुमार ठाकरे, पर्यटन व्यावसायिक तथा कर्करोगीशी स्वतः लढत असलेले डी. के. सावंत, कोलगाव -निरूखे येथील ईशप्रेमालया कॅन्सर पॅलिएटीव्ह केअरच्या सिनिअर सिस्टर एमीली जेकब, सिस्टर सुचिता व डॉ. मोनिका डिसील्व्हा यांनी यात अभ्यासपूर्ण मते मांडली.

‘‘जिल्ह्यात स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण बऱ्यापैकी दिसते. कर्करोग रूग्ण वाढत आहेत की, कसे यावर अभ्यास व्हायला हवा; मात्र, अलिकडे विविध चाचण्या आणि जागरुकतेमुळे कर्करोग रूग्णांचे निदान मोठ्या प्रमाणात होते. यामुळे कदाचित रूग्ण संख्या वाढल्याचे दिसत असावे. कॅन्सरवर वेळीच व योग्य पद्धतीने उपचार झाल्यास रूग्ण वाचण्याची शक्‍यता वाढते. यासाठी किमान प्राथमिक चाचण्या अगदी गावोगावी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व्हायला हव्यात. कॅन्सर होवू नये यासाठी आपला आहार व नियोजित वेळा पाळल्या पाहिजेत; मात्र याकडे दुर्लक्ष होताना दिसतो. स्थानिक पातळीवर कर्करोगाच्या उपचारासाठीची व्यवस्था उभी राहण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.’’
- डॉ. धीरज सावंत,
स्त्रीरोगतज्ज्ञ, सावंतवाडी

‘‘कॅन्सरवर शस्त्रक्रिया, रेडीएशन मारा-टेलिथेरपी व केमोथेरपी यांच्या माध्यमातून उपचार करण्यात येतात. नुकतेच नोबेल पारितोषिक विजेते डॉ जेम्स ॲलिझन व डॉ. जोम्स यानी नवीन उपचार पद्धती शोधून काढली. यामध्ये पेशंटची रोगप्रतिकारकशक्ती कशी वाढविता येईल, यावर संशोधन केले व कर्करोगावर मात कशी करता येईल यावर अभ्यास केला आहे. ही उपचारपद्धती यशस्वी झाल्यास कर्करोगावर मात करता येवू शकते. अर्थात सध्याच्या उपचार पध्दतीत औषधांचा शरिरावर विपरीत परिणाम होतो. केमो व इतर उपचार घेतल्यावर शरिरातील चांगले घटकही बाधीत होतात. पुन्हा शरिराला ताकद मिळण्यासाठी बराच काळ लागत असल्याने रूग्णाचे मनोबल वाढवणे गरजेचे असते. यात नातेवाईकांची भूमिका महत्त्वाची ठरते.’’
- डॉ. विजय जगताप,
प्राचार्य, 
भोसले औषधनिर्माण महाविद्यालय, सावंतवाडी

‘‘मला ज्यावेळी कॅन्सर असल्याचे निदान झाले तेव्हा मीही घाबरलो; मात्र मनाने खंबीर असल्याने याला पूर्ण ताकदीने तोंड देण्याचा निश्‍चय केला. या आधी आमच्या कुटुंबात कर्करोगाचे रूग्ण व त्यांचे उपचार मी जवळून पाहिले होते. मी स्वतःला सावरले व धीर खचू न देता कॅन्सरशी दोन हात करण्याचा निश्‍चय केला. यासाठी मला माझ्या मुलींने तिच्या आजारपणाच्या काळात दाखवलेला धीर प्रेरणा देणारा ठरला. कुटुंबानेही मला साथ दिली. या आजाराचे नेमके निदान तसेच योग्य उपचार कुठे मिळणार, याचा अभ्यास केला, तातडीने उपचार सुरू केले. कर्करोग झाला म्हणून आत्महत्येसारखे विचार अनेकांच्या मनात येतात; रुग्ण जर आपला धीर सोडत असेल तर अशावेळी त्याच्या कुटुंबियानी त्याला सकारात्मक उर्जा देण्याची गरज असते ’’
- डी. के. सावंत,
पर्यटन व्यावसायिक

