सर्बिया ठरले सिकंदर कोस्टा रिकाचा भक्कम बचावास दाद न देता विजय

वृत्तसंस्था
Monday, 18 June 2018

विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत, तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जास्त योजनाबद्ध खेळ करीत सर्बियाने स्पर्धेत दीर्घ कालावधीनंतर विजय मिळवला. त्यांनी बचावात भक्कम असलेल्या कोस्टा रिकास 1-0 असे पराजित करीत बाद फेरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

सामारा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मोक्‍याच्या वेळी खेळ उंचावत, तसेच प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत जास्त योजनाबद्ध खेळ करीत सर्बियाने स्पर्धेत दीर्घ कालावधीनंतर विजय मिळवला. त्यांनी बचावात भक्कम असलेल्या कोस्टा रिकास 1-0 असे पराजित करीत बाद फेरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली. 

लढतीच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर दोन संघांत फारसा फरकही दिसणार नाही; पण अखेर सर्बिया कर्णधार अलेक्‍झांडर कोलारोव याच्या बहारदार फ्री किकने लढतीचा निर्णय केला. त्याने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या स्पेनविरुद्धच्या फ्री किकच्या आठवणीच जागवल्या. त्याची देहबोली पाहिल्यावर तो उजव्या पायाने चेंडू मारेल, असेच दर्शवत होती; पण त्याने डाव्या पायाने चेंडूला किक लगावत कोस्टा रिका खेळाडूंना गोंधळात टाकले. त्याने 25 यार्ड अंतरावर लाभलेली ही किक सत्कारणी केली. त्याने बचावभिंतीच्या वरून चेंडूला अचूक दिशा दिली. त्या वेळी ताकद, तसेच अचूकता याचा संगम त्यात साधला गेला होता. त्याने कोस्टा रिका गोलरक्षकास कोणतीही संधी दिली नाही आणि चेंडू गोलजाळ्याच्या वरच्या कोपऱ्यात गेला. 

कोस्टा रिकाचा खेळ तोडीस तोड होता. त्यांनी गोलच्या संधीही निर्माण केल्या, पण त्यांना त्या साधत्या आल्या नाहीत. बचावपटू गिआनकार्लो गोंझालेझ याचा हेडर सोडल्यास त्यांच्याकडून गोलचे योजनाबद्ध प्रयत्न दिसले नाहीत. 
सर्बिया हा विश्‍वकरंडकास पात्र ठरलेल्या युरोपीय देशातील सर्वांत खालच्या क्रमांकाचा देश, पण त्यांनीही युरोपीय संघांचे स्पर्धेतील वर्चस्व कायम ठेवले. कोस्टा रिकाचा गोलरक्षक नॅवास याच्या चांगल्या खेळामुळे सर्बियाला अधिक गोल करण्यात अपयश आले. 

लढत विशेष 
- कोस्टा रिकाने यापूर्वीच्या चार स्पर्धांत तीनदा सलामीची लढत जिंकली होती; तर एकच पराभव होता. 
- सर्बियाचा सात वर्ल्डकप लढतीतील हा केवळ दुसरा विजय; त्यापूर्वी पाच पराभव 
- स्पर्धेतील नऊ लढतींनंतर आता 22 गोल 
- कोलारोव याने या स्पर्धेतील डायरेक्‍ट फ्री किकवरील तिसरा गोल केला 
- चार वर्षांपूर्वीच्या ब्राझील स्पर्धेत डायरेक्‍ट फ्री किकवर एकंदरीत तीन गोल झाले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aleksander Kolarov wins game with stunning free kick goal