तीन युवती पंच प्रशिक्षणासाठी उतरल्या मैदानात!

संदीप खांडेकर
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कोल्हापूर - अनुभवी असो की, उदयोन्मुख खेळाडू, ज्यांना नियमांच्या फुटबॉल भलेही समजून घ्यायचा नसेल. मात्र, फुटबॉल पंचाचे प्रशिक्षण हवे आहे, या ज्ञान लालसेतून तीन महिला फुटबॉलपटूंनी पंच प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. प्रियांका सुरेश गवळी, तेजस्विनी मोहन कोळसे व सोनाली जयवंत साळवी अशी त्यांची नावे आहेत.

कोल्हापूर - अनुभवी असो की, उदयोन्मुख खेळाडू, ज्यांना नियमांच्या फुटबॉल भलेही समजून घ्यायचा नसेल. मात्र, फुटबॉल पंचाचे प्रशिक्षण हवे आहे, या ज्ञान लालसेतून तीन महिला फुटबॉलपटूंनी पंच प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. प्रियांका सुरेश गवळी, तेजस्विनी मोहन कोळसे व सोनाली जयवंत साळवी अशी त्यांची नावे आहेत. विशेष म्हणजे, त्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. कोल्हापूर रेफ्री असोसिएशन व केएसएने केलेल्या आवाहनानुसार पंच प्रशिक्षणासाठी केवळ सात खेळाडूंची नोंदणी झाली असून, त्यात या तीन महिला खेळाडूंचा समावेश आहे. 

छत्रपती शाहू स्टेडियमवर पंचांची कमतरता आहे. तेच तेच पंच मैदानावर दिसत असून, नवे पंच तयार होण्यासाठी रेफ्री असोसिएशनने एक पाऊल पुढे टाकले. केएसएने सर्व संघांना दोन ते चार खेळाडू पंच प्रशिक्षणासाठी पाठविण्याची सूचना केली. त्यासाठी १० ते १३ जानेवारीपर्यंत इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. केवळ सात खेळाडूंची नोंदणी झाली. गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयात बी.ए. भाग - तीनमध्ये शिकणारी प्रियांका, कणेरीच्या काडसिद्धेश्‍वर ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीला शिकणाऱ्या सोनाली व तेजस्विनी यांचा, तर मुलांत शिवाजी शिंदे, अक्षय मोळे, ऋतुराज संकपाळ व सूरज मोरे यांचा समावेश आहे. 

प्रियांकाही शालेयस्तरीय फुटबॉल स्पर्धेत खेळली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघातून वेस्ट झोन स्पर्धेतही तिने आपली चमक दाखवली आहे. प्रियांका व सोनाली यांनी शालेय राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली. फुटबॉलची तंत्रशुद्ध माहिती घेण्याच्या उद्देशातून त्यांनी पंच प्रशिक्षणासाठी नोंदणी केली. चार दिवस त्यांना नियमांचे प्रशिक्षण दिले आहे. पंचांशी मैदानावर हुज्जत घालत सामन्यात तणाव निर्माण करणाऱ्या खेळाडूंना मात्र आपण पंच व्हावे वाटत नाही, हे ठळकपणे अखोरेखित झाले. 

वरिष्ठ, ब, क, १९, १७ वर्षांखालील, ग्रामीण (गडहिंग्लज व करवीर), महिला गटातील संघांचा एकूण आकडा १२५ ते १३० आहे. प्रत्येक संघाने जरी दोन खेळाडू पंच प्रशिक्षणासाठी पाठविले, तर प्रशिक्षणार्थी पंचांचा आकडा सुमारे २५० सहज होतो. प्रत्येक संघात अनुभवी निवृत्त खेळाडूंची संख्याही अधिक आहे. त्यांनी पंच प्रशिक्षण घेण्याची तयारी दर्शवली तर पंचांच्या कमतरतेची कोंडी फुटू शकते. नाही तर कनिष्ठ गटातील संघांत ते किती दिवस खेळण्याची परंपरा कायम ठेवणार, हा मुद्दा आहे. संघांतील उदयोन्मुख खेळाडूंना नियमांच्या चौकटीतला खेळ समजून सांगण्याची जबाबदारी या अनुभवी खेळाडूंची आहे. त्याचबरोबर प्रत्येक संघ व्यवस्थापनाने खेळाडू राहू देत, प्रेक्षक गॅलरीतून पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या समर्थकांना तरी पंच प्रशिक्षणासाठी पाठविण्याची जबाबदारी स्वीकारण्यास कोणतीच हरकत नसावी. 

 केएसए व रेफ्री असोसिएशनतर्फे पंच प्रशिक्षणासाठी खेळाडू पाठविण्याबाबत संघांना कळविले होते. परंतु, प्रशिक्षणासाठी कोणी उत्सुक नसल्याचे दिसत आहे. केवळ सात खेळाडूंची नोंद झाली आहे.
- श्रीनिवास जाधव,
ज्येष्ठ पंच

Web Title: Kolhapur News three girls for Panch training