‘‘आपल्या जिल्ह्यात कॅन्सरवर उपचारासाठी कोणत्याही ठोस व सक्षम व्यवस्था नाही. तज्ज्ञांचाही मोठा अभाव आहे. येथील कर्करोग झालेल्या रुग्णांना कोल्हापूर, मुंबई, गोवा सारख्या मोठ्या शहरातील रुग्णालयात अवलंबून राहावे लागते. याची उपचारपद्धती गरीब सर्वसाधारण रुग्णाना परवडत नाही. यामुळे बऱ्याचदा निदान व्हायलाही वेळ लागतो. निदान झाले तरी उपचार परवडणारे नसतात. गोर गरीब यात सर्वाधिक भरडले जातात. शासनाने खरे तर या परिस्थितीचा विचार करून ठोस व्यवस्था उभी करायला हवी. एका छताखाली तपासणीपासून उपचारापर्यंत यंत्रणा उभी राहिला हवी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात सुरु झाल्यास कॅन्सर रूग्णांना दिलासा मिळू शकतो. या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवे.’’
- डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, 

वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक

‘‘कर्करोगाचे रूग्ण शेवटच्या स्टेजला असले तर मृत्यु हेच अंतिम सत्य असते. अशा रूग्णाची काळजी घेणे, घरच्यांना फार कठिण होते. त्या रूग्णाच्या आयुष्यातील शेवटचे दिवस यामुळे खूप यातनामय असतात. यात रूग्णाच्या कुटुंबियांचेही दुःख वाढत जाते. अशा रूग्णांच्या आयुष्यातील संध्याकाळ कमीतकमी वेदना देणारी व शांततेत असावी, यासाठी ईशप्रेमालय या कॅन्सर पॅलिएटीव्ह केअरचे काम चालते. आम्ही सेवाभावी वृत्तीने मोफत सेवा देतो. आयुष्यात उरलेले क्षण कसे आनंदात जातील, ही भावना रुग्णात रुजविण्याचे कामही सर्वात महत्वाचे समजतो. शेवटच्या टप्प्यात रूग्णाला मानसिक सौख्य हवे असते. यासाठी रुग्णाच्या कुटुंबियानी समजूतदारीने योग्य निर्णय घेणे आवश्‍यक असते. आम्ही ही सेवा मोफत करतो. समाजाकडून, सिंधुदुर्गवासीयांकडून यात सहकार्याची आमची अपेक्षा आहे.’’
- सिस्टर एमीली जेकब,  

सीनिअर सिस्टर, ईशप्रेमालय

‘‘महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बऱ्याचदा स्वतः जडलेला आजार लपवण्याचा प्रयत्न केला जातो. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर उपचाराचा विचार होतो. या संदर्भात जागृती व्हायला हवी. कर्करोग म्हणजे काय, त्याची लक्षणे, कारणे प्रत्येक महिलेपर्यंत, घरातील प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी. यामुळे कर्करोग नियंत्रित करणे शक्‍य होणार आहे. आमच्या ईशप्रेमालय कॅन्सर पॅलिएटीव्ह केअरमध्ये येणारे रूग्ण शेवटच्या स्टेपला असतात. अशा रूग्णांची काळजी घरच्या घरी घेणे कठीण असते. यासाठी वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण घेतलेल्या यंत्रणेची आवश्‍यकता असते. यामुळे पॅलिएटीव्ह केअर ही आवश्‍यक गोष्ट बनली आहे.’’
- डॉ. मोनिका डीसिल्व्हा,
वैद्यकीय सल्लागार, ईशप्रेमालय कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर

सामोरे जाण्याची ताकद निर्माण करावी 
कर्करोगाचे तीन प्रकार आहेत. कर्करोगावर ठोस कायमस्वरुपी नष्ट करण्याची उपचार पद्धती अद्याप नाही. अनुवांशिकता हाही त्यातला एक घटक असतो. कॅन्सरवर जगभरात अजूनही संशोधनही सुरु आहे. कर्करोगावर चर्चा केली जाते; मात्र, त्याला सामोरे जाण्याची ताकद रुग्णांमध्ये निर्माण करणे तितकेच गरजेचे आहे, असा सूर या ‘कॉफी विथ सकाळ’ मधून निघाला. 

बदलती जीवनशैलीही कारणीभूत
माणसाची बदलती जीवनपद्धती, रहाणीमान, रात्रीचे जागरण, उशिरा उठणे, यामुळे कर्करोगाचे प्रमाण हळुहळू वाढत आहेत. आपण अगदी सकाळी उठल्यावर हात धुण्यासाठी वापरलेल्या साबणापासून रात्री झोपताना लावलेल्या मच्छरसाठीच्या लिक्‍वीडेटरपर्यंत विविध रसायनांच्या संपर्कात असतो. आहारही खतांनी बरबटलेला असतो. ही सुध्दा कर्करोग वाढीची कारणे आहेत. तंबाखू आणि इतर व्यासनामुळेही कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे, असेही निरिक्षण यावेळी उपस्थित तज्ञांनी मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com