‘प्रॅक्‍टिस (अ)’चा ‘पाटाकडील (ब)’वर विजय

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

कोल्हापूर - प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबने (अ) पाटाकडील तालीम मंडळाला (ब) ३-० ने पराभूत करीत अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. ‘प्रॅक्‍टिस’च्या सागर चिले याने दोन गोल नोंदवून सामनावीरचा मान मिळविला.

कोल्हापूर - प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबने (अ) पाटाकडील तालीम मंडळाला (ब) ३-० ने पराभूत करीत अटल चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. ‘प्रॅक्‍टिस’च्या सागर चिले याने दोन गोल नोंदवून सामनावीरचा मान मिळविला. ‘पाटाकडील’च्या खेळाडूंनी ‘प्रॅक्‍टिस’विरुद्ध चिवट झुंज दिली. उत्तरार्धात त्यांची बचावफळी कमकुवत झाल्याने त्याचा नेमका फायदा ‘प्रॅक्‍टिस’ने उठविला. 

नेताजी तरुण मंडळ व कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हतर्फे छत्रपती शाहू स्टेडियममवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रॅक्‍टिसकडून नोंदणीकृत झालेला कैलास पाटील मैदानात उतरला. डाव्या पायाने चेंडू खेळण्यात त्याचे प्रभूत्त्व असल्याने प्रॅक्‍टिसचे पारडे जड असले तरी पाटाकडीलच्या वेगवान व दमदार खेळाडूंचे प्रॅक्‍टिससमोर आव्हान होते.

प्रॅक्‍टिसने सुरवातीला पाटाकडीलच्या खेळाडूंवर पकड मजबूत ठेवत पाटाकडीलच्या गोलक्षेत्रात शिरकाव केला. पाटाकडीलच्या बचावफळीने त्यांना दाद दिली नाही. या वेळेत प्रॅक्‍टिसच्या माणिक पाटील याच्या कॉर्नर किकवर फ्रान्सिसने १९ व्या मिनिटाला हेडद्वारे गोल केला. पाटाकडीलच्या खेळाडूस अवैधरित्या अडवल्याने त्यांना फ्री किक मिळाली. त्यांच्या प्रथमेश हेरेकरने मारलेला चेंडू प्रॅक्‍टिसच्या गोलजाळीवरुन गेला. एक गोल झाल्याने प्रॅक्‍टिसने खेळ संथ केला. शॉर्ट पास देत चढायांचे धोरण अवलंबले. 

उत्तरार्धात पाटाकडीलच्या खेळाडूने प्रॅक्‍टिसच्या गोलक्षेत्रात चढाई केली. क्षणाची उसंत न दवडता प्रॅक्‍टिसचा गोलरक्षक राजीव मिरीयाल याने पुढे सरसावत चेंडू अडवला; मात्र चेंडूवर त्याची पूर्ण पकड न राहिल्याने पाटाकडीलच्या खेळाडूने चेंडूस फटका दिला. गोलकडे झेपावणाऱ्या चेंडूस प्रॅक्‍टिसच्या सचिन बारामते याने वेळीच अडवून गोलचे संकट टाळले.

पाटाकडीलच्या आकाश पाटीलने कॉर्नर किकवर सुनीत पाटीलला चेंडूचा पास दिला. सुनीतने लगावलेला चेंडू प्रॅक्‍टिसच्या गोलजाळीजवळून गेला. प्रॅक्‍टिसच्या सचिन बारामतेने पाटाकडीलच्या डाव्या गोलक्षेत्रातून मारलेल्या चेंडूस राहूल पाटीलने हेड मारली. गोलक्षेत्रासमोर उभ्या असलेल्या पाटाकडीलच्या खेळाडूने चेंडूस फटका लगावला. लगोलग झालेल्या चढाईत पाटाकडीलच्या ऋषीकेश मोरेने मारलेला चेंडू प्रॅक्‍टिसच्या गोलजाळीवरुन गेला. त्यांच्या प्रथमेश हेरेकरने दिलेल्या पासचा फायदा साईराज पाटीलने उठला नाही.

प्रथमेशने प्रॅक्‍टिसच्या गोलजाळीसमोरुन मारलेला चेंडू प्रॅक्‍टिसचा गोलरक्षक राजीव मिरीयालने उत्कृष्टरित्या तटवला. प्रॅक्‍टिसच्या राहूल पाटील याच्या पासवर सागर चिले याने ७१ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर त्याने ८२ व्या मिनिटाला गोल करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

आजचे सामने 

  •  प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लब (ब) विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ, वेळ - दुपारी २ 
  •  शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ, वेळ - दुपारी ४ वाजता
Web Title: Kolhapur News Atal award Football competition