World Cup 2019 : विश्‍वकरंडक स्पर्धेतले अनोखे विक्रम (संजय घारपुरे)

sanjay gharpure
sanjay gharpure

विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात, असे नेहमीच बोलले जाते. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसारखी मोठी स्पर्धा होत असते तेव्हा एक ना अनेक विक्रम पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. त्यातील काही पराक्रम आश्‍चर्यचकित करणारे असतात. विश्‍वकरंडक स्पर्धेतही असे विक्रम आणि पराक्रम करण्यात आले आहेत, जे अजूनही आबाधित आहेत. ते कोणते आणि कसे आहेत याची ही रंजक माहिती.

विश्‍वकरंडक स्पर्धेत अनेक विक्रम घडले, तसेच अनेक खेळाडूंनी स्पर्धा गाजवली. मात्र वैयक्तिक कामगिरी संघाला विजेतेपद देतेच असे नाही, याचा धडाही या स्पर्धेने दिला. त्याच वेळी कुणीही अपेक्षित नसलेल्या खेळाडूंकडून अनेक आगळे विक्रम घडले आहेत.

पहिली हॅटट्रिक
क्रिकेटच्या बातमीत गोलंदाजाला फलंदाजापेक्षा जास्त स्थान मिळवायचे असेल, तर त्याला निम्मा संघ तरी बाद करावा लागतो, किंवा हॅटट्रिक तरी घ्यावी लागते. आता विश्वकरंडकातील हॅटट्रिकबाबत बोलायचे तर स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक झाली ती चौथ्या स्पर्धेत. ही कामगिरी केली ती चेतन शर्माने. पण त्याची ओळख जावेद मियॉंदादने याच्याच गोलंदाजीवर शेवटच्या चेंडूवर षटकार मारला होता हीच आहे. असो, तर चेतनने केन रुदरफर्ड, इयान स्मिथ आणि इव्हॅन चॅटफिल्ड यांना बाद करीत ही हॅटट्रिक केली होती. सुनील गावसकर यांनी एकदिवसीय सामन्यातील आपले एकमेव शतक याच सामन्यात केले होते, पण हा सामना क्रिकेट आकडेवारी तज्ज्ञांसाठी तरी विश्वकरंडक स्पर्धेत पहिली हॅटट्रिक झालेल्या लढतीसाठीच लक्षात राहिला.
चेतन शर्माच्या या हॅटट्रिकनंतरच्या दोन स्पर्धांत एकही हॅटट्रिक झाली नाही. स्पर्धेतील दुसरी हॅटट्रिक झाली ती 1999 च्या स्पर्धेत सकलेन मुश्‍ताककडून. फिरकी गोलंदाजाची पहिली हॅटट्रिक झाली ती फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्ट्या असलेल्या भारतीय उपखंडात नव्हे तर इंग्लंडमध्ये. सकलेनच्या या हॅटट्रिकमुळे पाकची उपांत्य फेरी निश्‍चित झाली होती.

मलिंगाचे यश आणि अपयश
स्पर्धेतील सर्वात लक्षवेधक हॅटट्रिक चमिंडा वासने केली. त्याने सामन्यातील पहिल्या तीन चेंडूवर तीन बांगलादेश फलंदाजांना तंबूत धाडले. नाट्यमय हॅटट्रिकचा मान मात्र लसिथ मलिंगालाच द्यायला हवा. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 32 चेंडूत 4 धावा हव्या होत्या, पाच विकेट शिल्लक. सगळीकडे ब्रेकिंग न्यूजच्या पट्ट्या तयार होत्या. त्याने चार चेंडूत चौघांना बाद केले, पण नवव्या क्रमांकावरील पीटरसनच्या बॅटला चेंडू लागून सीमापार गेला. परिणामी मलिंगाच्या हॅटट्रिकनंतरही श्रीलंका पराजित झाले. पराभूत संघाच्या गोलंदाजाकडून झालेली स्पर्धा इतिहासातील ही एकमेव हॅटट्रिक आहे. मलिंगाने स्पर्धा इतिहासात दोन हॅटट्रिक करणारा एकमेव गोलंदाज हा मान मिळवताना केनियाच्या तिघांना टिपले. कोणीही विसरेल, पण सच्चा दक्षिण आफ्रिकन क्रिकेट चाहता जेपी ड्युमिनीची हॅटट्रिक कधीच विसरणार नाही. चार वर्षापूर्वीच्या स्पर्धेत या बदली गोलंदाजाने श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी केली. त्यामुळे आफ्रिकेने प्रथमच बाद फेरीतील लढत जिंकली.

