यंदा आंब्याचा हंगाम लांबणार ?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

यंदाच्या बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

राजापूर : गणेशोत्सवानंतर परतलेल्या पावसामुळे आंब्याला आलेली पालवी कुजून त्याचा डिसेंबर-जानेवारीत येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आंबा बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. परतीचा पाऊस आणि अवेळी पावसाचे सातत्य राहिल्यास यंदाचा आंबा हंगाम नेहमीपेक्षा १५ दिवस लांबणीवर पडण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. असे घडल्यास त्याचा यंदाच्या बागायतदारांच्या उत्पन्नाला फटका बसण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा -  रत्नागिरी जिल्ह्यातील तीन बंदरांच्या विस्तारीकरणाचे काम फास्ट ट्रॅकवर -

यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात आणि त्यापूर्वी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्याचा भातशेतीला फटका बसला, तरी आंब्याच्यादृष्टीने फायदेशीर ठरला होता. त्यातून आंब्यांच्या झाडांना चांगलीच पालवी फुटली होती. ज्याचा फायदा भविष्यामध्ये आंब्याला मोहोर येण्याला होणार होता. मात्र, गणेशोत्सवानंतर काही दिवस विश्रांती घेतलेला वरुणराजा गेल्या काही दिवसांपासून पुन्हा मागे फिरला आहे. त्यातून, गेल्या काही दिवसांपासून अवेळी पाऊस पडत आहे. त्याचा फटका भातकापणीच्या कामांना जसा बसत आहे तसाच आंब्यालाही बसत आहे.

पावसाच्या सातत्याने मोहोरापूर्वी आंब्यांच्या झाडांना आलेली किंवा येत असलेली पालवी कुजण्याची शक्‍यता आहे. त्याचा थेट परिणाम डिसेंबर-जानेवारीमध्ये येणाऱ्या आंब्याच्या मोहोरावर होऊन मोहोर येण्याचा हंगाम नेहमीच्या तुलनेमध्ये पंधरा दिवस उशिरा लांबणीवर पडण्याची शक्‍यता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे. 

हेही वाचा - कमी खर्चात, कमी वेळेत मिळवा गुंठ्याला दोनशे किलो भात -

"काही आंबा कलमांना पालवी आली. काही झाडांना पालवी येण्याची स्थिती आहे. अशा स्थितीत पाऊस आल्याने ही पालवी कुजण्याची शक्‍यता वाटते. त्याचा परिणाम आंब्याच्या येऊ घातलेल्या मोहोरावर होईल. यंदा आंब्याला मोहोर नेहमीपेक्षा पंधरा दिवस उशिरा येण्याची शक्‍यता आहे."

- विजय मोहिते, आंबा बागायतदार

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this year mango season late for 15 days due to changes in atmosphere in ratnagiri said farmers