जखमी आणि आजारी वासराला वाचविण्यासाठी तरुणांचे शर्थीचे प्रयत्न

अमित गवळे
सोमवार, 9 एप्रिल 2018

येथील गटारात हे वासरू पडले होते. त्याला उमेश मढवी यांनी गटारातून उचलून बाहेर काढून ठेवले. पालीतील निखिल खैरे हा तरुण रात्री जेवण झाल्यावर फेरफटका मारत असताना त्याला हे वासरू दिसले त्याने तातडीने उमेश मढवी आणि विद्देश आचार्य यांच्या मदतीने पशु सहाय्यक (चिकित्सक) वारगुडे यांना घेवून आले.

पाली (जि. रायगड) - पालीत नुकताच भूतदयेचा प्रत्यक्षात प्रत्यय आला. शनिवारी (ता. 7) रात्रीच्या सुमारास येथील मधल्या आळीतील लवाटे बिल्डींग चौक येथे एक जखमी व आजारी वासरू निपचित पडले होते. या वासराचे प्राण वाचविण्यासाठी काही तरुणांनी रात्री उशीरापर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने वासराची प्राणज्योत मालवली.

येथील गटारात हे वासरू पडले होते. त्याला उमेश मढवी यांनी गटारातून उचलून बाहेर काढून ठेवले. पालीतील निखिल खैरे हा तरुण रात्री जेवण झाल्यावर फेरफटका मारत असताना त्याला हे वासरू दिसले त्याने तातडीने उमेश मढवी आणि विद्देश आचार्य यांच्या मदतीने पशु सहाय्यक (चिकित्सक) वारगुडे यांना घेवून आले. प्रथम दर्शनी वासराला रेबीज आणि विषबाधा झाली असल्याचे वारगुडे यांनी सांगितले. त्यांनी तातडीने वासरावर उपचार केले. त्यांनी वासरू जगण्याची शक्यता खूप कमी दिली. तरी सर्वांनी शर्तीचे प्रयत्न केले. उपचारामुळे वासरात थोडी तरतरी आली. मात्र अखेर रविवारी (ता. 8) पहाटे 4 वाजताच्या सुमारास वासराची प्राणज्योत मालवली. याप्रसंगी निखिल खैरे, उमेश मढवी, विद्देश आचार्य, रमेश मूल्ल्या आणि उमेश तांबट या तरुणांनी वासराचा जीव वाचावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र या तरुणांनी अजूनही भूतदया शिल्लक असल्याचे आपल्या कार्यातून सिद्ध केले.

'माणसाचा जिव जितका महत्त्वाचा तितकाच प्राण्यांचाही... माझी कळकळीची विनंती आहे, कोणत्याही प्राण्यावर असा प्रसंग ओढावला तर मागे पूढे विचार करू नका, शेवटी माणसांप्रमाणेच त्यांचा पण जिव आहे!' 
निखिल खैरे, अध्यक्ष सुधागड तालूका शेकाप लाल ब्रिगेड संघटना

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Youths efforts to save the injured and sick calf