मिशावर फेडररची मात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 January 2017

आता आव्हान वॉव्रींकाचे; व्हिनसची आगेकूच
मेलबर्न - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. जर्मनीचा प्रतिभाशाली आव्हानवीर मिशा झ्वेरेव याचे आव्हान त्याने 6-1, 7-5, 6-2 असे मोडून काढले. त्याच्यासमोर आता देशबांधव स्टॅन वॉव्रींकाचे आव्हान असेल.

आता आव्हान वॉव्रींकाचे; व्हिनसची आगेकूच
मेलबर्न - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. जर्मनीचा प्रतिभाशाली आव्हानवीर मिशा झ्वेरेव याचे आव्हान त्याने 6-1, 7-5, 6-2 असे मोडून काढले. त्याच्यासमोर आता देशबांधव स्टॅन वॉव्रींकाचे आव्हान असेल.

फेडररने तिसऱ्या सेटच्या सातव्या गेममध्ये दहा वेळा ड्यूस झाल्यानंतर बॅकहॅंडचा अफलातून फटका मारला. या ब्रेकनंतर सर्व्हिस राखत त्याने बराचसा एकतर्फी विजय नक्की केला. नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांच्या पराभवामुळे उरलेल्या प्रमुख खेळाडूंवर दडपण आले आहे. फेडररने मात्र सफाईदार खेळ केला.

वॉव्रींकाची सरशी
वॉव्रींकाने फ्रेंच आव्हानवीर ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाला 7-6 (7-2), 6-4, 6-4 असे हरविले. त्याने दोन तास 15 मिनिटांतच सामना जिंकला. त्याने ग्रॅंड स्लॅम कारकिर्दीत आठव्यांदा आणि या स्पर्धेत तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली. त्सोंगाने दुसऱ्या सेटमध्ये तीन वेळा सर्व्हिस गमावली. तिसऱ्या सेटमध्येही त्याने एकदा ब्रेक पत्करला. वॉव्रींकाने 2014 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. त्याने 41 "वीनर्स' मारले. यातील 21 फोरहॅंडवर होते. त्याचे फटके केवळ 28 वेळा चुकले. या लढतीदरम्यान दोघा खेळाडूंत वाद झाला. वॉव्रींका फ्रेंच भाषेत त्सोंगाला म्हणाला, की "तूच माझ्याकडे पाहून बोलतो आहेस. "रिलॅक्‍स', हा केवळ टेनिसचा सामना आहे.'

व्हिनसचे "कमबॅक'
महिला एकेरीत व्हीनस विल्यम्सने 14 वर्षांच्या खंडानंतर पुनरागमन करीत येथे उपांत्य फेरी गाठली. यापूर्वी 2003 मध्ये तिने अशी कामगिरी केली होती. तेव्हा तिने अंतिम फेरी गाठली होती. तिला सेरेनाने तीन सेटमध्ये हरविले होते. व्हिनसला ही स्पर्धा अद्याप जिंकता आलेली नाही. आता तिला ही संधी आहे. तिने रशियाच्या अनास्ताशिया पावल्यूचेन्कोवाचे आव्हान 6-4, 7-6 (7-3) असे परतावून लावले. दोघींनी अनेकदा सर्व्हिस गमावली; पण एक तास 48 मिनिटे चाललेल्या लढतीत व्हिनसचा अनुभव सरस ठरला. अनास्ताशियाने "मॅचपॉइंट'ला डबल फॉल्ट केली.

कोकोचे आगेकूच कायम
व्हिनसची देशभगिनी कोको वॅंडेगेघे हिच्याशी लढत होईल. कोकोने सनसनाटी आगेकूच कायम राखत फ्रेंच विजेत्या गार्बीन मुगुरुझावर 6-4, 6-0 असा दणदणीत विजय मिळविला. कारकिर्दीत तिने प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. आधीच्या फेरीत गतविजेत्या अँजेलिक केर्बरवर मिळविलेला विजय अपघाती नसल्याचे तिने दाखवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: austrolian open tennis competition