Asian Games 2018 : भारतीय हॉकी संघांना इतिहास घडवण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महाकुंभास दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्याने सुरवात झाली आहे आणि केवळ हॉकी रसिकांनाच नव्हे, तर देशातील सर्वच क्रीडाप्रेमींना हॉकीतील डबल गोल्डचे वेध लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. कागदावर आपले संघ सर्वांत ताकदवान आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आपल्या दोन्ही संघांना अव्वल मानांकन मिळाले आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महाकुंभास दिमाखदार उद्‌घाटन सोहळ्याने सुरवात झाली आहे आणि केवळ हॉकी रसिकांनाच नव्हे, तर देशातील सर्वच क्रीडाप्रेमींना हॉकीतील डबल गोल्डचे वेध लागले आहेत. त्यात गैर काहीच नाही. कागदावर आपले संघ सर्वांत ताकदवान आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच आपल्या दोन्ही संघांना अव्वल मानांकन मिळाले आहे.

गेलोरा कार्नो  क्रीडा संकुलातील या स्पर्धेत भारतीय पुरुषांसमोरील आव्हान महिलांच्या तुलनेत सोपे आहे. एकंदरीत एकाच स्पर्धेत दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकण्याचा इतिहास नक्कीच घडू शकतो. भारताचे दोन्ही संघ सध्या आशिया कप विजेते आहेत, त्यांची पुनरावृत्ती आशियाई क्रीडा स्पर्धेत नक्कीच घडू शकते. 

साखळी लढतीचा विचार केल्यास भारतीय महिलांसमोरील सर्वांत खडतर आव्हान दक्षिण कोरियाविरुद्धची लढत असेल. आपला फॉर्म बघितला तर शनिवारची ही लढत आपण जिंकू शकतो. अन्य लढतीत कामगिरी कशी होते, ते बाद फेरीच्या लढतींच्या दृष्टीने मोलाचे असेल. शुअर्ड मरिन हे मेहनती तसेच अनुभवी मार्गदर्शक आहेत; पण महिला संघाच्या प्रगतीस खऱ्या अर्थाने सुरवात हरेंदर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. त्यांनी संघातील खेळाडूंचा आत्मविश्‍वास उंचावला. रिओ ऑलिंपिकनंतर निराश झालेल्या महिला खेळाडूंत चैतन्य आणले. त्यांनी आक्रमक खेळ करण्यासाठी खेळाडूंना प्रेरित केले. पूर्ण ताकदीने होणारी आक्रमणे हे वैशिष्ट्य म्हणता येईल. मैदानाच्या मध्यभागी भक्कम बचाव असल्याने प्रतिस्पर्ध्यांना दोन्ही बगलातूनच आक्रमण करावे लागते. 

भारतीय बचावाची ताकद गोलरक्षक सविता नक्कीच वाढवत आहे. तिची जगातील सर्वोत्तम पाच गोलरक्षकांत गणना होत आहे. विश्‍वकरंडक स्पर्धेतील चांगल्या कामगिरीने तिचा आत्मविश्‍वास नक्कीच उंचावलेला आहे. या स्पर्धेतील भारताचे यशापयश तिची कामगिरी नक्कीच निश्‍चित करेल. गुरजित कौरची तिला बचावात साथ लाभेल, तसेच तिचे ड्रॅग फ्लिकही भारतासाठी मोलाच्या असतील. दडपणाखाली ती कशी कामगिरी करते याकडे माझे जास्त लक्ष असेल. मधल्या फळीतील दीपिका चांगला समन्वय राखते. राणी रामपाल आणि वंदना कटारिया सध्या छान बहरात आहेत.

भारताच्या उंचावत असलेल्या कामगिरीचे श्रेय शुअर्ड मरिन यांच्याऐवजी हरेंदर सिंग यांनाच जास्त देणे योग्य होईल. भारतीय महिला हॉकीतील हा समतोल संघ नक्कीच ऑलिंपिक तिकिटासाठी प्रबळ दावेदार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Asian Games 2018 Indian Hockey Team History