क्षमता ओळखण्याची संधी - सुनीता 

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 मे 2018

आशियाई चॅंपियन्ससाठी भारतीय महिला हॉकी संघ कोरियाला रवाना झाला आहे.

नवी दिल्ली - आशियाई महिला चॅंपियन्स करंडक स्पर्धा ही भारतीय संघासाठी क्षमता ओळखण्याची एक संधी असल्याचे मत कर्णधार सुनीता लाक्रा हिने व्यक्त केले. भारतीय महिला हॉकी संघ या स्पर्धेसाठी आज कोरियाला रवाना झाला. 
ही स्पर्धा रविवारपासून (ता. 13) कोरियात डोंगी येथे सुरू होणार आहे. रवाना होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना सुनीता म्हणाली, ""यावर्षी ऑगस्टमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. यापूर्वी आशियाई चॅंपियन्स स्पर्धा खेळायला मिळणे खूप चांगले आहे. या स्पर्धेतून आम्हाला आमची क्षमता ओळखण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतील अनुभवाचा आम्हाला या वेळी फायदा होईल.'' 
ऑस्ट्रेलियात अलीकडेच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय महिला चौथ्या स्थानी राहिल्या होत्या. सुनीता म्हणाली, ""राष्ट्रकुलमध्ये आम्हाला पदकाची संधी होती. पण, कमी अधिक प्रमाणात आम्ही खेळ उंचावण्यात कमी पडलो. पण, या अनुभवातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. त्यामुळे या वेळी आम्ही अधिक चांगल्या तयारीने उतरू.'' 

चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारतासह यजमान दक्षिण कोरिया, जपान, चीन, मलेशिया संघांचा सहभाग आहे. जपानविरुद्ध भारताची सलामीची लढत होईल. भारताने यापूर्वी 2016 मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे. सुनीता म्हणाली, ""आम्हाला तीच कामगिरी या वेळी पुन्हा करून दाखवायची आहे. आम्हाला कर्णधार राणी रामपाल, पूनम राणी, सुशीला चानू यांची उणीव जरूर भासेल, पण त्यांच्या गैरहजेरीत युवा खेळाडू आपली योग्यता दाखवून देतील, असा मला विश्‍वास आहे.'' 

आम्ही गेली काही वर्षे एकत्र खेळत आहोत. प्रत्येकाला आपल्या खेळाची जाण आहे. अनुभवी खेळाडूंच्या गैरहजेरीत युवा खेळाडूंना आपली कामगिरी दाखविण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्याचा ते फायदा उठवतील. 
- सुनीता लाक्रा, भारताची कर्णधार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: need to verify our capacity says sunita