ग्रामसेवक पदी प्रमोशन झाल्याने युवकाची आत्महत्या

सदानंद जाधव 
शुक्रवार, 11 मे 2018

प्रमोशन मिळाले तरी अन्य ठिकाणी बदली होणार. आपल्याला ते जमणार नाही. त्यामुळे आपल्याला टेंशन आले आहे, असे त्याने अनेकांना सांगितले होते.

सावंतवाडी - ग्रामसेवक म्हणून प्रमोशन झाल्याच्या चिंतेने कलबिस्तच्या ग्रामपंचायतीच्या शिपायाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
सदानंद शांताराम जाधव (वय 40) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. रात्री घरातील अन्य सदस्य दुसर्‍या खोलीत झोपल्याची संधी साधून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने हा प्रकार केला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडी कलबिस्त ता. सावंतवाडी येथील ग्रामपंचायतीत गेले चौदा ते पंधरा वर्षे सदानंद हा काम करीत होता. दरम्यान त्याला चार दिवसापुर्वी तुमचे ग्रामसेवक म्हणून प्रमोशन झाले आहे. त्यामुळे तुम्हाला तो कार्यभार स्विकारावा लागेल, असे पत्र जिल्हा प्रशासनाकडुन प्राप्त झाले. दरम्यान हे पत्र आल्यापासुन तो चिंतेत होता, दरम्यान काल रात्री ग्रामपंचायतीतले काम आटपून घरी गेल्यानंतर तो नेहमीप्रमाणे आपल्या कुटूंबाशी बोलला आणि रात्री उशिरा अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने घरात असलेल्या बाजूच्या खोलीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दरम्यान सकाळी हा प्रकार त्याच्या आईवडीलांचा लक्षात आला. आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच त्यांच्यासह पत्नी व मुलांनी हंबरडा फोडला.
 
सदानंद हा गेली चौदाहून अधिक वर्षे ग्रामपंचायतीत काम करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे अनेकांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. येथील कुटीर रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्याच्या पश्‍चात आईवडील, दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य रवी मडगावकर, सरपंच शरद नाईक, पोलिस पाटील गणू राउळ आदींनी येथील कुटीर रुग्णालयात धाव घेत मदतकार्यात सहकार्य केले.

प्रमोशनच्या भितीने आत्महत्या -
याबाबतची माहिती पंचायत समिती सभापती रवी मडगावकर यांनी दिली. त्याचे प्रमोशन 17 तारखेला होते. आवश्यक कागदपत्रे जमा करण्याच्या सुचना त्याला मिळाल्या होत्या; मात्र त्या दिवसापासून तो चिंतेत होता; प्रमोशन मिळाले तरी अन्य ठिकाणी बदली होणार. आपल्याला ते जमणार नाही. त्यामुळे आपल्याला टेंशन आले आहे, असे त्याने अनेकांना सांगितले होते. या चिंतेमुळे त्याने हा प्रकार केला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Young man suicide due to promotion as Gramsevak