गणेशगुळे किनार्‍यावर मच्छीमारीच्या जाळ्यातून कासवाची झाली सुटका

मकरंद पटवर्धन
Wednesday, 26 August 2020

समुद्रकिनार्‍यावर मच्छीमारीच्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला तरुणांनी जीवदान दिले.

रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथे मच्छीमारीच्या जाळ्यात अडकून समुद्रकिनार्‍यावर आलेल्या कासवाला जीवदान देण्याचे काम स्थानिक तरुणांनी केले. यामुळे या तरुणांचे कौतुक करण्यात येत आहे. गणेशगुळे किनार्‍यावर कासव संवर्धन मोहिमही राबवण्याची निसर्ग संवर्धक संस्थेची आहे.

हेही वाचा- वाढदिवशी झालेल्या भेटीतूनच झाला घात..! कुठे घडली घटना ?

पावसपासून चार किलोमीटरवर किनारी भागात वसलेल्या गणेशगुळे गावाला सुमारे दोन ते अडीच किमी लांबीचा स्वच्छ व सुंदर किनारा लाभला आहे. किनार्‍यावर सुरू लागवड आहे. दोन दिवसांपूर्वी किनार्‍यावर लागलेल्या मच्छीमारीच्या जाळ्यात कासव आढळले. स्थानिक ग्रामस्थ, तरुणांनी हे पाहिल्यानंतर तत्काळ जाळी कापून त्यातून कासवाला सुखरूप सोडवण्यात आले. माजी सरपंच वामन रांगणकर, प्रमोद मांडवकर, प्रसाद मांडवकर, अजय सुर्वे, समीर लाड, सागर लाड यांनी कासवाची मुक्तता केली. त्यानंतर पोलिस पाटील संतोष लाड यांना याची खबर देण्यात आली. श्री. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कासवाला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.

हेही वाचा- आली गवर आली, सोन पावली आली कोकणात दोन दिवसीय गौरींचे आगमन -

गावखडी किनार्‍याप्रमाणे गणेशगुळे समुद्र किनार्‍यावर दरवर्षी कासवे अंडी घालण्यास येतात. त्यांचे संवर्धन होण्याची गरज आहे. याकरिता निसर्ग संवर्धन करणार्‍या संस्था तयारही आहेत. ग्रामस्थांकडून सहकार्य लाभल्यास यंदा ही मोहीम राबवणे शक्य आहे. यातून गावात पर्यटन विकासही साधणे शक्य आहे. कारण आता किनार्‍यावर स्थानिक ग्रामस्थांचे स्टॉल्स असून हॉटेल व्यवसायही सुरू झाला आहे. त्यामुळे कासव संवर्धन आणि पर्यटन याद्वारे ग्रामस्थांना उत्पन्न मिळवणे शक्य आहे, असे तज्ञांचे मत आहे.

संपादन - अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youngsters saved the life of a tortoise trapped in a fishing net on ganeshgule beach