रूपिंदर पालची ऐतिहासिक दुहेरी हॅट्ट्रिक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

1986 च्या सोल आशियाई क्रीडा स्पर्धेत महंमद शहिदने दुहेरी हॅट्ट्रिक केली होती, त्यानंतर प्रथमच भारतीय हॉकीपटूने दुहेरी हॅट्ट्रिक केली आहे, असे नामवंत हॉकी सांख्यिकी तज्ज्ञ बी. जी. जोशी यांनी सांगितले. भारतीयांकडून पहिली दुहेरी हॅट्ट्रिक रूपसिंग यांनी 1932 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत केली होती.

मुंबई : रूपिंदर पाल सिंगच्या दुहेरी हॅटट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जोरदार सलामी दिली. गतविजेते पाकिस्तान पराजित होत असताना भारताने जपानचा 10-2 असा धुवा उडवत आपणच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले.

रुपिंदरची ही कामगिरी भारतीय हॉकीत ऐतिहासिकच म्हणायला हवी. 1986 च्या सोल आशियाई क्रीडा स्पर्धेत महंमद शहिदने दुहेरी हॅट्ट्रिक केली होती, त्यानंतर प्रथमच भारतीय हॉकीपटूने दुहेरी हॅट्ट्रिक केली आहे, असे नामवंत हॉकी सांख्यिकी तज्ज्ञ बी. जी. जोशी यांनी सांगितले. भारतीयांकडून पहिली दुहेरी हॅट्ट्रिक रूपसिंग यांनी 1932 च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत केली होती.

त्या वेळी त्यांनी वैयक्तिक दहा गोल केले होते, आता भारतीयांनी एकंदरीत दहा गोल केले, याकडेही जोशी यांनी लक्ष वेधले.

मलेशियात आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत रूपिंदरच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारतीयांनी सुरवातीपासून गोलधडाका सुरू केला. पहिल्या दोन सत्रात सात गोल करीत लढतीचा निकाल स्पष्ट केला होता. त्या वेळी माफक संधीचे गोलात रूपांतर करण्याची भारतीयांची हातोटी सुखद धक्का देणारी होती. जपानचा खेळ पंचिंग बॅग होण्याइतका खराब नक्कीच नव्हता, पण भारतीयांची अचूकता जास्त होती. रूपिंदरच्या धडाक्‍याप्रमाणेच रमणदीपने दोन, तर तलविंदर आणि नवोदित युसुफ अफ्फान यांनी प्रत्येकी एक गोल केला.

सलामीला पाकिस्तानचा पराभव
गतविजेत्या पाकिस्तानला सलामीच्या लढतीत यजमान मलेशियाविरुद्ध 2-4 अशा पराभवास सामोरे जावे लागले. उत्तरार्धाच्या सुरवातीस पाकने 2-1 आघाडी घेतली होती. त्यानंतर काही वेळेत जोरदार पाऊस सुरू झाला. वीस मिनिटांनंतर खेळ सुरू झाला, त्या वेळी पाकचा सूर हरपला होता. मलेशियाच्या आक्रमणासमोर ते पार कोलमडले. सामन्यातील अखेरच्या मिनिटासही पाकला गोल स्वीकारावा लागला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupindar Pal Singh scores double hat-trick; India beats Japan 10-2