मार्व्हलसला नमवून आर. सी. शिरोली विजेता

मार्व्हलसला नमवून आर. सी. शिरोली विजेता

कोल्हापूर - प्रकाशझोतात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने मार्व्हलस सुपर रेंजर्सवर सहा गडी राखून मात करीत ‘सकाळ’ रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या करंडकावर आपले नाव कोरले. मार्व्हलसचे महत्त्वपूर्ण तीन गडी बाद करीत आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरिअर्सच्या महादेव नरके यांनी विजयाचा पाया मजबूत केला आणि धीरज पाटील याने उत्कृष्ट फलंदाजीने त्यावर कळस चढविला.

‘सकाळ’ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलतर्फे आयोजित ‘सकाळ’-रोटरी प्रीमिअर लीग करंडक क्रिकेट स्पर्धेस मेरी वेदर मैदानावर ही स्पर्धा जल्लोषात झाली. ऋतुराज पाटील फाउंडेशन स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, हॉटेल सिट्रस हॉस्पिटॅलिटी व डॉ. पटवर्धन यांचे नंदादीप नेत्रालय हे कॅप्स पार्टनर, तर रेडिओ सिटी रेडिओ पार्टनर होते.  

मार्व्हलस सुपर रेंजर्सने प्रथम फलंदाजी करीत दहा षटकांत आठ गडी गमावून ७० धावा केल्या. कर्णधार रवीराज शिंदेने १२ चेंडूंत २१ धावा केल्या. राजेश रेड्डीजने १६ चेंडूंत १५ धावा फटकावून संघाला चांगली सुरवात करून दिली. सचिन गाडगीळने फटकावलेल्या चेंडूचा आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सचा कर्णधार अजित जाधवने उत्कृष्ट झेल पकडला. त्यानंतर मैदानात आलेला नामदेव गुरव व निशिकांत नलवडे शून्य धावेवर बाद झाले. महादेव नरके यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीवर हे फलंदाज झटपट बाद झाल्याने मार्व्हलसला धक्के बसले. स्वप्नील कांबळेला तीन, अवधूत भाट्ये १६, तर नागराज भटला सहा धावा करता आल्या. आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सकडून महादेव नरके यांनी दोन षटकांत १६ धावा देत तीन गडी बाद केले. अमित सोनवणेने दोन व सचिन पाटीलने एक गडी बाद केला. 

प्रत्त्युतरादाखल आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने आठ षटके चार चेंडूंत ७३ धावा फटकावून सामना जिंकला. त्यांचे चार गडी बाद झाले. सलामीचे फलंदाज धर्मेंद्र खिलारे शून्य व सचिन पाटील केवळ एक धाव काढून बाद झाले. झटपट दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आर. सी. वॉरियर्सच्या फलंदाजांवर दबाव वाढला. या स्थितीत कर्णधार अजित जाधव व धीरज पाटील यांनी संयमी फलंदाजी करीत धावसंख्या वाढविण्यावर भर दिला. अजित जाधव १९ चेंडूंत १९ धावा काढून पायचित झाला. त्याने दोन चौकार ठोकले. आर. सी. वॉरियर्सने सात षटकांत ५० धावा केल्यानंतर त्यांना जिंकण्यासाठी १८ चेंडूंत २१ धावांची आवश्‍यकता होती. आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धीरज पाटीलने षटकार ठोकला. धीरज १७ चेंडूंत ३४ धावा फटकावून बाद झाला. त्याने दोन षटकार व तीन चौकार ठोकून उत्कृष्ट फलंदाजी केली. सामना जिंकण्यास दोन धावा हव्या असताना तो बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या महादेव नरके यांनी चौकार ठोकून संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. 
त्या आधी झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात पास्ट रोट्रॅक्‍टर्सने १० षटकांत नऊ गडी गमावून ८४ धावा केल्या. त्यांचा सलामीचा फलंदाज अजित मडके एक धाव काढून बाद झाला. राजू करूरने २२ चेंडूंत २७ धावा केल्या. सचिन देशमुख शून्य, तर प्रसन्न जोशी चार धावांवर बाद झाल्यानंतर नीलेश मुळेने १४ व गोपाळ गवसने २७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार अमित दड्डीकर शून्य, प्रवीण काजवे एक व गिरीश हप्पीळहोळी शून्यावर तंबूत परतला. मकरंद भुर्केने नाबाद सहा व अभिजित भोसलेने नाबाद एक धाव केली. मार्व्हलस सुपर रेंजर्सकडून नामदेव गुरवने दोन षटकांत १७ धावा देत तीन गडी बाद केले. स्वप्नील कांबळे, राजेश रेड्डीज व सचिन गाडगीळने प्रत्येकी एक गडी बाद केला. प्रत्त्युतरादाखल मार्व्हलस सुपर रेंजर्सने नऊ षटके तीन चेंडूंत चार गडी गमावून ८७ धावा फटकावल्या. रवीराज शिंदेने पाच, राजेश रेड्डीजने १५ धावांचे योगदान दिले. स्वप्नील कांबळेने २३ चेंडूंत ३४, सचिन गाडगीळ १२, नामदेव गुरवने नाबाद १६ धावा केल्या. पास्ट रोट्रॅक्‍टर्सकडून अमित दड्डीकर, राजू करूर व मकरंद भुर्केने प्रत्येकी एक गडी बाद केला. 

