व्हिक्टोरीया अन् पेट्राचे स्वागतार्ह कमबॅक

मुकुंद पोतदार
Wednesday, 24 May 2017

महिला टेनिसमध्ये गेल्या दीड दशकात जागतिक क्रमवारीत अव्वल बनलेल्या किंवा टॉप टूमध्ये आलेल्या अनेक मुली ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवू शकल्या नाहीत. त्यावरून क्रमवारीची पद्धतच वादाचा विषय ठरली आहे.

बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्का आणि चेक प्रजासत्ताकाची पेट्रा क्विटोवा यांनी कमबॅकची घोषणा केली आहे. गेल्या डीसेंबरमध्ये एकीच्या बाबतीत घटना, तर दुसरीच्या बाबतीत दुर्घटना घडली. व्हिक्टोरियाने मुलाला जन्म दिला, तर पेट्रावर प्रेस्टोजेवमधील राहत्या घरात चाकूहल्ला झाला. टेनिसच्या बाबतीत या दोघींमध्ये बरेच साम्य आहे. पेट्राचा जन्म १९९० मधला, तर व्हिक्टोरीयाचा १९८९ मध्ये जन्मली. दोघी ग्रँड स्लॅम चँपीयन आहेत. विशेष म्हणजे दोघींनी एकच ग्रँड स्लॅम स्पर्धा दोन वेळा जिंकली आहे. पेट्राने विंबल्डन दोन वेळा २०११ व २०१४ मध्ये जिंकले. जागतिक क्रमवारीत तिने दुसऱ्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती. व्हिक्टोरियाने सुद्धा ग्रँड स्लॅम विजेतेपद दोन वेळा मिळविले आहे. तिने २०१२ व २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन विजेतेपद मिळविले. तिने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानापर्यंत मजल मारली होती.

महिला टेनिसमध्ये गेल्या दीड दशकात जागतिक क्रमवारीत अव्वल बनलेल्या किंवा टॉप टूमध्ये आलेल्या अनेक मुली ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवू शकल्या नाहीत. त्यावरून क्रमवारीची पद्धतच वादाचा विषय ठरली आहे. या कालावधीत चीनची ली ना, ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर आणि इटलीची फ्लाव्हिया पेन्नेट्टा यांचे ग्रँड स्लॅम यश चर्चेचा विषय ठरले. मात्र प्रामुख्याने सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोवा यांच्यासमोर सातत्याने तुल्यबळ आव्हान निर्माण करण्यात कुणाला फारसे यश आलेले नाही. स्टेफी ग्राफच्या देशाची अर्थात जर्मनीची अँजेलिक केर्बर अव्वल क्रमांक गाठल्यानंतर अपेक्षाभंग करीत आहे. तिला काही धक्कादायक पराभव पत्करावे लागले आहेत. गेल्या वर्षी अँजेलिकने ऑस्ट्रेलियन विजेतेपद मिळविले. त्यानंतर फ्रेंच ओपनमध्ये स्पेनची गार्बीन मुगुरुझा जिंकली. त्यानंतर तिची सुद्धा घसरण झाली आहे.

तसे पाहिले तर महिला टेनिसमधील चुरशीचा अभाव हा अलिकडे कायम चर्चेचा विषय असतो. सध्या तर सेरेना विल्यम्स मॅटर्निटी लीव्हवर असल्यामुळे चुरस तसेच आकर्षणही कमी झाले आहे. शारापोवाला ड्रग टेस्टमध्ये दोषी ठरल्यानंतर बंदीला सामोरे जावे लागले. ही बंदी संपल्यानंतर तिने कमबॅक केले आहे. ग्रँड स्लॅम पातळीवर शारापोवा कितपत वर्चस्व गाजवू शकेल हा वेगळा विषय आहे, पण शारापोवाची कारकिर्द पहिल्यासारखी भरात नाही. अशावेळी व्हिक्टोरिया आणि पेट्रा यांच्या रुपाने महिला टेनिसमध्ये सक्षम पर्याय पुन्हा निर्माण झाले आहेत. यात शंका नाही. त्यातही पेट्राचे पुनरागमन जास्त सुखद आहे. तिच्यावरील चाकूहल्यानंतर टेनिसप्रेमींना मोनिका सेलेसची आठवण झाली होती. सेलेसच्या बाबतीत घडलेला प्रकार जास्त भयंकर होता. साहजिकच तिची पाठ थोपटूयात आमि व्हिक्टोरियाचेही स्वागत करूयात. या दोघी कमबॅकनंतर पुन्हा चँपीयन बनतील याविषयी टेनिसप्रेमींना खात्री आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukund Potdar writes about Victoria Azarenka and Petra Kvitova