'मम्मा' झाल्यानंतरही सेरेना खेळणार!

वृत्तसंस्था
Sunday, 23 April 2017

मार्गारेटचा विक्रम प्रेरणास्थान
हौशी आणि व्यावसायिक युगात एकेरीत सर्वाधिक ग्रॅंड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या नावावर आहे. त्यांनी 24 विजेतिपदे मिळविली आहेत. सेरेनाच्या खात्यात 23 विजेतिपदे जमा आहेत. मार्गारेट यांचा उच्चांक मोडण्यासाठी खेळण्याची प्रेरणा तिला लाभली आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेची मातब्बर टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिचा 'मम्मा' बनल्यानंतर निवृत्त होण्याचा कोणताही विचार नाही. यंदाच्या मोसमात ती यापुढे खेळणार नाही, पण पुढील वर्षी खेळण्यास ती उत्सुक आहे. तिचे फ्रेंच प्रशिक्षक पॅट्रिक मौरातोग्लोऊ यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले.

सेरेनाने गरोदर असल्याची घोषणा केल्यानंतर टेनिसजगतात चर्चा सुरू आहे. यंदा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकताना तिला दुसरा महिना सुरू होता हेसुद्धा स्पष्ट झाले. सेरेना 35 वर्षांची आहे. ऍलेक्‍स ओहानियन याच्याशी तिचा अलीकडेच वागनिश्‍चय झाला. विसावा आठवडा सुरू असल्याचे तिने अलीकडेच जाहीर केले. येत्या सप्टेंबरमध्ये ती 'मम्मा' बनण्याची अपेक्षा आहे. सेरेनाच्या प्रकाशक केली बुश नोव्हाक यांनी पॅट्रिक यांचा हवाला दिला आहे. पॅट्रिक यांनी 'एएफपी' वृत्तसंस्थेला माहिती दिली. त्यानुसार पुढील वर्षी पुनरागमन केव्हा करू याचा सेरेना या घडीला अकारण फार विचार करीत नाही. तिला कारकीर्द मात्र थांबवायची नाही. आपण अजूनही वर्चस्व गाजवू शकतो, असा विश्‍वास तिला वाटतो.

नस्तासे यांच्यामुळे वाद
दरम्यान, रुमानियाचे एक काळ गाजविलेले टेनिसपटू इली नस्तासे यांनी वर्णभेदी टिप्पणी केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. कॉन्संटा येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, 'सेरेनाचे बाळ कोणत्या रंगाचे असेल याची उत्सुकता आहे. चॉकलेटी रंगात दुधासारखा पांढरा रंग मिसळला असेल का?' नस्तासे हे रुमानियाच्या फेडरेशन करंडक महिला संघाचे कर्णधार आहेत. रुमानियाची प्रमुख खेळाडू सिमोना हालेप सेरेनाबद्दलच्या प्रश्‍नावर भाष्य करीत होती. तेव्हा नस्तासे यांना कुणीही काहीही प्रश्‍न विचारला नव्हता, पण ते रुमानियन भाषेत स्पष्ट आवाजात ऐकू जाईल अशा पद्धतीने हे वाक्‍य म्हणाले.

'आयटीएफ'ने (आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ) याची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे. 'आयटीएफ'च्या धोरणानुसार वर्णभेदी तसेच अवमानकारक टिपण्णी आणि वर्तन सहन केले जात नाही. नस्तासे 70 वर्षांचे आहेत. खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. त्यांची प्रतिमा 'प्ले बॉय' अशी होती. फेडरेशन करंडक स्पर्धेदरम्यान त्यांनी अनेकदा अयोग्य वक्तव्ये केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: serena williams to play after motherhood