दुसऱ्या उपांत्य फेरीतील सामन्यात आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने प्रोफेशनल चॅलेंजर्सवर नऊ गडी राखून मात केली. प्रोफेशनल चॅलेंजर्सने प्रथम फलंदाजी करताना दहा षटकांत चार गडी गमावून ७६ धावा केल्या. जयजित परितकरने ३३ चेंडूंत ४९, तर अनिल देशमुख यांनी १३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर अन्य फलंदाज मैदानावर आपली चमक दाखवू शकले नाहीत. कर्णधार सचिन परांजपे दोन, सरगम फलारे शून्य, मयूर पटेल चार धावांवर बाद झाला. राजेंद्र बाडने नाबाद एक व संतोष साखरेने नाबाद तीन धावा केल्या. आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सकडून सचिन पाटीलने दोन गडी बाद केले. प्रत्त्युतरादाखल आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सच्या फलंदाजांनी कमाल केली. त्यांनी अवघ्या सात षटके दोन चेंडूंत एक गडी गमावून ७८ धावा केल्या. धर्मेंद्र खिलारे दोन धावांवर बाद झाल्यानंतर मैदानात उतरलेल्या सचिन पाटीलने २५ चेंडूंत नाबाद ४१ धावा ठोकल्या. त्यात दोन षटकार व तीन चौकारांचा समावेश होता. कर्णधार अजित जाधवने १६ चेंडूंत नाबाद २३ धावा केल्या. प्रोफेशनल चॅलेंजर्सकडून राजू केसरेने एक गडी बाद केला. 

दरम्यान, स्पर्धेनंतर डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्‍वस्त ऋतुराज पाटील, रोटरी डिस्ट्रिक्‍ट ३१७० चे गव्हर्नर आनंद कुलकर्णी व ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. या वेळी संग्राम पाटील (एमडब्ल्यूजी सुपर किंग्ज), अतुल पाटील, जयजित परितकर, प्रकाश राठोड (प्रोफेशनल चॅलेंजर्स), सूरजित पवार (मार्व्हलस सुपर रेंजर्स), डॉ. भारत खराटे (चाटे चॅंम्प्स), राजेश आडके, गौतम परमार, सागर नालंग, हेमांग शहा (स्नॅप स्पेक्‍ट्रम), मोहन मुल्हेरकर, शरद पाटील, संजीव परीख, अजय कुलकर्णी (रोटरी क्‍लब शिरोली एमआयडीसी वॉरियर्स), मनोज मुनिश्‍वर, अमित दड्डीकर, अनिकेत अष्टेकर (पास्ट रोटरॅक्‍टर्स), आनंद कुलकर्णी (बेलगाम ट्रेंड सेटर्स), रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष संग्राम शेवरे, सचिव जिया मोमीन, इव्हेंट चेअरमन आर. वाय. पाटील, प्रकाश जगदाळे, संजय कदम, संदीप साळोखे, राजेश वोरा, संजय भगत, सूर्यकांत पाटील उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com