दुसऱ्या क्रमांकाचे विजय न्यूझीलंडकडून
स्पर्धा इतिहासात सर्वाधिक 62 विजय, सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद जिंकलेल्या ऑस्ट्रेलियाचे असणे त्यात काही नवल नाही, पण दुसऱ्या क्रमांकाचे विजय कोणाचे. अहं, प्रत्येकी दोनदा स्पर्धा जिंकलेल्या भारत (46) किंवा वेस्ट इंडीजचेही (41) नाही किंवा स्पर्धेचे सर्वाधिक चार वेळा संयोजन केलेल्या इंग्लंडचेही (41) नाहीत. हा पराक्रम किवींच्या नावावर आहे. सात वेळा उपांत्य फेरी गाठलेल्या न्यूझीलंडने 48 लढती जिंकल्या आहेत. क्रिकेट हा अनिश्‍चिततेचा खेळ आहे, तसेच त्यातील आकडेवारीही.
आता हेच बघा, स्पर्धेतील पहिला सर्वोत्तम खेळाडूही किवींचा आहे. तो आहे मार्टीन क्रो. 1992 च्या स्पर्धेपासून अधिकृतपणे हा पुरस्कार सुरू झाला. त्याने 114 धावांच्या सरासरीने धावा करीत निवड समितीस पर्यायाचा विचारही करू दिला नाही. 23 वर्षांनी क्रोचा शिष्य मार्टीन गुप्टील 547 धावा करीत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जेफ ऍलॉट (1999-20) आणि ट्रेंट बोल्ट (22-2015) हे स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरले आहेत.

तो एक दुर्दैवी क्‍लुसनर
विश्वकरंडक स्पर्धा इतिहासात चार लढती बरोबरीत सुटल्या, त्यातील दोन दक्षिण आफ्रिकेच्या आहेत. या दोन्ही सामन्यात क्‍लुसनर मैदानात होता. 1999 च्या उपांत्य फेरीत ऍलन डोनाल्डने धाव घेण्यास नकार दिला, त्या वेळी त्याचा साथीदार क्‍लुसनर होता, तर चार वर्षांनी डोनाल्डने केलेली चूक मार्क बाऊचरने केली, त्या वेळीही त्याच्या समोर क्‍लुसनरच होता. इंग्लंडमधील स्पर्धेच्या आठवणी ताज्या असतानाही मायदेशात क्‍लुसनरला हे सहन करावे लागले. कोणालाही आपण क्‍लुसनर व्हावे असे वाटणार नाही.

या सम हाच
विश्वकरंडक सर्वाधिक यशस्वी कोण? याचे उत्तर देताना तुम्ही एक नाव सांगताना ऐनवेळी परत पाठवलेत. आता नाव आले ते रिकी पॉंटिंग, ग्लेन मॅकग्रा, स्टीव वॉ यांचे. यापैकी कोणीही नाही हे म्हटल्यावर धक्का बसेल. स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी आहे ऍडम गिलख्रिस्ट. तो तीनच स्पर्धा खेळला आणि तीनहीमध्ये ऑस्ट्रेलियाने विजेतेपद उंचावले. आता गिलख्रिस्टच्या यशालाही पराभवाची एक तीट लागली आहे. तो विश्वकरंडकात खेळलेल्या 31 पैकी 28 लढती ऑस्ट्रेलियाने जिंकल्या, दोन गमावल्या, तर एक बरोबरीत सुटली. त्याचे सहकारी मॅथ्यू हेडन, ब्रॅड हॉग आणि अँड्य्रू सायमंडस्‌ यांनी एकाही विश्वकरंडक लढतीत पराभवाची कडू चव चाखलेली नाही. त्यात हेडन सर्वाधिक 22 सामने खेळला आहे, तर हॉग 21 आणि सायमंडस्‌ 18.

