esakal | जर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

 Germany will not automatically go to the next round

जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या काही जगज्जेत्यांचा दाखलासुद्धा दिला. 

जर्मनी आपोआप बाद फेरीत जाणार नाही

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को - जर्मनी जगज्जेते आहेत म्हणजे ते आपोआप बाद फेरीत जातील असे नाही, असा इशारा माजी जगज्जेते कर्णधार लोथार मथायस यांनी दिला. त्यांनी अलीकडच्या काही जगज्जेत्यांचा दाखलासुद्धा दिला. 

गतविजेत्या जर्मनीचा मेक्‍सिकोविरुद्ध सलामीला मानहानिकारक पराभव होणे धक्कादायक ठरले; पण गेल्या चार विश्‍वविजेत्यांपैकी फ्रान्स, इटली आणि स्पेन असे तीन संघ पुढील स्पर्धेत गटसाखळीतच गारद झाले, असे मथायस यांनी नमूद केले. 

जर्मनीचे प्रशिक्षक ज्योकिम लोव यांची रणनीती टीकेचा विषय ठरली आहे. संघ रशियाला रवाना होण्यापूर्वी लोव यांचा करार पुढील स्पर्धेपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे हा निकाल त्यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीमधील सर्वांत खराब क्षण मानला जात आहे. 1990चा विश्‍वविजेता कर्णधार मथायस यांची प्रतिक्रिया बोलकी ठरली. इतक्‍या मोठ्या स्पर्धेत इतक्‍या वर्षांत जर्मनीचा संघ एवढा कमकुवत संघ कधी पाहिला नव्हता. जवळपास प्रत्येक गोष्टीची उणीव होती. एकाग्रतेमध्ये चुका, अकारण खराब पास आणि देहबोलीचा अभाव होता, असे ते म्हणाले. 

लोव यांच्या डावपेचांचे नियोजन आणि क्षमतेनुसार खेळ न करणाऱ्या सामी खेदीरा, मेसूत ओझील अशा खेळाडूंना संधी देण्याचे धोरण टीकेचा विषय ठरले आहे. याशिवाय मॅंचेस्टर सिटीकडून चमकलेल्या लेरॉय सेन याला संधी न देणे आणखी अनपेक्षित होते. जर्मनीला आता स्वीडनविरुद्ध शनिवारी विजय अनिवार्य आहे. 

1974 मध्ये तत्कालीन पश्‍चिम जर्मनीकडून जगज्जेते ठरलेले खेळाडू पॉल ब्रेईट्‌नर यांचीसुद्धा निराशा झाली आहे. ते म्हणाले, मैदानावर जेव्हा कठीण परिस्थिती निर्माण झाली तेव्हा एकही खेळाडू पर्याय काढू शकला नाही, हेच जास्त चिंताजनक आहे. आमचा संघ किती असाह्य होता, हे पाहणे निराशाजनक ठरले.