क्रोएशियाकडून डेन्मार्क 'शूटआऊट' (मंदार ताम्हाणे)

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जुलै 2018

रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचे निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागले. यजमान रशियाने बलाढ्य स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 (1-1) असा पराभव केला. त्यामुळे आता उपउपांत्य फेरीत रशिया आणि क्रोएशिया यांच्यात सामना होणार आहे. जर्मनी, पोर्तुगाल, अर्जेंटिना यांच्यापाठोपाठ स्पेनही उपउपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्यांच्याकडे विश्वकरंडक विजयाचे दावेदार म्हणून पाहत होते.

नाट्यमय पेनल्टी शुटआऊटमध्ये क्रोएशियाने डेन्मार्कचा पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. सामना अतिरिक्त वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर क्रोएशियाने डेन्मार्कचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा पराभव केला.

या सामन्याच्या पहिल्या मिनिटातच म्हणजे 57 व्या सेकंदाला डेन्मार्कने पहिला गोल नोंदविला. डेन्मार्कच्या मखायस योरगेन्सन याने गोल केला. विश्वकरंडकाच्या इतिहासातील हा दुसरा वेगवान गोल होता. यापूर्वी 2014 अमेरिका आणि घाना यांच्यात झालेल्या सामन्यात अमेरिकेने 29 व्या सेकंदात गोल झाला होता. पहिल्याच मिनिटाला पिछाडीवर पडलेल्या क्रोएशियाने आक्रमक खेळ सुरु ठेवला. क्रोएशियाने 4 व्या मिनिटाला मारियो मांझुकिच याने बरोबरी साधून दिली. हा सुद्धा विश्वकरंडकातील एक विक्रमच होता. विश्वकरंडकात पहिल्या चार मिनिटात दोन गोल होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 मध्ये अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी पहिल्या चार मिनिटांत एक-एक गोल केले होते. सामन्याची निर्धारित वेळ आणि अतिरिक्त वेळेतही सामना बरोबरीतच राहिला.

दोन्ही संघांनी चांगला खेळ केला. क्रोएशियाच्या सरस खेळाचे सामन्यावर वर्चस्व असले तरीही डेन्मार्कने त्यांना गोल करण्यापासून रोखले. अतिरिक्त वेळेत 116 व्या मिनिटाला क्रोएशियाला पेनल्टी मिळाली. पण, कर्णधार लुका मॉड्रीचला त्यावर गोल करण्यात अपयश आले. डेन्मार्कचा गोलरक्षक कास्पर शिमायकल याने अप्रतिम बचाव करत क्रोएशियाला विजयापासून रोखले आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये नेला. शिमायकलने हीच कामगिरी पेनल्टी शूटआऊटमध्ये कायम ठेवत क्रोएशियाच्या दोन पेनल्टी अडविल्या. मात्र, अखेर या सामन्याचा हिरो क्रोएशियाचा गोलरक्षक ठरला. गोलरक्षक डॅनियल सुबासिच याने तीन पेनल्टी अडवून क्रोएशियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-2 असा विजय मिळवून दिला. कर्णधार मॉड्रीचला शूटआऊटमध्ये मात्र पेनल्टीवर गोल करण्यात यश आले. या विजयासह क्रोएशिया 1998 च्या विश्वकरंडकानंतर प्रथमच उपउपांत्य फेरीत दाखल झाले आहे.

रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यांचे निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागले. यजमान रशियाने बलाढ्य स्पेनला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 (1-1) असा पराभव केला. त्यामुळे आता उपउपांत्य फेरीत रशिया आणि क्रोएशिया यांच्यात सामना होणार आहे. जर्मनी, पोर्तुगाल, अर्जेंटिना यांच्यापाठोपाठ स्पेनही उपउपांत्य फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. त्यांच्याकडे विश्वकरंडक विजयाचे दावेदार म्हणून पाहत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mandar Tamhane writes about Football World Cup Croatia Denmark match