पराभवाचा पंच
जावेद मियॉंदाद आणि सचिन तेंडुलकर प्रत्येकी सहा स्पर्धांत खेळले, पण त्यांनी स्पर्धा विजेतेपद एकदाच उंचावले. तर याव्यतिरिक्त ब्रायन लारा, शिवनारायण चंदरपॉल, शाहिद आफ्रिदी, जॅक्‍स कॅलिस, माहेला जयवर्धने, डॅनियल व्हिटोरी, स्टीव टिकोलो, थॉमस ओडोयो यांना पाच स्पर्धा खेळल्यावर एकही जिंकता आली नाही. कॅलिस, लारा, चंदरपॉल, टिकोलो, ओदोयो हे तर एकही अंतिम लढत खेळले नाहीत. आता हीच वेळ कदाचित यंदा ख्रिस गेलवर येऊ शकेल.

अपयशी सर्वोत्तम फलंदाज
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाचा फलंदाज विजयी संघाचा असणे हे केवळ दोनदाच घडले. 1979 च्या स्पर्धेत गॉर्डन ग्रिनीज, तर 2007 च्या स्पर्धेत हेडन. आता या सर्वाधिक धावा केलेल्या फलंदाजांची अंतिम सामन्यातील कामगिरी या सहस्त्रकात तरी निर्णायक झालेली नाही. 2007 च्या स्पर्धेत निर्णायक लढतीत हेडन 38 वर परतला, त्या वेळी कांगारूंच्या धावा होत्या 172. अन्य तीन स्पर्धात स्पर्धते सर्वाधिक धावा केलेले सचिन तेंडुलकर (4 - 2003), तिलकरत्ने दिलशान (33-2011) आणि मार्टिन गुप्टील (15 - 2015) निर्णायक लढतीत अपयशी ठरले, तसेच त्यांचा संघही पराजित झाला होता.

गोलंदाज मात्र भारी
स्पर्धेत सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आणि विजेतेपद हे समीकरण अकरापैकी सात स्पर्धात घडले. या अकरा सर्वोत्तम गोलंदाजात सहा डावखुरे आहेत. वासिम अक्रम (1992), झहीर खान (2011), मिशेल स्टार्क तसेच ट्रेंट बोल्ट (2015).

हे विलक्षणच
- विश्वकरंडक स्पर्धेत आत्तापर्यंत इंग्लंडचे नेतृत्व
अकरा स्पर्धेत अकरा वेगवेगळ्या खेळाडूंनी केले आहे. 1975 : माईक डेनिस, 1979 : माईक ब्रिअर्ली, 1983 : बॉब विलीस, 1987 : माईक गॅटिंग, 1992 : ग्रॅहम गूच, 1996 : माईक आथरटन, 1999 : ऍलेक स्टुअर्ट. 2003 : नासेर हुसेन. 2007 : मायकेल वॉन, 2011 : अँड्य्रू स्ट्रॉस, 2015 : इऑन मॉर्गन.

