धक्कादायक निकालांची मालिका कायम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 January 2018

मेलबर्न - यंदाच्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील बिगरमानांकित खेळाडूंच्या धक्कादायक निकालाची मालिका मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीतही कायम राहिली. पुरुष एकेरीत ब्रिटनच्या काईल एडमंडने बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमित्रावचे, तर महिला एकेरीत एलिसे मेर्टेन्स हिने चौथ्या मानांकित एलिना स्विटोलिनाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्याच वेळी पुरुष एकेरीत राफेल नदालला दुखापतीमुळे मरीन चिलीच विरुद्ध माघार घ्यावी लागली.

मेलबर्न - यंदाच्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतील बिगरमानांकित खेळाडूंच्या धक्कादायक निकालाची मालिका मंगळवारी उपांत्यपूर्व फेरीतही कायम राहिली. पुरुष एकेरीत ब्रिटनच्या काईल एडमंडने बल्गेरियाच्या ग्रिगॉर दिमित्रावचे, तर महिला एकेरीत एलिसे मेर्टेन्स हिने चौथ्या मानांकित एलिना स्विटोलिनाचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्याच वेळी पुरुष एकेरीत राफेल नदालला दुखापतीमुळे मरीन चिलीच विरुद्ध माघार घ्यावी लागली.

पुरुष एकेरीत काईल एडमंडने चार सेटमध्ये दिमित्रावचे आव्हान ६-४, ३-६, ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला परंतु ब्रिटनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २३ वर्षीय एडमंडने पदार्पणाच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या ताकवादन फोरहॅंडसमोर दिमित्राव निष्प्रभ ठरला. 

एडमंडने ४६ विनर्स शॉट मारले, तर दिमित्रावला केवळ ३२ शॉट मारता आले. पदार्पण हेच एकमेव दडपण एडमंडवर होते. मात्र, त्यावरही मात करत तो ग्रॅंड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा ब्रिटनचा सहावा खेळाडू ठरला. त्याची गाठ आता मरीन चिलीचशी पडणार आहे. एडमंड याने आपल्या ताकवदान फोरहॅंडला जोरदार सर्व्हिसची जोड दिली. त्याने १३ बिनतोड सर्व्हिस 
केल्या. त्याच्याकडून दिमित्रावच्या (७) तुलनेत केवळ चारच दुहेरी चुका झाल्या.

महिला एकेरीतही बिगरमानांकित एलिसे मेर्टेन्स हिने चौथ्या मानांकित एलिना स्विटोलिनाची घोडदौड ६-४, ६-० अशी सहज रोखली. अनुभवी स्विटोलिनाविरुद्ध मेर्टेन्सचे बॅकहॅंडचे फटके निर्णायक ठरले. मेर्टेन्सने बॅकहॅंडच्या जोरकस फटक्‍यावरच पहिल्या सेटमध्ये सुरवातीलाच ब्रेकची संधी साधून २-१ अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्यांदा स्विटोलिनाची सर्व्हिस ब्रेक करत तिने ५-२ अशी आघाडी वाढवली. दडपणाखाली खेळताना स्विटोलिनानेदेखील कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करताना एकदा मेर्टेन्सची सर्व्हिस भेदली. त्यानंतर आपली सर्व्हिस राखण्यात तिला यश आले. पण, त्यानंतर मेर्टेन्सने आपली सर्व्हिस राखत ४१ मिनिटांत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मेर्टेन्सने प्रतिस्पर्धी संधीच दिली नाही. 

अवघ्या ३२ मिनिटांत तिने एकही गेम न गमावता सेट जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. तिची गाठ आता द्वितीय मानांकित कॅरोलिन वॉझ्नियाकीशी पडेल. तिने कार्ला सुआरेझ नवारो हिचा ६-०, ६-७(३-७), ६-२ असा पराभव केला.

कंबरेच्या दुखापतीने नदालची माघार
क्रोएशियाचा मरीन चिलीच उपांत्य फेरी गाठण्यात सुदैवी ठरला. लढतीत ३-६, ६-३, ६-७(५-७), ६-२, २-० अशा स्थितीनंतर कंबरेच्या दुखापतीमुळे नदालला माघार घ्यावी लागली. त्यापूर्वी नदालने चौथ्या सेटला मेडिकल टाइम आउट घेतला होता. त्याच्या हालचालींवरील मर्यादा स्पष्टपणे दिसून येत होत्या. निर्णायक सेटमध्ये सर्व्हिस ब्रेक झाल्यावर नदाल २-० अशा पिछाडीवर असताना त्याने माघार घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sports news australian open tennis competition