वैभववाडी : काजू लागवड क्षेत्रात घट

बदलत्या वातावरणाचा नर्सरीधारकांना फटका; काजू बियांनाही बाजारात किरकोळ दर
काजू
काजूsakal

वैभववाडी : बदलत्या वातावरणाचा काजू पिकावर होत असलेला परिणाम, उत्पादनात होत असलेली घट, खते, कीटकनाशकांच्या दरात झालेली वाढ, मजुरांची वानवा आणि त्या तुलनेत काजू बी ला मिळत नसलेला दर यामुळे काजू लागवड क्षेत्रात गेल्यावर्षीपासून घट होण्यास सुरूवात झाली आहे. याचा मोठा फटका नर्सरीधारकांना बसणार असून हजारो काजू कलमे शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पंधरा ते वीस वर्षांत काजू लागवडीखालील क्षेत्रात झपाट्याने वाढ होत गेली. वेंगुर्ले सात आणि चार कलमांची उपलब्धता, लागवडीनंतर तीन वर्षांत सुरू असलेले उत्पादन आणि इतर पिकांच्या तुलनेत हमखास उत्पादन हमी यामुळे हजारो शेतकरी गेल्या काही वर्षांत काजू लागवडीकडे वळले. एकीकडे भात लागवडीखाली क्षेत्र कमी होत गेले आणि काजू पिकांखाली क्षेत्र वाढत गेले.

काजूच्या पारंपारिक पद्धतीला रामराम करीत अनेक शेतकऱ्यांनी व्यावसायिक काजू लागवड केली. कृषी विभागाच्या योजनांचा फायदा देखील काजू लागवड होण्यास झाला. त्यामुळे दहा-बारा वर्षांत सरासरी दरवर्षी पाच हजार एकरने काजू लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सद्यस्थितीत काजू लागवडीखालील क्षेत्र हे ७७ हजार हेक्टरच्या जवळपास आहे; परंतु, मागील तीन चार वर्षे काजू पिकाच्या चढत्या आलेखाला बाधा निर्माण करणारी ठरली आहेत.

गेल्या चार-पाच वर्षांत बदलत्या वातावरणाचा मोठा फटका या पिकाला बसला. सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळीवारे, लांबलेला पाऊस यामुळे काजुच्या उत्पादनांवर मोठा विपरित परिणाम झाला. मात्र, असे असले तरी काजु बी चे उत्पादन वाढ झाली नाही. २०२० मध्ये काजु बी चे दर प्रतिकिलो ६० रूपयांपर्यत आले होते. त्यानंतर या वर्षी काजू उत्पादन २५ टक्केवर आले असताना देखील काजू बी दर १३० ते १३५ रुपयांवरच राहिले. बदलत्या वातावरणामुळे काजू पीक उत्पादन सहज घेणे शक्य नसल्यामुळे गेल्या वर्षीपासूनच काजू लागवडीकडील शेतकऱ्यांचा कल होण्यास सुरूवात झाली. मागील काही वर्षाच्या तुलनेत ३० टक्केच लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काजू लागवडीखालील क्षेत्र वाढत असल्यामुळे अनेक रोपवाटिकाधारकांकडून हजारो काजू कलमांची बांधणी केली जाते. रोपवाटिकेवरच अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह आहे; परंतु, गेल्या वर्षी कित्येक रोपवाटिकांमध्ये हजारो काजू कलमे शिल्लक राहिली. या वर्षी देखील तीच समस्या रोपवाटिकांमधून दिसून येत आहे. काजू लागवडीखालील क्षेत्रामध्ये तुलनेने मोठी घट झाल्यामुळे रोपवाटिकांमध्ये कलमे शिल्लक राहत आहेत. ज्या रोपवाटिका चालकांचा संपर्क चांगला आहे त्यांना ही अडचण येत नसली तरी सर्वसामान्य रोपवाटिकांधारकांना ही समस्या भेडसावत आहे.

नियमित आणि एक वर्षाची काजू कलमांची विक्री केली जाते. नियमित कलमांची प्रतिरोप ६० रुपये तर एक वर्षाच्या काजू कलमांची प्रति रोप १०० ते १२० रुपयाने विक्री केली जाते. मात्र, मागणी कमी झाल्यामुळे काहीनी आता कमी दराने कलमे विक्रीस सुरूवात केली आहेत.

बदलत्या वातावरणाचा मोठा फटका काजू पिकाला बसला. त्यामुळे गेल्या वर्षीपासून काजू लागवडीकडील शेतकऱ्यांचा कल बदलला आहे. आता बांबू लागवडीवर भर दिसत आहे. काजुच्या तुलनेत बांबु लागवड, व्यवस्थापन आणि हमखास दर यामुळे याकडे ओढा दिसते.

रोपवाटिका कुसूरमध्ये असून अजूनही दोन तीन हजार रोपे शिल्लक आहेत. पूर्वीच्या तुलनेत रोपांची मागणी काहीशी कमी झाली आहे. रोपवाटिका वाढल्या आहेत, त्या तुलनेत लागवडीचे क्षेत्र वाढलेले नाही. त्यामुळे त्याचा देखील परिणाम मागणीवर होत आहे.

- मनोज पळसुले, रोपवाटिकाधारक, श्री रामेश्वर रोपवाटिका, कुसूर

काजू कलमांची मागणी आमच्याकडे दरवर्षीप्रमाणे आहे. काजू कलमे दर्जेदार पुरविण्यावर भर असतो. त्यामुळे आमच्याकडील मागणीत घट झालेली नाही.

- शीतल राणे, शीतल रोपवाटिका, साळिस्ते, कणकवली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com