- स्पर्धेत सर्वाधिक नऊ वेळा सचिन तेंडुलकर सामनावीर
- 1979 च्या विश्वकरंडक स्पर्धेतील इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अंतिम सामन्यात आठ फलंदाजांना भोपळा फोडता आला नाही. अजूनही हा विक्रम अबाधित आहे.
- विश्वकरंडक स्पर्धेत षटकांचा कोटा पूर्ण केल्यावर सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम बिशनसिंग बेदी यांच्या नावावर आहे. 12 षटके 8 निर्धाव, सहा धावा आणि एक बळी हा बेदी यांचा विक्रम फलंदाजांची हुकमत वाढत असताना कोणी मोडण्याची शक्‍यता खूपच धूसर आहे.
- गेल्या सातपैकी सहा स्पर्धात किमान एक आशियाई संघ अंतिम फेरीत, त्यात तीनदा विजेतेपद. 1992 मध्ये पाकिस्तान, 1996 मध्ये श्रीलंका तर 2011 मध्ये भारत, अन्य चार स्पर्धात ऑस्ट्रेलिया विजेते.
- भारताने विश्वकरंडक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सर्व सहा लढती जिंकल्या आहेत, हे धवल यश झिंबाब्वेविरुद्धही नाही, 1999 मध्ये भारताने झिंबाब्वेविरुद्धची लढत गमावली नाही.
- केनियाने विश्वकरंडक स्पर्धेत कसोटीचा दर्जा असलेल्या पाच देशांच्या संघांना पराजित केले आहे, संलग्न देशातील ही सर्वोत्तम कामगिरी, सध्या तरी त्यांच्या जवळपास कोणीही नाही.
- स्कॉटलंड, बर्म्युडा, इस्ट अमेरिका तसेच नामिबिया यांनी स्पर्धेत एकही लढत जिंकलेली नाही.
- एका सामन्यात सर्वाधिक झेल घेण्याचा क्षेत्ररक्षक विक्रम मोहम्मद कैफच्या (4) नावावर.
- लसिथ मलिंगाने चार चेंडूत चार फलंदाज बाद केले आहेत, हा विक्रम सहज मोडला जाईल असे वाटत नाही.
- ग्लेन मॅकग्रा स्पर्धेत 39 सामने खेळला, त्याने स्पर्धेत एकूण किती धावा केल्या असतील. उत्तराचा क्‍ल्यू प्रश्नात लपला आहे. होय त्याने या सर्व सामन्यात मिळून तीन धावा केल्या. स्पर्धेत किमान दहा सामने किंवा किमान दोन स्पर्धा खेळलेला खेळाडू हा नीचांक.
- या स्पर्धेत इंग्लंड तीनदा उपविजेते झाले, पण एकदाही विजेते नाही, त्यांच्या या कामगिरीची
किमान दोन स्पर्धात तरी पुनरावृत्ती होणार नाही. यात सध्या तरी त्यांचे या शर्यतीतील स्पर्धक न्यूझीलंडच आहेत. अन्य उपविजेत्यांनी एकदा तरी स्पर्धा जिंकली आहे.
- यंदाची स्पर्धा इंग्लंडमध्ये आहे. त्यांनी पहिल्या सलग तीन स्पर्धांचे यजमानपद भूषवले आहे. त्यांच्या या कामगिरीची बरोबरी होण्याची शक्‍यताच नाही.
- ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाची हॅटट्रिक साधताना 1999, 2003 आणि 2007 ची स्पर्धा जिंकली. पहिल्या दोन स्पर्धा जिंकलेल्या विंडीजला जे जमले नव्हते ते पहिल्या स्पर्धेतील उपविजेत्या कांगारूंनी केले, पण आता त्यांच्या कामगिरी मोडण्याची संधी आगामी किमान तीन स्पर्धात तरी कोणाला मिळणार नाही, कारण सध्या ऑस्ट्रेलियाच गतविजेते आहेत.
- स्पर्धेत सर्वाधिक सलग 25 विजय मिळवण्याचा ऑस्ट्रेलियाचा विक्रमही नजीकच्या कालावधीत मोडला जाण्याची शक्‍यता नाही.
- ऑस्ट्रेलिया स्पर्धेतील सलग 34 सामन्यांत अपराजित आहेत, हा विक्रमही अबाधित राहण्याची सध्या तरी चिन्हे.
- विजेतेपद राखणारा पहिला संघ वेस्ट इंडीज (1975 आणि 1979) ठरला, तर हीच कामगिरी ऑस्ट्रेलियाने सलग दोन स्पर्धात (2003 तसेच 2007) मध्ये केली.
- स्पर्धेतील एकही सामना न गमावता विश्वकरंडक जिंकणारा पहिला संघ 1996 मध्ये श्रीलंका ठरला, पण त्यावेळी त्यांच्या दोन लढतीसाठी प्रतिस्पर्धी संघ वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया श्रीलंकेत खेळण्यासाठीच गेले नव्हते.
- ऑस्ट्रेलियाने 2003 तसेच 2007 ची स्पर्धा जिंकताना एकही लढत गमावली नव्हती, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने अजिंक्‍य होते.
- जेतेपदाची मालिका खंडित करणारा भारत हा एकमेव संघ आहे, 1983 मध्ये भारताने स्पर्धा जिंकली, त्या वेळी त्यापूर्वीच्या दोन स्पर्धात विंडीज विजेते होते, तर 2011 मध्ये भारत विजेता झाला, त्या वेळी त्यापूर्वीच्या तीन स्पर्धात ऑस्ट्रेलिया विजेते होते, या दोन्ही संघांना भारताने हरवले होते, विंडीजला अंतिम फेरीत तर ऑस्ट्रेलियास उपांत्यपूर्व फेरीत.
- संपूर्ण सामन्यात दोनच फलंदाजांच्या 30 पेक्षा जास्त धावा, वैयक्तिक सर्वोत्तम धावा 39, तरीही दोन संघातील फरक होता तो 43 धावांचा. हे पुन्हा कधी विश्वकरंडक स्पर्धेत, किमान अंतिम सामन्यात घडेल असे वाटत नाही. ती अंतिम लढत होती 1983. भारताच्या 183 धावांना उत्तर देताना विंडीजचा डाव 143 धावात आटोपला. त्या सामन्यातील सर्वाधिक 38 धावा करणारा फलंदाज होता कृष्णम्माचारी श्रीकांत.
----------
- विश्वकरंडक सर्वात कमी वयात उंचावणारा सर्वात लहान कर्णधार कपिलदेव (24 वर्षे)
- स्पर्धेत सलग चार शतके करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा. ही कामगिरी गेल्याच स्पर्धेत करताना प्रतिस्पर्धी होते बांगलादेश, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड
- भारताने दोनदाच विश्वकरंडक जिंकला आहे, पण त्यांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी केवळ वेस्ट इंडीजलाच आहे. भारताने 60 तसेच 50 षटकांच्या दोन्ही प्रकारात बाजी मारली आहे, तर अन्य संघांनी केवळ एकाच प्रकारात
- रिकी पॉंटिंगचे खेळलेल्या प्रत्येक स्पर्धेत किमान एक शतक
- स्पर्धा इतिहासातील सर्वात वेगवान शतक केविन ओ ब्रायनचे, आयर्लंडच्या या फलंदाजाची कामगिरी 50 चेंडूतच
- 50 षटकांची पहिली विश्वकरंडक स्पर्धा 1987 मध्ये
- श्रीलंका विश्वकरंडक जिंकलेला पहिला यजमान (1996) संघ, तर मायदेशात पहिला विश्वकरंडक उंचावण्याचा मान ऑस्ट्रेलियास (2015)

