तिरंगी लढतीमुळे आणखी चुरस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

जिल्ह्यात सेना-भाजप स्वबळावर - मतविभागणी काँग्रेसच्या पथ्यावर
सावंतवाडी - सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सध्या तिरंगी लढत होईल, अशी स्थिती आहे. यामुळे जवळपास सगळ्याच तालुक्‍यांत चुरस वाढली आहे. युती न झाल्याने काँग्रेससाठी तुलनेत आव्हान कमी झाले, अशी सध्याची स्थिती आहे.

जिल्ह्यात सेना-भाजप स्वबळावर - मतविभागणी काँग्रेसच्या पथ्यावर
सावंतवाडी - सिंधुदुर्गात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी सध्या तिरंगी लढत होईल, अशी स्थिती आहे. यामुळे जवळपास सगळ्याच तालुक्‍यांत चुरस वाढली आहे. युती न झाल्याने काँग्रेससाठी तुलनेत आव्हान कमी झाले, अशी सध्याची स्थिती आहे.

शिवसेना - भाजप युती झाली असती तर काँग्रेसला सत्ता टिकविण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला असता. त्या दृष्टीने युतीच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीही केली. मात्र राज्यस्तरावरून शिवसेनेने युती तोडल्यामुळे काँग्रेसला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. असे असले तरी ही लढाई तितकीशी सोपी राहिलेली नाही.

युती होणार नसली तरी काही भागात शिवसेना-भाजपने तडजोडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हास्तरीय संघटना बळाचा विचार करता ग्रामीण भागात आजही काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. त्या पाठोपाठ शिवसेनेचा नंबर लागतो. मात्र भाजपने इतर पक्षातील नाराजांना आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. संदेश पारकर, अतुल रावराणे, महेश सारंग अशी कार्यकर्त्यांचे बळ असलेली मंडळी भाजपकडे आल्याने काही भागात त्यांची ताकद वाढली आहे. साहजिकच तिरंगी लढती दिसणार आहेत. भाजप आर्थिक बळाचाही बऱ्यापैकी वापर करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. या सगळ्यामध्ये आकड्यांच्या लढाईत कोण बाजी मारतो हा उत्सुकतेचा मुद्दा ठरणार आहे.

शिवसेना - भाजप स्वतंत्र लढल्यास काँग्रेसविरोधी मते विभागली जातील. याचा फायदा अप्रत्यक्षरीत्या काँग्रेसला होणार आहे. राष्ट्रवादीशी काँग्रेसची आघाडी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काँग्रेसी विचारसरणीची मते एकगठ्ठा राहतील अशी अवस्था आहे. मात्र दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. सगळ्यांनाच उमेदवारी देणे कठीण आहे. त्यामुळे बंडखोरी थोपविण्याचे आव्हान त्यांच्याकडे असणार आहे. 
पालिका निवडणुकीत वेंगुर्ले आणि मालवण येथे बंडखोरी थोपविण्यात अपयश आल्याचा फटका काँग्रेसला बसला होता. तोच कित्ता या निवडणुकीत गिरविला गेल्यास शिवसेना-भाजपला फायदा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकूणच ही सगळी स्थिती कोणा एकाकडे झुकणारी नाही. जोरदार चुरस होणार हे वास्तव आहे.

आगामी गणिते...
शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी जिल्हास्तरावर युतीसाठी आग्रह धरला, मात्र काँग्रेसच्या बहुसंख्य स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध दर्शविला. वास्तविक भाजपची ग्रामीण भागात पूर्वी फारशी ताकद नव्हती. आता ही ताकद वाढली आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुका दोन्ही पक्ष स्वबळावर लढविण्याचीच जास्त शक्‍यता आहे. आता भाजप स्वबळावर लढल्यास जी काही मते मिळतील ती त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू असणार आहे. स्वबळावर लढल्यास चिन्ह पोचविण्यात आणि गावोगाव कार्यकर्ते निर्माण करण्यात त्यांना यश येणार आहे. ही शिवसेनेच्या दृष्टीने धोक्‍याची घंटा ठरणार आहे.

Web Title: zilla parishad election competition in the three party