फ्रान्सकडून आईसलँडचा 5-2 असा धुव्वा

वृत्तसंस्था
Monday, 4 July 2016

पॅरिस - यजमान फ्रान्सने आईसलँडचा 5-2 असा धुव्वा उडवून युरो करंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा उपांत्य फेरीत जगज्जेत्या जर्मनीशी सामना होणार आहे.

 

पॅरिस - यजमान फ्रान्सने आईसलँडचा 5-2 असा धुव्वा उडवून युरो करंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा उपांत्य फेरीत जगज्जेत्या जर्मनीशी सामना होणार आहे.

 

स्टेड द फ्रान्स मैदानावर झालेल्या या सामन्यात फ्रान्सच्या संघाने सुरवातीपासून वर्चस्व राखले. फ्रान्सच्या ऑलिव्हियर गिरॉड याने नोंदविलेले दोन गोल फ्रान्सच्या विजयात महत्त्वाचे ठरले. गिरॉडने 12व्या मिनिटालाच गोल करत फ्रान्सचे खाते उघडले. त्यानंतर पॉल पोग्बाने 19 व्या मिनिटाला हेडरद्वारे गोल करत आघाडी वाढविली. दिमित्री पायेटने 42 व्या आणि अँटोनियो ग्रिझमनने 45 व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला पूर्वाधातच 4-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली.

 

फ्रान्सच्या जोरदार खेळापुढे आईसलँडचा संघ आपली चमक दाखविण्यात अपयशी ठरला. उत्तरार्धात आईसलँडच्या सिगथॉरसनने 56व्या मिनिटाला गोल करत पहिला गोल नोंदविला. पण, फ्रान्सच्या गिरॉडने 59 व्या मिनिटाला आणखी एक गोल करत फ्रान्सची आघाडी 5-1 अशी वाढविली. अखेर जॉर्नसनने 84 व्या मिनिटाला आईसलँडसाठी दुसरा गोल करत फ्रान्सची आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. आईसलँडच्या संघाने इंग्लंडचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. अवघी 3 लाख 30 हजार लोकसंख्या असलेल्या या देशाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे. 

 

युरो करंडकात आता उपांत्य फेरीचे संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य लढतीत पोर्तुगाल आणि वेल्स हे संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. तर, गुरुवारी मार्सेली येथे होणाऱ्या सामन्यात फ्रान्स आणि जर्मनी समोरासमोर असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: France beats Iceland 5-2 to reach Euro Cup Semi Final