विक्रम काही तासांचाच
1975 ची विश्वकरंडक स्पर्धा. पहिली स्पर्धा, पहिलाच दिवस. इंग्लंडचे डेनिस ऍमिस यांनी भारताविरुद्ध 147 चेंडूत 137 धावा तडखावल्या. ती विश्वकरंडकातील नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या ठरली, पण ग्लेन टर्नर यांनी त्या दिवशी 201 चेंडूत 171 धावा करीत डेनिस ऍमिस यांचा विक्रम मोडला.

सामना अपूर्ण तरी निकाल
कोणताही पाऊस नाही तरीही सामना मध्येच थांबला आणि त्यामुळेच निकाल लागण्याची वेळही आली. 1996 च्या विश्वकरंडक स्पर्धेतील भारत-श्रीलंका ही उपांत्य फेरीची लढत हुल्लडबाज प्रेक्षकांमुळे अर्धवट थांबवणे भाग पडले. भारतीय संघ पराजित होत आहे हे पाहून निराश झालेल्या प्रेक्षकांनी स्टॅंडमध्ये जाळपोळ केली. श्रीलंका खेळाडूंवर दगड, रिकाम्या प्लॅस्टिक बाटल्या फेकण्यास सुरुवात केली. सामनाधिकारी क्‍लाइव्ह लॉईड यांनी सामना रद्द करीत श्रीलंका विजयी झाल्याची घोषणा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com