अग्रलेख : क्रिकेटचा महासंग्राम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. मैदानावर गुणवत्ता व कौशल्यच यश देते, याचे भान ठेवावे लागेल.

एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेमुळे पुन्हा एकदा क्रिकेटचा थरार आणि उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. मैदानावर गुणवत्ता व कौशल्यच यश देते, याचे भान ठेवावे लागेल.

भूतलावर भले फुटबॉल हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ असेल; परंतु आणखी एक असा खेळ आहे, ज्याची व्याप्ती फुटबॉलएवढी नसली, तरी लोकप्रियता आणि ओघाने येणारी आर्थिक उलाढाल तेवढीच अफाट नि अचाट आहे. फुटबॉलमधील गोलाच्या आनंदापेक्षा चौकार आणि षटकारांचा थरार, अखेरच्या चेंडूपर्यंत ताणली जाणारी उत्कंठा आणि रोमांच क्वचितच इतर खेळांमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळेच निकालासाठी सात-आठ तास थांबावे लागले, तरी क्रिकेटचा जोश कायम राहतो. म्हणूनच ‘विक्रमादित्य’ सुनील गावसकर यांच्या मुखातील ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ ही काव्यपंक्ती त्यांच्या चौकारांएवढीच लयबद्ध ठरली होती. काळ बदलला, विचार बदलले नि खेळाचा पवित्राही बदलला; परंतु जनमानसातला क्रिकेटचा राजेशाही थाट तसाच कायम आहे. त्यामुळेच दर चार वर्षांनी होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वकरंडक स्पर्धेची भुरळ कायम असते अन्‌ उत्कंठाही शिगेला पोहोचलेली असते. क्रिकेटचे जन्मदाते इंग्रज असले, तरी त्याचे संगोपन भारतात अधिक झाले. खऱ्या अर्थाने बाळसे येथेच धरले, त्यामुळेच धर्म म्हणूनही या खेळाकडे पाहिले जाते. आता वेळ आली आहे विश्‍वकरंडकरूपी क्रिकेटच्या महाउत्सवाची. इंग्लंड, ऑस्ट्रेलियापासून वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका ते भारतीय उपखंड अशा दहा देशांची ही विश्‍वकरंडक स्पर्धा असेल; पण या निमित्ताने लाखोंचे पर्यटन अन्‌ करोडोंची उलाढाल होणार आहे. म्हणूनच हा खेळ आता केवळ २२ यार्डांच्या खेळपट्टीएवढा मर्यादित राहिलेला नाही. सट्टाबाजाराचे गणित तर त्याहूनही वेगळे असते, परिणामी त्याची दखल क्रिकेट न खेळणाऱ्या देशांनाही घेणे क्रमप्राप्त ठरते.

हा खेळ जेथे जन्मला, तेथेच होणारा यंदाच्या विश्‍वकरंडकाचा महासंग्राम भारतीयांसाठी अनेकार्थांनी वेगळा आहे. कारण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना कपिलदेवच्या संघाने १९८३ मध्ये इंग्लिश भूमीतच विश्‍वविजेतेपदाचा राजतिलक आपल्या माथी सन्मानाने लावला. त्याच कपिलेदव यांच्याकडे पाहून सचिन तेंडुलकरसारखा ‘मास्टरब्लास्टर’ तयार झाला आणि सचिनकडून स्फूर्ती घेत विराट कोहली घडला. अशा प्रकारे वर्चस्वाचे बॅटन एका पिढीने दुसऱ्या पिढीकडे दिले, तेथेच क्रिकेट हा खेळ भारतात राजा झाला. आता वेळ आली आहे विराट आणि त्याच्या सेनेने पुन्हा एकदा ‘रनभूमी’ जिंकण्याची. अशा मोठ्या स्पर्धा कोठेही होत असल्या, तरी भारतातील मार्केट मात्र तेजीत असते. त्यासाठी प्रायोजकांपासून ते दूरचित्रवाणी हक्कांपर्यंत चुरशीची स्पर्धा होत असल्याने भारतीयांवर या सर्वांचे लक्ष अधिक असते. एकीकडे १३० कोटी भारतीयांच्या आशा, दुसरीकडे कोट्यवधीची आर्थिक उलाढाल, अशा दडपणाखाली सर्वोत्तम खेळ करण्याची जबाबदारी खेळाडूंना पार पाडावी लागते. शिवाय प्रत्येक जण ‘या वेळी भारतालाच अधिक संधी आहे,’ असे म्हणतो, तेव्हा तर दडपणाचे ओझे अधिकच वाढते. पण, यातून हल्लीची पिढी तयार झाली आहे. या शिलेदारांना वास्तवाचे भान आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजीत अव्वल विराट कोहली, गोलंदाजीत अव्वल जसप्रीत बुमरा, दोन वेगवेगळे विश्‍वकरंडक जिंकणारा महेंद्रसिंह धोनी, अशी फौज असताना साहजिकच ‘विराट सेने’ला सर्वाधिक पसंती मिळणे स्वाभाविक आहे.

अशी सर्व पार्श्‍वभूमी असली, तरी प्रत्यक्ष मैदानावर इतिहास नव्हे, तर गुणवत्ता आणि कौशल्याचे योग्य वेळी आणि अचूकतेने केलेले प्रदर्शनच युद्ध जिंकून देते. ‘विराट सेने’तील हे योद्धे ‘आयपीएल’मध्ये वेगवेगळ्या संघांतून खेळले, त्यामुळेच आता ‘टीम इंडिया’साठी खेळताना त्यांच्या अनुभवाची वज्रमूठ तयार होईल, असे म्हणायला हरकत नाही. त्याच वेळी प्रतिस्पर्ध्यांना कमी लेखून चालणार नाही. शेवटी प्रत्येक जण जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरत असतो. अन्य संघही तेवढ्याच ताकदीचे आहेत. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवले आहे. इंग्लंडला अद्याप तो मुकुट मिळवता आलेला नसला, तरी तीनशे-साडेतीनशे धावांचा डोंगर ते घरच्या मैदानावर सहजतेने पार करत आहेत. अफगाणिस्तानला ‘कच्चा लिंबू’ ठरवणे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणारे ठरू शकेल. कारण त्यांचा रशीद खान हा लेगस्पिनर गेल्या काही वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. दुसरीकडे स्पर्धेची रचना या वेळी सर्वाधिक महत्त्वाची ठरणार आहे. गटवारीची पद्धत रद्द करून प्रत्येक संघ एकमेकांशी खेळणार आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्याला अंतिम सामन्याएवढेच असलेले महत्त्व चुरस वाढवणारे आहे. भारतीय पाठीराख्यांसाठी तर पाकिस्तानविरुद्धचा सामना पुन्हा एकदा धर्मयुद्धासारखा असेल. कारण विश्‍वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानला हरवण्याची परंपरा भारताला कायम ठेवायची आहे. त्याच वेळी दोन वर्षांपूर्वी इंग्लंडमध्येच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाची परतफेड करायची आहे. ‘टीम इंडिया’ला भरभरून शुभेच्छा देऊया !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Cup 2019 and indian cricket team in editorial