फुलेवाडी जिंकता जिंकता हरले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत सामना संपण्यास केवळ तीन तीन मिनिटे शिल्लक असताना संध्यामठ तरुण मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २ विरुद्ध १ गोल फरकाने आज खेळ खल्लास केला.

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत सामना संपण्यास केवळ तीन तीन मिनिटे शिल्लक असताना संध्यामठ तरुण मंडळाने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाचा २ विरुद्ध १ गोल फरकाने आज खेळ खल्लास केला. तीन मिनिटांत दोन गोल नोंदवून संध्यामठने फुलेवाडीच्या गोटात खळबळ उडवून दिली. अतिरिक्त वेळेत संध्यामठकडून गोल होणार नाही, या अपेक्षेने छत्रपती शाहू स्टेडियमबाहेर गेलेल्या फुटबॉलप्रेमींना संध्यामठ जिंकल्याचे कळताच आश्‍चर्याचा धक्का बसला. 

फुलेवाडीकडून संकेत साळोखेने १६ व्या मिनिटाला गोल केला. रोहित मंडलिक, सूरज शिंगटे, शुभम साळोखे, सिद्धेश यादव यांनी शॉर्ट पास देत पुढच्या फळीतील खेळाडूंना गोल करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या. संध्यामठकडून सतीश अहिर, अक्षय पाटील, शाहू भोईटे, आशिष पाटील, सिद्धार्थ कुऱ्हाडे यांनी फुलेवाडीच्या खेळाडूंना चकवत चेंडू गोलक्षेत्रात नेण्यावर भर दिला. एकमेकांना पास देत गोल करण्याचा प्रयत्न केला. परस्परांतील असमन्वय व दिशाहीन फटक्‍यांमुळे चेंडू फुलेवाडीच्या गोलजाळीजवळून गेला. एक गोलची आघाडी घेतल्याने फुलेवाडीने सावध खेळ केला. 

उत्तरार्धात फुलेवाडीच्या सूरज शिंगटेच्या पासवर केन, अक्षय मंडलिकच्या पासवर सूरज, केनच्या पासवर अक्षय गोल करण्यात कमी पडले. रोहित मंडलिने मिळालेली फ्रीकिक दवडली. या वेळेत संध्यामठच्या खेळाडूंनी गोलसाठी इर्षेने खेळ केला; मात्र त्यांच्या चढायात म्हणावा तितका जोर नव्हता. त्यांच्या अजिंक्‍य गुजरने संध्यामठच्या गोलक्षेत्रात चेंडू मिळूनही चेंडूस गोलजाळीबाहेर फटका मारला. ओंकार पावसकरने मारलेला चेंडूही फुलेवाडीच्या गोलजाळीजवळून गेला. त्यानंतर पुन्हा अजिंक्‍य व अक्षयने गोलची संधी गमावल्यानंतर संध्यामठकडून गोल होणारच नाही, अशी अटकळ फुटबॉलप्रेमींनी बांधली. 

सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असल्याचे चौथ्या पंचांकडून सांगण्यात आल्यानंतर स्टेडियममधील निम्मे फुटबॉलप्रेमी स्टेडियममधून बाहेर पडले आणि याच वेळेत संध्यामठच्या खेळाडूंनी कमाल केली. सतीश अहिरने फुलेवाडीच्या उजव्या बगलेतून गोलक्षेत्रात मुसंडी मारत चेंडूस थेट गोलजाळीची दिशा दाखवली. या गोलने संध्यामठच्या खेळाडूंना स्फूरण चढले, तर फुलेवाडीच्या गोटात चिंता पसरली. या गोलपाठोपाठ झालेल्या चढाईत पुन्हा सतीशने फुलेवाडीच्या गोलजाळीच्या दिशेने चाल केली आणि चेंडूत पुन्हा गोलजाळीत धाडले. 

आजचा सामना 
पाटाकडील तालीम मंडळ (अ) विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ (अ), 
वेळ - दुपारी ४ वाजता.

Web Title: Kolhapur News KSA Football competition