esakal | डेल पोट्रोविरुद्ध नदालची सरशी

बोलून बातमी शोधा

डेल पोट्रोविरुद्ध नदालची सरशी
डेल पोट्रोविरुद्ध नदालची सरशी
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनविरुद्ध ‘फायनल’

न्यूयॉर्क - अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो याची अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील घोडदौड स्पेनच्या जिगरबाज रॅफेल नदालने रोखली. पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर नदालने बाजी मारली. निर्णायक लढतीत त्याच्यासमोर दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनचे आव्हान असेल. अँडरसन याने नदालचा देशबांधव पाब्ला कॅरेनो बुस्टा याला हरविले.

नदाल आणि डेल पोट्रो यांच्यातील लढत चर्चेचा विषय ठरली होती. डेल पोट्रोने रॉजर फेडररला हरविले होते. त्याच्या सर्व्हिस तसेच भक्कम फोरहॅंडसमोर नदालला सुरवातीला झगडावे लागले. दुसरा सेट ‘लव्ह’ने जिंकत नदालने प्रतिआक्रमण रचले. त्यानंतर त्याने आणखी पाचच गेम गमावले. डेल पोट्रोला आधीच्या दोन फेऱ्यांत नऊ सेट खेळावे लागले होते.

त्यामुळे नदालचा धडाका सुरू होताच तग धरणे त्याला अवघड गेले. दुसऱ्या सेटमध्ये नदालचा फटका एकदाच चुकला. तिसऱ्या सेटमध्येही त्याने सुरवातीलाच ब्रेक मिळवीत २-० अशी आघाडी घेतली. एका टप्यास सलग नऊ गेम जिंकत त्याने पकड भक्कम केली. डेल पोट्रोने अखेर तिसऱ्या सेटमध्ये सर्व्हिस राखत १-३ अशी पिछाडी कमी केली. त्यानंतर तंदुरुस्तीत सरस नदालसमोर त्याचा निभाव लागला नाही. सोपे फटके नेटमध्ये गेल्याचा त्याला फटका बसला. नदालने पहिल्या मॅचपॉइंटला ‘बॅकहॅंड पासिंग शॉट’ मारत विजय साकार केला.

नदालने सांगितले की, ‘पहिल्या सेटमध्ये माझा खेळ वाईट झाला नाही, पण मी त्याच्या बॅकहॅंडला जास्त खेळत होतो आणि तो त्याचीच वाट पाहात होता. त्यामुळे दुसऱ्या सेटपासून मी डावपेच बदलले. त्याला जास्त धावण्यास भाग पाडले, तसेच त्याला सहज अंदाज येणार नाही असे फटके मारले.’

अँडरसन विजयी
अँडरसनने पहिला सेट गमावल्यानंतर पाब्लोला रोखले. कारकिर्दीत त्याने प्रथमच ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सुमारे तीन तास चाललेली लढत जिंकल्यानंतर त्याने ‘प्लेयर्स बॉक्‍स’मध्ये जाऊन पत्नी, भाऊ आणि प्रशिक्षक नेव्हील गॉडवीन यांना आलिंगन दिले. अँडरसनच्या उजव्या कंबरेला गेल्या वर्षी दुखापत झाली होती. जागतिक क्रमवारीत तो ३१व्या स्थानावर आहे. ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा तो गेल्या नऊ वर्षांतील सर्वांत खालच्या क्रमांकाचा स्पर्धक ठरला. यापूर्वी २००८च्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ३८व्या स्थानावरील ज्यो-विल्फ्रीड त्सोंगाने अंतिम फेरी गाठली होती.

अँडरसनची सर्व्हिस भक्कम झाली. त्याने २२ बिनतोड सर्व्हिस केल्या. या तुलनेत पाब्लोला केवळ एकदाच अशी सर्व्हिस करता आली. पाब्लोने आधीच्या फेऱ्यांत एकही सेट गमावला नव्हता. त्यामुळे हा निकाल त्याच्यासाठी निराशाजनक ठरला.

दोन मोसम मला दुखापतींनी त्रस्त केले होते. हा मोसम मात्र आश्‍चर्यकारक ठरला आहे. आणखी एक ग्रॅंड स्लॅम विजेतेपद जिंकण्याची संधी मिळाल्याचा आनंद मला वाटतो.
- रॅफेल नदाल

अंतिम सामना होण्याआधीच मी कुटुंबीयांसह आनंद साजरा केला. हे योग्य आहे का याची मला कल्पना नाही; पण माझ्या मते असे करणे बरोबर आहे. प्रदीर्घ वाटचालीनंतर हा क्षण आला आहे.
- केव्हिन अँडरसन

निकाल (उपांत्य)
केव्हिन अँडरसन (दक्षिण आफ्रिका २८) विवि पाब्लो कॅरेनो बुस्टा (स्पेन १२) ४-६, ७-५, ६-३, ६-४
रॅफेल नदाल (स्पेन १) विवि जुआन मार्टिन डेल पोट्रो (अर्जेंटिना २४) ४-६, ६-०, ६-३, ६-२