भारत-बेल्जियम निर्णायक लढत

वृत्तसंस्था
रविवार, 21 जानेवारी 2018

आम्ही या सामन्यात चांगली सुरवात केली. प्रत्येकाचा खेळ उंचावत असल्याचे दिसून येत आहे. आता यामध्ये सातत्य राहणे महत्त्वाचे आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी आम्ही ज्या प्रकारे तयार केली होती, तसाच खेळ झाल्याने मी समाधानी आहे.
- जोएर्ड मरिने,  भारतीय प्रशिक्षक

नवी दिल्ली - हरमनप्रीत, दिलप्रीत आणि मनदीप यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर भारताने यजमान न्यूझीलंडचा ३-१ असा पराभव करून चार राष्ट्रांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ही स्पर्धा ब्लेक पार्क, तौरंगा येथे सुरू आहे. उद्या होणाऱ्या विजेतेपदासाठी ऑलिंपिक रौप्य विजेते बेल्जियम भारताचे प्रतिस्पर्धी असतील.

जपानचा ६-० असा धुव्वा उडवून या स्पर्धेची मोहीम सुरू करणाऱ्या भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध बरोबरी पुरेशी ठरणार होती; परंतु न्यूझीलंडला हरवूनच त्यांनी निर्णायक सामन्यात खेळण्याचा बहुमान पक्का केला. 

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने गोल केला. त्यानंतर दिलप्रीतने २१ व्या मिनिटाला गोल करून भारताची आघाडी वाढवली. पहिल्या अर्ध्यात मागे पडलेल्या न्यूझीलंडने पुढच्या अर्ध्यात प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीही पेनल्टी कॉर्नरची संधी साधली. ४५ व्या मिनिटाला रसेलने न्यूझीलंडसाठी पिछाडी एका गोलने कमी करण्याचा गोल केला; परंतु भारताला झुंजवण्याच्या न्यूझीलंडच्या आशा दोन मिनिटांतच स्ट्रायकर मनदीपने संपुष्टात आणल्या. ४७ व्या मिनिटाला गोल करून त्याने भारताचा विजय निश्‍चित केला होता.  तीन सामन्यांपैकी भारताला एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याच बेल्जियमविरुद्ध उद्या विजेतेपदासाठी लढावे लागणार आहे. बेल्जियमने सलग तिसरा विजय मिळवताना जपानवर ४-१ अशी मात केली.

Web Title: sports news hockey india Belgium