सलग दुसऱ्या पराभवाने कोरियाचे आव्हान संपुष्टात 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 June 2018

रोस्तोव : जगज्जेत्या जर्मनीला सलामीलाच पराभवाचा धक्का देणाऱ्या मेक्‍सिकोचा धडाका कायम ठेवत दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव केला. सलग दुसरा विजय मिळवत त्यांनी बाद फेरी निश्‍चित केली; तर सलग दुसऱ्या पराभवामुळे कोरियाचे आव्हान संपुष्टात आले. 

रोस्तोव : जगज्जेत्या जर्मनीला सलामीलाच पराभवाचा धक्का देणाऱ्या मेक्‍सिकोचा धडाका कायम ठेवत दक्षिण कोरियाचा 2-1 असा पराभव केला. सलग दुसरा विजय मिळवत त्यांनी बाद फेरी निश्‍चित केली; तर सलग दुसऱ्या पराभवामुळे कोरियाचे आव्हान संपुष्टात आले. 

विश्‍वकरंडक स्पर्धेत आशियाई प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध एकही लढत गमावलेली नसल्यामुळे इतिहास मेक्‍सिकोच्या बाजूने होता. त्यांना केवळ लय कायम ठेवायची होती; तर दुसऱ्या बाजूला आव्हान कायम ठेवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्‍यक होता. अखंड डावातील 0-2 पिछाडी भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला एका गोलाने कमी केल्यावर कोरियाने झुंझार प्रयत्न केले; परंतु पुढच्या तीन मिनिटांच्या वेळेत त्यांना कलाटणी देता आली नाही. 

कोरियाकडून जोरदार प्रयत्न होणार हे मेक्‍सिकोसाठी अपेक्षित होते, त्यामुळे त्यांनी सुरवातच सावध पण संयमी केली. अशीच सुरवात त्यांनी जर्मनीविरुद्ध केली आणि प्रतिस्पर्ध्यांचा अंदाज येताच वेग वाढवला होता. अशातच 26 व्या मिनिटाला मेक्‍सिकोला पेनल्टी किकचा बोनस मिळाला. गोलक्षेत्रात गौरडाडोने मारलेला चेंडू कोरियाच्या जुंग याच्या हाताला लागला, त्यामुळे मिळालेल्या पेनल्टीवर कार्लोस वेलाने गोल केला. 

पेनल्टीचे दुःख आणि त्यावर झालेला गोल यामुळे कोरियन बिथरले होते. बरोबरीसाठी त्यांच्याकडून प्रयत्न होत होते; पण आक्रमणात नियोजन नसल्यामुळे त्यांचे प्रयत्न फसत होते. मध्यंतरानंतरची सुरवात फार चांगली नव्हती. त्यातच हेर्नांडेसने मैदानी गोल करून 2-0 आघाडी मिळवली. 
अखेर कोरियाच्या सूनने तीन मिनिटांच्या भरपाई वेळेच्या सुरवातीलाच गोल केला; पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांचे आव्हान संपुष्टात आल्यातच जमा झाले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to a second straight loss to Korea's challenge