#WorldTourismDay पुरातन वास्तू लुभावू शकतात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

रत्नागिरी - पर्यटकांना लुभावण्यासाठी सौंदर्यसंपन्न कोकणात जुन्या वास्तूंचा हातभार लागू शकतो. याकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. कोकण पर्यटन विकासासाठी मालदोलीतील हेरीटेज होमसह अनेक वास्तू सांभाळून त्या पर्यटकांसाठी खुल्या करणे सहज शक्‍य आहे, असे प्रतिपादन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले.

रत्नागिरी - पर्यटकांना लुभावण्यासाठी सौंदर्यसंपन्न कोकणात जुन्या वास्तूंचा हातभार लागू शकतो. याकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. कोकण पर्यटन विकासासाठी मालदोलीतील हेरीटेज होमसह अनेक वास्तू सांभाळून त्या पर्यटकांसाठी खुल्या करणे सहज शक्‍य आहे, असे प्रतिपादन अभ्यासक धीरज वाटेकर यांनी केले.

कोकणातील अशा वास्तूंचा दाखला देताना त्यांनी या वास्तूंचा परिसर पर्यटकांना आकर्षित करणारा आहे, याकडे निर्देश केला. वाटेकर म्हणाले की, सहाव्या शतकापासूनचे चिपळुणातील पराक्रमी घराणे, कोकण प्रांताचे वतनदार घराणे अशी ओळख असलेल्या राजेशिर्के परिवाराचे ऐतिहासिक वाडे आहेत. सुमारे ३५० वर्षांचा इतिहास लाभलेले चिपळूण तालुक्‍यातील कुडप, कुटरे, तळसर येथील वाडे हे मराठा वास्तुशैलीचे प्रतीक आहेत. हे वाडे असलेल्या परिसरात इतर पर्यटनस्थळांची रेलचेल आहे. मालदोलीनजीक बिवलीची पुरातन लक्ष्मीकेशव मूर्ती, वाशिष्ठीचे बॅकवॉटर, कुडप, कुटरे, तळसर तर पर्यटकांना खुणावणाऱ्या सह्याद्रीत आहेत. गुहागर तालुक्‍यात, दाभोळमध्ये काही ऐतिहासिक जुने वाडे व जोडीला पर्यटन समृद्धी आहे.

‘काकस्पर्श’त व्यक्तिरेखा झालेला वाडा
मराठीतील आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या वास्तव्याची साक्ष देणारा, ‘काकस्पर्श’ चित्रपटात दिसलेला 
गुहागर तालुक्‍यातील पालशेतचा नेनेवाडा, तेथील हिराबाईंनी बांधलेली विहीर पर्यटकांना सहजआकर्षित करू शकते. तळकोकणात १२-१३ वाडे आहेत. रत्नागिरीतील टिळक स्मारक, मालवणचा कुशेवाडा, नेरुरचा वाडा, सावंतवाडी संस्थानातील प्राचीन वाडे, विजयदुर्गातील धुळपवाडाही आहेतच.

वास्तुकलादृष्ट्या संवर्धन आवश्‍यक
वाड्यांच्या परिसरातील निसर्गसौंदर्य, मालदोलीतील आंब्याची ८० झाडे, तीन-चार कलमांमागे एखादे बकुळ, सोनचाफा, खुरी, ४० फूट उंच सोनचाफा वैशिष्ट्यपूर्ण आहे. चिरेबंदी पाटातून घरगुती वापरानंतर वाहून जाणाऱ्या पाण्याची व्यवस्था केली आहे. या साऱ्याचे पर्यटकांसाठी पॅकेज करता येईल. पूर्वजांप्रमाणे वास्तू वैभव उभारणे आज शक्‍य नसले तरी जे आहे, त्याचे संवर्धन वास्तूशास्त्रीयदृष्ट्या झाल्यास त्याकडे पर्यटक निश्‍चित आकृष्ट होईल, असा ठाम विश्‍वास वाटेकर यांनी व्यक्त केला.
 

Web Title: World Tourism Day special