औरंगाबादच्या प्रथमेश बेराडची गरुडझेप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : नागपुरात झालेल्या राज्यस्तरीय ज्युनिअर बॉक्‍सिंग स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरणातील (साई) खेळाडू प्रथमेश बेराड याने सुवर्णपदकाला गवसणी घालत अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेतून प्रथमेशने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. प्रथमेश हा मूळचा शेंदुर्णी (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील रहिवासी आहे.

नागपुरात ता. 15 ते 18 ऑक्‍टोबरदरम्यान झालेल्या राज्य ज्युनिअर बॉक्‍सिंग स्पर्धेत औरंगाबादच्या साई केंद्रात सराव करणाऱ्या प्रथमेश बेराड आणि शिवराम चव्हाण या दोघांनी पदकाला गवसणी घातली आहे. 63 किलो वजन आणि 17 वर्षीय गटात खेळणाऱ्या प्रथमेशने जळगावच्या तुषार ससाणे याला 3-0 ने थेट धूळ चारली आणि अव्वल स्थान पटकावले. त्याची निवड नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली असल्याची माहिती त्याचे प्रशिक्षक सनी गेलावत यांनी दिली. 

साई केंद्रातच प्रशिक्षण घेणारा परंतु मूळ बीड येथील असलेल्या शिवराम चव्हाणनेही कास्यपदक मिळवले. त्याने 50 किलो आणि 17 वर्षे वजनगटात ही कामगिरी केली. उपांत्य फेरीतील त्याचा सामना हा मुंबईच्या अमान यादवशी झाला. त्यात पराभव स्वीकारावा लागल्याने शिवरामला कास्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रथमेशने नुकत्याच झालेल्या विभागीय स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई करत राज्यस्तरीय स्पर्धेत निवड निश्‍चित केली आहे.

साईच्या पश्‍चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, व्यवस्थापक के. संतोष, प्रशिक्षक सनी गेलावत, श्री. चंद्रलाल, क्रीडा शिक्षक आरिफ शेख यांच्या मार्गदर्शनात तो प्रशिक्षण घेत असून खुलताबाद येथील कोहिनूर कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा बॉक्‍सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, प्रशिक्षक सनी गेलावत, राहुल टाक, अजय यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in boxing Prathamesh Berad from Aurangabad